पिरेड्स, पॉडकास्ट आणि बरंच काही
‘स्त्रीलोक’ हा पिरेड्सवर बोलणारा पहिला मराठी पॉडकास्ट यावर्षीच्या महिला दिनापासून मी सुरू केला. पॉडकास्ट हे माध्यम आपल्याकडे नवं आहे. इअरफोन्स कानात घालून शांतचित्ताने एखादा अनुभव ऐकणे असं त्याचं स्वरुप आहे. थोडक्यात कथाकथनाच्या रेकॉर्डींग्स यायच्या त्याचं हे आधुनिक रुप.
दर महिन्याच्या ८ तारखेला spotify, gaana, apple podcast, google podcast या apps वर त्याचे एपिसोड्स ऐकता येतील. नुकताच त्याचा तिसरा एपिसोड झाला. “दिव्यांगत्व आणि मासिक पाळी” ज्यात दिक्षा दिंडे हीने आपला अत्यंत खासगी अनुभव मोकळेपणाने शेअर केला आहे.
मी कोण?
मी नम्रता भिंगार्डे, पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. प्रिंट, इलेक्टॉनिक, वेब माध्यमांमध्ये काम करत अनेक कौशल्य शिकत गेल्या १० वर्षांत डिजिटल स्टोरी टेलर म्हणून स्वतःला तयार केलं. सध्या पानी फाउंडेशन या संस्थेत डिजिटल मिडीया हेड म्हणून काम करतेय. ग्रामीण महाराष्ट्रात सुरू असलेल्या पानी फाउंडेशनच्या कामाचं प्रतिबिंब सोशल मिडीयावर उमटवणे हे माझ्या कामाचं मुख्य स्वरुप.
‘कलम’ वाली बाई ते ‘कप’ वाली बाई
झालं असं की २०२१ च्या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मी स्वतःच्या पाळीदरम्यान मेन्स्ट्रुअल कप वापरला. कप वापरण्याचा माझा अनुभव मी माझ्या फेसबुक अकाउंटवर लिहिला आणि काही तासांत १००० पेक्षा जास्त लोकांनी तो शेअर केला. अनेकजणांनी मला फोन केले. फोन्स आणि कमेंट्समधून लोकांना कपबाबत अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे असं जाणवलं. मग दोन दिवसांनी मी फेसबुक Live करून कप कसा दिसतो, मी कसा वापरला वगैरे माहिती सांगितली.
साध्या सोप्या मराठीत मी मेन्स्ट्रुअल कपविषयी दिलेली माहिती सोशल मिडीयावर इतकी व्हायरल झाली की त्यानंतर अनेक वृत्तपत्र आणि न्युज चॅनल्स यांनी मला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरही बोलायची संधी दिली. अनेक जणींनी सोशल मिडीयावर मला कपविषयी, शरीराविषयी, मासिक पाळीविषयी वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरूवात केली. कितीतरी जणींनी माझ्या त्या व्हिडीओतून प्रेरणा घेत स्वतः मेन्स्ट्रुअल कप वापरला आणि पॅडपासून सुटका करून घेतली.
सोशल मिडीयाची ताकद इतकी की सगळीकडे कपविषयी एक संवाद सुरू झाला. मला मिळालेल्या या प्रतिसादातून मेन्स्ट्रुअल कपविषयी अधिक तपशीलवार व्हिडीओज करावे असे वाटले. मग साईज कशी निवडायची, कप कसा घालायचा, कपविषयीचै गैरसमज असे एकूण ५ व्हिडीओज तयार करून माझ्या YouTube channel ला टाकले. त्यालाही २६ हजार पर्यंत views मिळालेले आहेत.
या सर्व प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे मासिक पाळीशी संबंधित महत्त्वाची माहिती सोप्या मराठीत इंटरनेट या माध्यमावर असणं ही अनेकींची गरज आहे. मासिक पाळी हा प्रत्येक घरातला विषय असूनही आपल्याकडे त्याविषयी फार अनास्था आहे. योग्य माहितीचा अभाव आणि त्याविषयी बोलण्याची चोरी यातून पिरेड्स हा विषय कमालीचा दुर्लक्षित राहतो. मलासुद्धा माझ्या कळत्या वयात पाळीबद्दल काहीच माहित नव्हतं. पण आता काळ बदलला आहे. मला पाळी आली तेव्हा आई ही एकमेव सोर्स ऑफ इन्फर्मेशन होती. पण आता सोशल मिडीयाद्वारेही आपल्याला चांगली-वाईट माहिती मिळण्याची सोय झाली आहे.
‘स्त्रीलोक’ काय आहे?
मासिक पाळीविषयी मराठीतून डिजिटल स्वरुपात माहितीचा साठा तयार व्हावा यासाठी ‘स्त्रीलोक’ हा प्रोजेक्ट मी सुरू केला. मासिक पाळी आणि आरोग्य या विषयी सर्व वैज्ञानिक आणि आधुनिक माहिती लेख, व्हिडीओ, पॉडकास्ट, रिल्स, स्टोरीज अशा माध्यमातून आपल्या मराठी भाषेतून डिजिटल विश्वात रहावी यासाठी मी काम करणार आहे.
सुरूवातीला केवळ आयडीयाच्या स्वरुपात असलेल्या माझ्या प्रोजेक्टला आकार देता यावा म्हणून मी City University of New York मध्ये Entrepreneurial Journalism या कोर्ससाठी प्रवेश घेतला. १०० दिवसांचा हा ऑनलाईन प्रोग्राम आहे. जगभरात पत्रकारिता पिंड असलेले creators त्यांची आर्थिक घडी बसवत जिवंत ठेवलेले त्यांचे प्रोजेक्ट्स घेऊन आमच्या सोबत चर्चा करतात.
पुढच्या दोन वर्षांत ‘स्त्रीलोक’ या प्रोजेक्टमधून मला स्त्रियांच्या मासिक पाळीविषयी अधिकाअधिक माहिती सोप्या मराठीत डिजिटल स्वरुपात सादर करायची आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी काय करता येईल यावरही माझं काम सुरू आहे. स्त्रीलोक या पॉडकास्टच्या प्रत्येक एपिसोडला मिळत असलेल्या प्रतिसादांमुळे, मासिक पाळीविषयी सोशल मिडीयावर संवाद सुरू केल्याबद्दल माझं कौतुक करणाऱ्या, आशीर्वाद देणाऱ्या असंख्य लोकांमुळे मला विश्वास आहे की जो घाट घातला आहे तो वाया जाणार नाही. ‘स्त्रीलोक’च्या लिंक पुढीलप्रमाणे –

Leave a Reply