पालक आणि आमचा एकत्र प्रवास
2017 साली ठाणे इथल्या सरस्वती शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रयोगशील मुख्याध्यापिका रती भोसेकर या आमच्या सहज शिक्षणाच्या तीन दिवसांच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाल्या होत्या. मुलं स्वत: आकलन करून घेण्यासाठी सक्षम असतात, त्यांना शिकवण्याची नाही तर फक्त योग्य वातावरण द्यायची गरज असते हे सहज शिक्षणाचं मर्म रतीला पूर्णपणे पटलं. त्यानुसार शाळेच्या नियमांना धरूनच तिने आपल्या विभागात सहज शिक्षणाचे काही प्रयोग करायला सुरुवात केली. यासाठी आम्ही दोघींनी तिच्या शिक्षिकांच्या मीटिंग्ज घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली.
दोन तीन वर्षे रतीनं काम चालूच ठेवलं. यात बऱ्याच आश्वासक गोष्टी घडत होत्या. त्याचे चांगले परिणाम दिसत होते. आणि मग 2020 च्या फेब्रुवारी, मार्चमध्ये कोविडचा कहर सुरू झाला. ते शैक्षणिक वर्ष संपत आलं होतं. पूर्व प्राथमिक विभाग असल्यामुळे अभ्यास संपवणे वगैरेचा ताणही नव्हता.
जून 2020 मध्ये शाळेचं पुढचं वर्ष सुरू झालं. पण कोविड अजूनही ठाण मांडूनच होता आणि अश्या काळात मुलांना शाळेत बोलावणं शक्य नव्हतंच. पहिल्यांदाच प्रवेश घेतलेली मुलं, त्यांचे पालक यांच्याशी सुद्धा संवेदनशीलतेने काम करणं गरजेचं होतं. ऑनलाईन वर्ग भरवणे हा एक पर्याय बऱ्याच शाळांनी पत्करला होता. पण तीन ते सहा या वयोगटातल्या मुलांसाठी ते योग्य वाटत नव्हतं. तेव्हा दोन पातळ्यांवर काम करायचं ठरवलं. रतीने शाळेतून मुलांसाठी काही उपक्रम ठरवले. ते उपक्रम पालकांना समजावून दिले जातील आणि पालक ते उपक्रम मुलांकडून करून घेतील असं ठरलं. यात मुलांचा मोबाईल किंवा कुठल्याही स्क्रीनशी रोजचा प्रत्यक्ष संबंध येणार नव्हता. पण मुलांबरोबर काम मात्र होणार होतं.
याचबरोबर पालकांशी सहज शिक्षण (natural learning) या विषयावर संवाद साधायचा असं मी आणि रतीने ठरवलं. कोविड काळात मुलं सतत घरीच असणार आहेत. त्यामुळे पालकांची मुलांच्याबद्दल नक्की काय भूमिका असावी, पालकांनी मुलांचा ताण घेऊ नये यासाठी काय काय करावं या बद्दल आम्ही त्यांच्या कार्यशाळा आयोजित केल्या.
आमच्या पहिल्या झूम कार्यशाळेला शंभराहून जास्त पालक हजर होते.
या कार्यशाळेत आम्ही पुढील मुद्दे घेतले होते-
१. सहज शिक्षणाच्या दृष्टीने आपले मूल समजून घेणे.
२. ‘सहज शिक्षण’(Natural Learning) म्हणजे काय?
३. मूल खेळते म्हणजे नक्की काय करते आणि त्याचे मुलाच्या आकलन प्रक्रियेत काय महत्त्व आहे?
४. मूल चित्र काढते याचा अर्थ काय आणि त्याचे मुलाच्या आकलन प्रक्रियेत काय महत्त्व आहे?
५. सहज शिक्षणात मोठ्यांची भूमिका काय असते ?
६. कोरोना काळ, पालक आणि मुले हा मेळ कसा घालावा ?
१. मूल समजून घेणे – निसर्गाने मुलांना सभोवतालचे जग समजून घेण्याची क्षमता उपजतच दिली आहे. मूल आपली ज्ञानेंद्रिये वापरुन, अनुभव घेते, अनुकरण करते आणि यातून जगाचे आकलन होत जाते. आपण या दृष्टीने मुलाकडे क्वचितच बघतो. त्यामुळे मुलाला ‘शिकवणे’ महत्त्वाचे वाटते. पण मूल जन्मल्यापासून शिकत असतेच. त्यामुळे 7-8 वर्षांपर्यंत मुलांना ‘शिकवू’ नये, तर ते कसे शिकेल हे बघावे.
२. सहज शिक्षण म्हणजे काय? – अनुकरणातून, निरीक्षणातून आणि अनुभवातून प्रत्येक सजीव जगाचे आकलन करून घेत असतो. ही आकलन प्रक्रिया निसर्ग नियमानुसार आपोआप होत असते.
३. मुलांचे खेळणे – मुले आपले अनुभव / निरीक्षणे पुनः आपल्या पद्धतीने मांडून बघतात. हा मनन करण्याचा एक प्रकार असे म्हणू शकतो. याला आपण मोठे मुलांचे खेळणे असं म्हणतो. यात मुले आजूबाजूला असतील त्या वस्तू वापरतात. त्यांना आपण खेळणी असं नाव देतो. यातून मुलांचे आकलन बनत जाते.
४. मुलांचे चित्र काढणे – जिथे चित्र काढणे सहज शक्य असते अशा वेळी मुले आपले अनुभव, निरीक्षणे यांची चित्रे काढतात. हा सुद्धा मननाचा भाग आहे. यातून सुद्धा मुलांच्या आकलनाची प्रक्रिया सुदृढ होत असते.
५. सहज शिक्षणात मोठ्यांची भूमिका- मुलांच्या सोबत राहणाऱ्या मोठ्यांनी मुलांसाठी योग्य अवकाश देणं आवश्यक ठरतं. प्रेम, विश्वास, सुरक्षितता आणि स्वातंत्र्य या गोष्टी मुलांसाठी अत्यंत गरजेच्या आहेत. मुलांमध्ये जगण्यासाठी लागणाऱ्या उपजत क्षमता आणि मूल्ये असतातच. यांना वाव देतील असा अवकाश मुलांसाठी तयार ठेवणे ही खूप मोठी जबाबदारी मोठ्यांची असते.
हे पाच महत्त्वाचे मुद्दे समजून घेतल्यावर कोरोना काळात पालकांनी मुलांशी कसं वागावं हे समजून घेणं पालकांना अवघड गेलं नाही. मुख्य म्हणजे पालकांनी ते समजून घेतलं आणि आम्हाला त्याबद्दल वेळोवेळी सांगत राहिले. त्यातून पुनः काही शंका, त्यांचं निरसन यातून आमचे ‘शिकणं’ जास्त गहिरे होत गेलं.
– रंजना बाजी, रती भोसेकर

Leave a Reply