वेब डिझायनरची झाले ‘होम बेकर’

अपर्णा पाटील या मुळच्या धुळ्याच्या. अपर्णा यांनी बी.एस्सी केमेस्ट्रीनंतर ‘डिप्लोमा इन ऍनिमेशन ऍन्ड मल्टीमिडिया’ हा कोर्स पूर्ण केला. नोकरी मिळाली ती अहमदाबादला, ग्राफिक्स डिझायनर म्हणून. त्यानंतर अमरावती, धुळे, नाशिक असं करत पुण्यात येऊनही त्यांनी नोकरी केली. 2016 पासून पुण्यातच स्थायिक झाल्या. 

अपर्णा पाटील म्हणतात, ‘‘ मी आठ–नऊ वर्ष सातत्याने नोकरी करत होते. नोकरीनिमित्त अनेक ठिकाणी राहिले. त्यातच प्रगती करून पुढे जावे हाच मानस होता. लग्न, मग घरातील जबाबदाऱ्या, दोन्ही मुलांचा जन्म यावेळी अनेक चढ-उतारांचा सामना केला. पण दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर नोकरीत ब्रेक घ्यावा असं वाटू लागलं. घरातूनच काहीतरी करावं असं खरं तेव्हा मनातही नव्हतं. पण लॉकडाऊन सुरू झालं आणि मी नवंनवं काही शिकत गेले. त्यातूनच आता होम बेकर आहे.’’ सध्या अपर्णा पिंपळे सौदागर इथं स्थायिक असून ‘इलाईट’च्या माध्यमातून त्या होम बेकर म्हणून स्वतःचा ठसा उमटवत आहेत.

अपर्णा सांगतात, ‘‘माझं मलाच काही वेळा आश्चर्य वाटतं. कुकिंग ही काही माझी आवड नव्हती, नाही. पण लॉकडाऊन झालं आणि सगळ्या जगाचीच गणितं बदलली. माझं चौकोनी कुटूंब याला अपवाद कसं असेल? हातावर मेहेंदी काढणं असो वा अंगणातील रांगोळी मला छान जमायची. एखादा सणवार असला की, सारं घर मी छान सजवून सणाचा ‘उत्सव’ करुन टाकायचे. म्हणजे कलाकुसर अवगत होतीच. पण मलाच माझ्या या गुणांची जाणीव नव्हती किंवा मेहेंदी, रांगोळी, घराची सजावट हे काय सारेच करतात, असं वाटायचं. त्यामुळे मी या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते. लॉकडाऊन पूर्वीही आम्ही घरात चौघं होतं. माझी नोकरी होती. त्यामुळे रोजची धावपळही होतीच. तेव्हा कुटुंबापुरतं दोनवेळचं रांधायलाही मला कंटाळा यायचा. त्यामुळे स्वयंपाक आणि वरकामांना मदतनीस ही होतीच. तेव्हा जर मला कोणी, मी काही दिवसांनी आनंदाने बेकिंग किंवा कुकिंग करतांना दिसेल असं सांगितल असतं तर माझा काय कुणाचाच विश्वास बसला नसता. पण आता मी आवडीने, उत्साहाने बेकिंग करते आणि होम बेकर म्हणून नावं कमावते आहे.” असे अपर्णा आनंदाने सांगतात.

अपर्णा नोकरी करत होत्या तेव्हा निवांत जगावं, मुलांना वेळ द्यावा असं त्यांना वाटायचंय म्हणून दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर त्यांनी ब्रेक घ्यायचं ठरवलं. पण मल्टीनॅशनल कंपनीतील चांगल्या पगाराची आणि चांगलं भविष्य असणारी नोकरी सोडणं हा मोठा निर्णय होता. व्दिधा मनस्थितीत दिवस जात होते. मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झालं. सगळेच घरात बंदिस्त झाले. सोसायटीने खबरदारीची पावलं उचलत घरोघरी येणाऱ्या मतदनीस बंद केल्या. त्यामुळे घरातील सगळी काम अंगावर पडली. दोन वेळचा स्वयंपाक, कपडे, भांडे आणि ऑफिस… त्यातच घरातील दोन मुलांचा दंगा… लहान मुलगा अगदी दीड वर्षाचा होता. हे सगळं बघून मग अपर्णा यांनी नोकरी सोडली. अपर्णा म्हणतात, “आता माझ्याकडे वेळच वेळ होता. पण रोज आठ तास कामाची सवय आणि घरातील सारे मी करत होतेच. त्यामुळे दुपारी जरा वेळ असला किंवा अगदी सकाळी लवकर उठून कधीतरी काय करायचं असा प्रश्न पडायचा. मग मी आणि माझी सोसायटीतील मैत्रिण सकाळी चालायला जायचो. ती देखील मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होती. तिला कंपनीकडून कायमस्वरुपीच वर्क फ्रॉम होमची सोय असल्याने ती आवड म्हणून होम बेकिंगही करत होती. तिला रोजच्या 3 ते 4 कस्टमाईज् केकच्या ऑर्डर असायच्या. पण घरातील मदतनीस बंद झाल्याने तिचीही खूप तारांबळ उडत होती. एकदा तिनंच विचारलं, तू मदत करशील का? माझ्याकडे वेळ असल्याने नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. कडक लॉकडाऊन आणि बेकरी बंद. त्यामुळे तिच्याकडे रोजच्या खूप ऑर्डरस् होत्या. तिने आवाज दिला की, मी मदतीला जायचे. मदत करता करता मी शिकत गेले. मग तिच्याकडेच रीतसर ट्रेनिंगही घेतलं.”

ट्रेनिंग घेतलं आणि आता पहिला केक अपर्णा यांनी घरी बनवला तो त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी.  घरातील सगळ्यांनाच खूप आवडला. एका बालमैत्रिणीने तो अपर्णाच्या व्हॉट्सअपच्या स्टेट्सला पाहिला. अन् तिने तिच्या घरातील कार्यक्रमासाठी अपर्णालाच केकची ऑर्डरच दिली. तिला हवा तसा कस्टमाईज् केक अपर्णाने बनवून दिला. आणि इथूनच तिचा केक प्रसिद्ध होऊ लागला. कार्यक्रमासाठी आलेल्या मंडळींना तो आवडला. तिनेही केकचा फोटो व्हॉट्सअपच्या स्टेट्सला ठेवल्याने तिच्या सोसायटीतही खूप विचारणा झाली. अपर्णाला, केक बनवून द्या म्हणून फोन यायला लागले. ती सांगते, “मी काहीच ठरवलं नव्हतं. पण आहे वेळ तर करूया, म्हणून मी केक करून देण्यास सुरुवात केली. एकामागोमाग मला 9 ते 10 ऑर्डरस् आल्या आणि मग मी बेकिंगविषयी जरा विचार करायला लागले. चव उत्तम असल्याचे तर सारे सांगत होतेच पण केवळ फोटो बघून लोकांचे मला फोन येत होते. छान वाटतं होत ते सारं. त्यानंतर घरातूनच ‘इलाईट’ या नावाने मी माझा बेकिंगचा व्यवसाय सुरू केला.”

आता अपर्णाकडे नियमित ऑर्डरस् सुरू झाल्या होत्या. मग होम बेकिंगसाठी आवश्यक ते सामान आणलं. मग नाव काय ठेवावे याचा विचार सुरू झाला. केक कसा मुऊसूत आणि गोड. पण विचार करतांनाही छान वाटावं असे नाव मी शोधत होते आणि अखेर ‘इलाईट’ नाव देण्याचे ठरवलं. मग रितसर ब्रॉशर तयार केलं, आणि माझा होम बेकर असा प्रवास सुरू झाला. यावेळी माझे पती प्रमोद, मोठा मुलगा सानिध्य आणि लहान मृगांक यांनी मला छान साथ दिली.

अपर्णा सांगतात, ‘‘नोकरी सोडून मी खूप काही मोठं काम करते आहे असं नाही. पण कोरोनाच्या काळात खूप लोक संकटात होते. मानसिक, आर्थिक तणावातूनही गेले. पण आपण तयार केलेल्या केकमुळे कोणाचा तरी कार्य़क्रम छान होतो. काही वेळ का होईना सारं काही विसरून आपले आप्त, मित्र-मैत्रिणी त्यांचे कुटुंबीय आनंदाचे क्षण जगतात, त्यांचे अनुभव आपल्याबरोबर शेअर करतात. केक खूप आवडल्याचं सांगतात हे सारंच मला सुखावून जातं. पुढील वाटचालीसाठी बळ देतं आणि पुन्हा मिळणाऱ्या ऑर्डरस् तर एक वेगळीच ऊभारी देऊन जातात. ’’

  • पल्लवी धामणे – रेखी

Leave a Reply