महिला सुरक्षेवर परभणी पोलिसांचं लक्ष
दीपालीला जाणवलं,नीता आज खूपच चिंतेत आहे. राजेशसोबत लग्न होऊन तीन वर्ष झालेली. राजेश आणि नीता परभणीत राहणारे. दोघांमध्ये कायम भांडण. भांडणाची कारणं अगदी क्षुल्लक. राजेश आणि त्याच्या घरच्यांच्या अपेक्षा संपायच्याच नाहीत. परगावात राहणाऱ्या म्हाताऱ्या आईवडिलांना काळजी नको, म्हणून त्यांना ती काही सांगत नसे. पण आता दिवसेंदिवस तिला या जाचाचं ओझं सहन होत नव्हतं. दीपालीनं नुकतंच भरोसा सेलबद्दल वाचलं होतं. तिच्या मदतीनं नीता परभणीतल्या भरोसा सेलकडे आली. तिथे एका भेटीतच मदतीचा विश्वास तिला मिळाला. ”
परभणीतील भरोसा सेल पोलीस मुख्यालयात आहे.
जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट 2021 या काळात भरोसा सेलकडे एकूण 559 अर्ज आले. त्यापैकी 90 प्रकरणात तडजोड घडवून आणण्यात आली. 37 प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 42 तक्रारदारांना न्यायालयात जाण्यास सांगण्यात आलं. 23 अर्ज समुपदेशनानंतर मागे घेण्यात आले. या काळात एकूण 221 प्रकरणं निकाली निघाली.
पीडित महिलांना विश्वास आणि मानसिक आधार भरोसा सेलकडून मिळतो. पीडित मुलीसह त्यांच्या कुटुंबाला धक्का बसलेला असतो. त्यांचं समुपदेशन त्याचसोबत मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर भरोसा सेल काम करत आहे.
परभणी जिल्हा पोलिसांनी महिला सुरक्षेवर लक्ष केंद्रित केलं आहे. महिला तक्रार निवारण कक्ष, निर्भया पथक, मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष सुरू आहेत. शिक्षित महिलाही कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडत आहे. याबाबत तक्रारी देण्याच्या प्रमाणात वाढ होत असली तरी अनेकांना कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा, त्यातील तरतुदी, कायद्यानं दिलेले अधिकार, तक्रार देण्याची प्रक्रिया याची माहितीच नाही. किरकोळ चुकीमुळे कायद्याच्या कचाट्यात मुलं सापडतात. त्याचा भविष्याबाबत घरच्या मंडळींना काळजी लागते. यासाठीही परभणी भरोसा सेल’ काम करतं.
उपनिरीक्षक आर.जी.भावसार, हवालदार एस.पी.एकाडे, एम.एस.चट्टे, पोलिस नायक एस. टी. चाटे, ए.एस.लांडगे, व्ही.एस.चव्हाण, एस. एम.होळकर, पोलिस शिपाई एस. डी.घुगे हे सर्वजण भरोसा सेलची जबाबदारी सांभाळत आहेत.
– बाळासाहेब काळे-परभणी

Leave a Reply