कुस्तीच्या फडात ऊसकामगार जोडप्याची लेक
क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवायची तर गाठीशी काही लाख हवेतच! सर्व सोयीसुविधा असलेल्या खेळाडूसाठीही,पदकांची, स्पर्धेत टिकून राहण्याची, भविष्याची काहीच शाश्वती नसते. तरीही काही खेळाडू आपल्या ध्येयापासून विचलित होत नाहीत. त्यातलीच एक पल्लवी,ऊसतोड कामगाराची मुलगी.
नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातलं मालेवाडी. तिथल्या रामभाऊ आणि मीराबाई खेडकर यांची मुलगी पल्लवी. संसार चालवण्यासाठी खेडकर दाम्पत्य ऊसतोडीसाठी दर हंगामात गावोगावी जातात. साखर कारखान्याच्या परिसरातल्याच झोपडीत ते राहतात. मुळातच खेळात तरबेज असलेल्या पल्लवीची सातवी- आठवीत जिल्हा संघात निवड झाली. कुस्तीतच कारकीर्द करण्याचं आठवीत नक्की झालं. प्रियंका धनगरच्या मदतीनं तिनं सराव सुरू ठेवला. घरून थोडा विरोध होता. पण वडिलांच्या पाठबळामुळे आखाडे गाजवणं सुरूच राहिलं.
पल्ल्वीनं एक वर्ष श्रीगोंद्यात कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं. नंतर कोल्हापूरला तीन वर्ष. राजूर (ता. अकोले ) इथल्या ॲड. एम. एन. देशमुख महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत ती शिकत आहे. विविध आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये तिनं कॉलेजला यश मिळवून दिलं आहे. पुणे विद्यापीठाच्या विभागीय कुस्ती स्पर्धेत तिने 68 किलो वजन गटात पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळे तिची हरियाणात नियोजित आंतरविद्यापीठ राष्ट्रीय कुस्ती (मुली) स्पर्धेकरीता निवड झाली. त्यासाठी पल्लवी कोल्हापूरला कुस्ती प्रशिक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
खेडकर कुटुंब सध्या नेवासे तालुक्यातल्या भेंडे इथं लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोडणीला आलं आहे. पल्लवीही इथं नुकतीच चार-पाच दिवसांसाठी येऊन गेली. कुस्तीतच नाव कमवायचं असून त्यासाठी तयारी सुरूच असल्याचं ती सांगते. रामभाऊ आणि मीराबाईंनी लेकीबद्दल अभिमान व्यक्त केला. ”आम्ही अडाणी, कुस्तीतलं आम्हाला काहीच माहीत नाही की आमच्या कुटुंबात कोणी खेळलं नाही. पण पल्लवीचं नाव होतंय त्याचा आनंद आहे. तिला जेवढं शिकायचं आहे तेवढं आम्ही शिकू देणार आहोत.” तिची धाकटी बहीण आकांक्षाही आता आखाड्यात उतरली आहे.
खेळासाठी पल्लवी आणि तिच्या कुटुंबाकडे जिद्द, चिकाटी, निर्धार आहेच. परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांना आवश्यक आहे आपल्या सर्वांची साथ.
-सूर्यकांत नेटके,जि. अहमदनगर

Leave a Reply