”कोरोनाच्या लाटेत ओळखीतल्या एकाचं निधन झालं तेव्हा त्याच्या घरी गेलो होतो. त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं जात होतं. कुणी तिचं मंगळसूत्र काढत होतं. तर काहींना तिच्या बांगड्या फोडण्याचं पडलं होतं. या साऱ्या गदारोळात ती मात्र, “हे सारं राहू द्या, हा माझा आधार आहे”, असं ओरडून सांगत होती. पण त्याकडे लक्ष द्यावं असं कोणालाच वाटत नव्हतं. हाच प्रसंग मला अस्वस्थ करून गेला. यातूनच पती गेलेल्या स्त्रीच्या आत्मसन्मान मोहिमेचा आरंभ झाला.”
ज्येष्ठ आणि प्रयोशील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे सांगत होते. याबाबत आधी पत्नी अलकासोबत चर्चा केली. पतीचं निधन झालेल्या स्त्रियांच्या भावना जाणून घेतल्या आणि कोरोना कमी झाल्यावर त्यांनी हे अभियान सुरू केलं.
महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी कुठलीही प्रथा-परंपरा म्हणजे महिलांवरील अत्याचारच. या विचारांचे राजू शिरसाठ, कालिंदी पाटील, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार हेही प्रमोद यांच्यासोबत अभियानात सहभागी झाले. पतीच्या निधनानंतर अंत्यविधीवेळीच कुंकू पुसणं, मंगळसूत्र तोडणं, बांगड्या फोडणं, जोडवी काढणं, या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारानं ‘विधवा सन्मान कायदा’ करण्यासाठी हे अभियान.
खरं तर, कुठले दागिने घालावे, घालू नये, कधी घालावे, हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण अजूनही याबाबतच्या विचारात समज-उमज नाही. आधीच जोडीदार गमावण्याचं दुःख. या दुःखात स्त्री असताना तिचे दागिने खेचून किंवा त्याविषयी कुजबुज करून आपण नेमकं काय साध्य करत असतो? याचा विचार करायला हवा. अनेकींसाठी ती आर्थिक पुंजी असते, अनेकींच्या भावना त्यात गुंतल्या असतात. त्या दुखावण्याचा अधिकार कोणालाच नाही.
पती गेलेल्या स्त्रीला आजही अनेक ठिकाणी शुभकार्यात सहभागी करून घेतलं जात नाही. तिचं कुटुंबातलं स्थान दुय्यम होतं. यातून तिचा आत्मसन्मान दुखावला जातो. अनेकींसमोर पतीच्या निधनानंतर आर्थिक, मानसिक, कौटुंबिक आव्हानं असताना तिला नामोहरम करण्याची संधी साधली जाते. असं कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी,यासाठी अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. गेल्याच महिन्यात नाशिकमध्ये यासाठी कार्यशाळा झाली. प्रशासन,लोकप्रतिनिधींना याबाबत निवेदनं देण्यात आली. कायद्यानंही या अनिष्ठ प्रथांना आळा घालता येईल का, याविषयी तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. रोहयो, मनरेगा, सरपंच मार्गदर्शन या माध्यमातून गावागावतल्या लोकांशी त्यांची प्रमोद सरांची नाळ जुळलेली आहेच. अभियानाच्या माध्यमातून सामाजिक संस्था, महिला मंडळं, बचतगट, सरपंच गट यांना यासाठी तयार केलं जात आहे. रत्नागिरी, अहमदनगर, जालनासह अन्य भागात कार्यशाळा, बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत आहे. कोणाही स्त्रीला समाजाच्या मुख्य प्रवाहातून अशा प्रकारे दूर सारणं, अन्यायकारक असल्याची जाणीव करून दिली जात आहे. याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सातहून अधिक ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत आत्मसन्मान जपण्याचा ठराव केला आहे.
प्रथा आपल्यापासूनच बंद करावी, या आदर्शातून प्रमोद यांनी मार्च अखेरीला करमाळा तहसील इथं १०० रुपयांचं प्रतिज्ञापत्र केलं. आपल्या निधनानंतर आपल्या पत्नीला कुठल्याही अनिष्ट पद्धतींना तोंड द्यावं लागू नये, यासाठी प्रत्येक पतीनं पुढाकार घ्यावा, असं आवाहन ते करतात.