शैक्षणिक पालकत्व, एक हात मदतीचा..!
आपण समाजाचं देणं लागतो, या भावनेतून काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या आसपास असतात. नाशिक येथील महानगरपालिका शाळेतील प्रयोगशील शिक्षीका कुंदा बच्छाव आणि त्यांच्या सहकारी वैशाली भामरे या दोघीही याच विचारांच्या. त्यामुळेच त्यांनी शैक्षणिक पालकत्व (एज्युकेशनल पॅरेंटिंग) अभियानातून परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर गेलेल्या विद्यार्थिनींना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळवून दिली आहे.
शासनामार्फत 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण दिलं जातं. यामुळे इयत्ता आठवीपर्यंत 100 टक्के विद्यार्थ्यांचं सर्व शिक्षण मोफत होत असल्याने पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतात. मात्र त्यापुढील शिक्षणासाठी पालकांना स्वत: खर्च करावा लागतो. गरीब कुटुंबातील पालकांना हा खर्च परवडण्यासारखा नसतो. मुलांच्या पुढील शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थ ठरल्याने पालक मुलांना शाळेतून काढून घेतात. काही पालक आपल्या मुलांना इतरत्र रोजागारासाठी पाठवतात. हा आघात मुलांपेक्षा मुलींवर अधिक मोठ्या प्रमाणात होतो. शिक्षण सुरू असताना आठवीनंतर मुलींना शाळेतून काढून घेण्याचं प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे. शालेय खर्चासाठी शिक्षण थांबलेल्या अशा मुलींना नंतर घरात ठेवण्यापेक्षा अल्पवयातच त्यांचं लग्न लावून देण्याचा पालकांचा प्रयत्न असतो. अलिकडच्या काळात बालविवाहाचं प्रमाण ग्रामीण आणि शहरी भागातही वाढलं आहे. हे लक्षात घेत नाशिक मनपा शाळा क्र. १८, आनंदवली येथील शिक्षिका कुंदा बच्छाव आणि त्यांच्या सहकारी वैशाली भामरे यांनी पुढाकार घेऊन शैक्षणिक पालकत्वाची कल्पना प्रत्यक्षात आणली. याबाबत कुंदा बच्छाव सांगतात, “समाजातील मुलींच्या बाबतीतील हे विदारक चित्र बघून मन सुन्न होत होते. अशावेळेस अभ्यासात हुशार असलेल्या या गरजू विद्यार्थिनींना आपलं पुढील शिक्षण घेता यावं, यासाठी त्यांना समाजातून आर्थिक मदत मिळवून देऊन त्यांच्या पालकांचीही त्यांच्या शिक्षणासाठी संमती मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यातूनच ‘शैक्षणिक पालकत्व… एक हात मदतीचा..!’ (एज्युकेशनल पॅरेंटिंग) हे अभियान सुरू केलं आहे.”
ज्या विद्यार्थिनींना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे, शिकून काहीतरी मोठे बनण्याची जिद्द आहे, परंतु घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेण्यात अडचण येत आहेत, अशा विद्यार्थिनींना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे या दोन्ही शिक्षिकांनी ठरविले. याबाबत कुंदा बच्छाव म्हणाल्या, “सुरूवातीला आम्ही दोघींनी पाच मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतले. अधिक मुलींना दत्तक घेण्याची इच्छा होती, परंतु जास्तीत जास्त मुलींना मदत करताना आम्हाला काही बंधने, काही अडचणी येत होत्या. त्यामुळे अशा गरजू अधिकाधिक विद्यार्थिनींना पुढील शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी शैक्षणिक पालकत्व हे अभियान सुरू केलं.”
विद्यार्थिनींचा शैक्षणिक खर्च उचलतील अशा संवेदनशील व दानशूर व्यक्तींना शैक्षणिक पालक म्हणून जबाबदारी देणे आणि त्यातून विद्यार्थिनींचे पुढील शिक्षण पूर्ण करणे असा हेतू आहे. इयत्ता बारावीपर्यंत मुली शिकत राहिल्या तर त्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. या विद्यार्थिनींना पदवीपर्यंत किंवा व्यावसायिक शिक्षण मिळेपर्यंत आर्थिक सहकार्य करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे मुलींचं शिक्षण मध्येच बंद होणार नाही व त्या स्वत:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनतील, असा विश्वास कुंदा बच्छाव आणि वैशाली भामरे यांनी व्यक्त केला. शिक्षणामुळे या मुली पुढे जाऊन आदर्श महिला, गृहिणी, माता बनून एक आदर्श कुटुंब व आदर्श समाज घडवतील, असेही बच्छाव म्हणाल्या.
हळूहळू चालणारी पण दूरगामी चांगले परिणाम देणारी ही चळवळ आहे. हे अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्याची आवश्यकता आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह समाजातील अनेक प्रतिष्ठित मंडळींनी या उपक्रमास सहकार्य करून चळवळीस बळ दिले आहे. या अभियानातून आतापर्यंत 70 मुलींना शैक्षणिक पालक मिळाले आहेत. उपक्रमात सहभागी होण्यासाठी आर्थिक किंवा शैक्षणिक साहित्य स्वरूपातच मदत स्वीकारली जाते. समाजभान जपणारा प्रत्येकजण या चळवळीत योगदान देऊन मुलींच्या शिक्षणास हातभार लावू शकतात. या अभियानाचा भाग होऊ इच्छिणारे कुंदा बच्छाव (९४२०६९५०६५) आणि वैशाली भामरे (७५८८६१८७४१) यांच्याशी संपर्क करून शैक्षणिक पालकत्व स्वीकारू शकतात.
– प्राची उन्मेष, नाशिक

Leave a Reply