छोटा पेन्सिल संग्राहक
अकोल्यात पाचवीच्या वर्गात शिकणारा यश जैन. सध्या त्याची ओळख सर्वात लहान संग्राहक म्हणून झाली आहे. कसला संग्रह करतो आहे, यश. तर, पर्यावरणपूरक पेन्सिलींचा. यश अगदी पाच वर्षांचा होता तेव्हापासून वैविध्यपूर्ण पेन्सिल जमवायला लागला. हे कसं सुरू झालं तर आपल्या मुलाला बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा कुठलाही छंद जडावा ही त्याच्या वडलांची उत्कर्ष यांची इच्छा. त्यामुळे त्यांनी नेहमीच यशला पाठिंबा दिला. त्यांचं जनरल स्टोअर्सचं दुकान आहे. दुकानात विविध प्रकारच्या पेन्सिल विकायला ठेवलेल्या असतात. त्यातील काही पेन्सिल यश त्याच्या संग्रहात जपून ठेऊ लागला. पेन्सिलीच नाहीत तर खोडरबर आणि काडेपेटीचे बॉक्सही त्याच्या संग्रहात आहेत.
केवळ देशातल्या नव्हे तर परदेशातल्या ही पेन्सिल त्याने संग्रही ठेवल्या आहेत. चीन, जर्मनी, जपान, फ्रान्स, युनायटेड किंग्डम, रशिया या देशातल्या विविध नामवंत कंपन्यांच्या पेन्सिलही त्याच्याकडे आहेत. अगदी पाच रुपयांपासून पाचशे रुपये किमतीच्या पेन्सिल यशकडे आहेत. यशचा हा छंद पाहून त्याचे नातेवाईक देखील त्याला गिफ्ट म्हणून पेन्सिलच देतात. भेट म्हणून मिळालेल्या पेन्सिल वापरण्याऐवजी तो संग्रह जमा करतो. या संग्रहाचे तो ‘छंदातून आनंदाकडे’ हे प्रदर्शनही भरवतो. यशचे पेन्सिलवरचे प्रेम आणि डोळे दिपावून टाकणारा संग्रह पाहताक्षणी कौतुक केल्याशिवाय कुणीच राहणार नाही.
या संग्रहात ५६ इंचाची पेन्सिल आहे. या पेन्सिलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. तसंच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गांधीजींचे विचार पेन्सिलवरील कोरण्यात आले आहेत.
पेन्सिल संपत आली की, मुलं त्याचा शेवटचा तुकडा फेकून देतात. हा उर्वरित भागही वापरता यावा यासाठी पेन्सिलच्या शेवटच्या टोकावर बायोडिग्रेडेबल टोपण बसवलेलं असतं. यात विविध फळभाज्यांच्या बिया ठेवल्या जातात. पेन्सिलचा शेवटचा भाग हा मातीत रुजवला की त्यापासून फळभाज्यांची रोपे उगवतात. अशा एकूण दहा प्रकारच्या सीड पेन्सिल यशच्या संग्रहात आहेत.
या पेन्सिलवर कार्टून, फळे, फुले फळे, मराठी-इंग्रजी वर्णमाला, गडकिल्ले, स्वातंत्र्यसैनिकाच्या प्रतिमा अशी चित्रं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्याची नावे या पेन्सिलवर आहेत. तसंच संत महात्म्यांचे विचार, जलसाक्षरता, स्वच्छता, आरोग्य जनजागृती अभियान, प्रबोधनात्मक विचाराच्या पेन्सिल त्यांच्या संग्रहात पाहायला मिळतात. आयुष्य अधिक समृद्धपणे जगण्याची दालने छंद खुली करून देत असतात. “छंद म्हणजे खरंतर जीवन शिक्षण” असल्याची प्रतिक्रिया यशचे वडील उत्कर्ष जैन यांनी दिली.
– अमोल सीताफळे

Leave a Reply