पर्यावरणस्नेही शौचालय उभारणी व वापराचा वसा घेतलेले नावरेकर कुटुंब
नाशिकच्या गंगापूर रस्त्यावरील गोवर्धन गावामध्ये राहणारे नावरेकर कुटुंब. स्वातंत्रसैनिक एम.व्ही. अर्थात भाऊ नावरेकर हे महात्मा गांधीजींचे अनुयायी होते. स्वतंत्र चळवळीनंतर त्यांनी महात्मा गांधीजी यांच्या ‘ग्राम स्वच्छ्ता’ या मूल्याचा जीवनध्येय म्हणून स्वीकार केला होता. त्या काळापासून ते सफाई विषयावर ‘थिअरी आणि प्रॅक्टीकल’ या दोन्ही स्तरावर शास्त्रीय पद्धतीने काम करत होते. ‘निर्मल ग्राम निर्माण केंद्र’ द्वारे गेल्या तीन दशकांपासून ते हे काम करत आहे.
त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र श्रीकांत नावरेकर, कन्या निलुताई नावरेकर, स्नुषा संध्या नावरेकर आणि नात असे सारे कुटुंब त्यांचा स्वच्छतेचा वसा तितक्याच ताकदीने, जोमाने पुढे नेत आहेत. या केंद्रात सफाई कडे ‘वेस्ट मॅनेजमेंट अर्थात कचरा व्यवस्थापन’ या दृष्टीकोनातून पहिलं जातं. लोक मात्र ओला- सुका कचरा जाळणे, दूर निर्मनुष्य भागात फेकून देणे, सांडपाणी नदी तलाव, समुद्रात सोडून देणे या पारंपारिक पद्धतीने कचऱ्यापासून स्वतःची सुटका करतात.
मानवी शरीरातून बाहेर पडणारे मलमूत्र हे धोकादायक असलं तरी त्याला नीट हाताळले, योग्य पद्धतीने त्याचा निचरा केला तर त्यात असलेला धोका दूर होऊन ते उत्तम खत होऊ शकते या सूत्रावर हे केंद्र काम करते. मलमुत्रामुळे रोगराई पसरू शकते, आरोग्य धोक्यात येऊ शकत हे लक्षात घेऊन त्या गोष्टी होणार नाही याची पूर्ण काळजी घेत त्याचे व्यवस्थापन करणारी शौचालये निर्माण करण्याची पद्धत या केंद्रात शिकविली जाते. सध्या शहरी शौचालये ही ‘सेफ्टी टॅंक’, ‘ड्रेनेज पाईप लाईनला जोडलेली शौचालये’ या स्वरुपात पाहायला मिळतात. निमशहरी भागातही हाच प्रकार पहायला मिळतो. यात अशास्त्रीय पद्धतीने मलमूत्र थेट गटारात सोडलेले पाहायला मिळते. यामुळे वास, प्रदूषण, जास्तीचा खर्च या गोष्टी समोर येतात. हे मलमूत्र भूमिगत गटारांद्वारे शहरात विशिष्ट ठिकाणी एकत्र करून त्यावर प्रक्रिया करून ते पाणी नदी, समुद्रात सोडले जाते. यातून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होते. एका मानवाने एका दिवशी एखाद्या पदार्थाद्वारे खाल्लेल्या ९०० ग्राम मैद्याचे वहन करण्यासाठी म्हणजे तो वाहून नेण्यासाठी कित्येक लिटर पाणी सोडावे लागते. असे शेकडो, हजारो लिटर पाणी सोडले तरच त्या मलमुत्राचा नीट निचरा होतो. याचवेळी या केंद्रात शिकविल्या जाणाऱ्या ‘द्विकूप शौचालय’ अर्थात दोन खड्डे असणारे शौचालय परिणामकारक ठरते. त्याच्या बांधणीला येणारा खर्च, लागणारे पाणी, धोक्यापासून वाचणारे पर्यावरण हे सारे फायदे अनेक पटीने जास्त आहेत. या शौचालयाला जोडलेल्या दोन्ही टाक्या आलटून पालटून वापरता येतात. एक भरली की दुसरी असे करत. छोट्या कुटुंबाला एक टाकी दीर्घकाळ चालते. ती भरल्यावर दुसरी वापरायला घेतली की तोपर्यंत पहिल्या टाकीतल्या मलमुत्रातले पाणी निघून जाऊन ते वाळलेले असते. त्याचे उत्तम खत झालेले असते. ते खणून काढून शेतात वापरले जाते. पिकांना त्याचा फायदा होतो. शिवाय या प्रकारच्या शौचालयाला पाणी कमी लागते. श्रीकांत नावरेकर, निलुताई नावरेकर यांनी आजवर अनेक शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था, सामाजिक संस्था अशा हजारो इच्छुक लोकांना या प्रकारचे शौचालय उभारण्याचे, वापराचे शास्त्रीय प्रशिक्षण दिले आहे. आजही देत आहेत.
एखाद्या मोठ्या हॉटेलात गेल्यावर आपल्यावर पहिले कारंजे, बागा, सेल्फी पॉइंट दिसतात. पुरातन मंदिरात गेल्यावर जुन्या समाध्या, ऐतिहासिक वस्तू दिसतात. निर्मल ग्राम निर्माण केंद्रात गेल्यावर प्रवेश द्वारापासून आपल्याला शौचालयाची भांडी, त्यांचे प्रकार पाहायला मिळतात. पहिल्यांदा पाहणारा चक्राऊन जात असेल की हा काय प्रकार आहे पण या केंद्राचे उद्दिष्ट, त्याचे महत्व लक्षात आले की तीच व्यक्ती सखोल चौकशीला सुरवात करते. माहिती घेऊ लागते. नावरेकर यांच्या घरी आणि केंद्रावर तर हे शौचालय आहेतच पण गोवर्धन गावातही अशा प्रकारची २०० ते २५० शौचालये तिथल्या रहिवाश्यांनी बांधून घेतलेली पाहायला मिळतील. ज्यांना या केंद्रावर येणं आणि इथं राहून प्रशिक्षण घेणं शक्य नाही अशांसाठी ‘कृपया संडास असा बांधा’ नावाचे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि आणखी काही भाषेत हे पुस्तक वाचकांना उपलब्ध करून दिले जाते. याशिवाय संस्थेचे ‘निर्मल ग्राम निर्माण केंद्र नाशिक’ या नावाने संकेतस्थळ आहे. त्यावर देखील या विषयाची, कामाची सचित्र माहिती मिळते. द्विकुप शौचालय बांधायला १५ ते २० हजार रुपये खर्च येतो. सेप्टिक टॅंकचे शौचालय बांधायला ४० ते ५० हजार रुपये खर्च येतो. द्विकुप शौचालयाला प्रती माणूस दीड, दोन लिटर पाणी पुरे होते. तेच सेप्टिक शौचालय वापरणाऱ्या व्यक्तीला ८ ते १० लिटर पाणी लागते. या केंद्रात गवंडयांसाठी ५ दिवसीय प्रशिक्षण दिले जाते. त्यात शौचालयासाठी योग्य जागा कशी निवडायची, मापं कशी घ्यायची, बांधकाम कसे करायचे या साऱ्याचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. अभिययत्यांसाठी प्रात्यक्षिकासह ३ दिवसीय प्रशिक्षण दिले जाते. तांत्रिक बाबी सोप्या पद्धतीने थोडक्यात समजावून सांगणारे १ ते २ दिवसीय प्रशिक्षण कार्यकर्त्यांसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी दिले जाते. जिल्हा परिषद, महाराष्ट्र शासन, विविध शासकीय, खाजगी संस्था यांच्या मागणीनुसार प्रशिक्षण कार्यक्रम आखले जातात आणि पार पडतात. याशिवाय संस्थेच्या संकेतस्थळावर यु ट्यूब व्हीडीओ देखील पाहायला मिळतात. शाळा, कौटुंबिक सहली, सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांसाठी क्षेत्र भेटी अशा विविध कारणांनी लोक येथे येऊन माहिती घेत असतात.
शौचालायाबरोबरच ही संस्था कचरा व्यवस्थान या विषयावरही महत्वपूर्ण काम करते. ‘गांडूळ खत, सोन खत, सेंद्रिय खत असे विविध प्रकारचे खत कसे तयार करायचे, ओल्या सुक्या कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू कशा तयार करायच्या आदींचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. खत निर्मितीची शास्त्रीय पद्धत, फायदे समजावून घेता येतात. कचऱ्याचं वर्गीकरण कसं करायचं, त्याला कशी वागणूक द्यायची याचा सुंदर दृष्टीकोन इथं पहायला मिळतो. या केंद्रात आल्यानंतर कचऱ्याकडे पाहण्याची आपली दृष्टीच बदलून जाते.
– भाग्यश्री मुळे, नाशिक

Leave a Reply