शिक्षकांनी मनात आणलं तर काय होऊ शकतं, याचा प्रत्यय पिंपळादेवीची जिल्हा परिषद शाळा पाहिल्यावर येतो. पिंपळादेवी, बीड तालुक्यातलं साधारण ४० किलोमीटरवरचं सुमारे ३०५ कुटुंबांचं गाव. ऑफलाईन शाळा तर सुरू करायची आहे पण कशी? असा प्रश्न पुन्हा शाळा सुरू करायच्या वेळेस मुख्याध्यापक लक्ष्मीकांत खडकीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना प्रश्न पडला होता. शाळेची अवस्थाच तशी होती. त्यामुळे मुलं यायला तयार होत नव्हती.
कोरोनानंतर शाळेतली मुलांची उपस्थिती वाढण्याची गरज होती. पण रंग उडालेल्या शाळेचं रूप पालटण्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न शिक्षकांना पडला. ग्रामस्थही मदतीसाठी उत्सुक नव्हते. मग खडकीकर सरांनी ठरवलं. आपल्या सहकाऱ्यांसमोर प्रस्ताव ठेवला, ”कोरोना काळात शाळा सुरू नसतानाही आपल्याला शासनाकडून पगार मिळाला आहे. तो आपण आपल्या शाळेसाठी खर्च करू.” सहशिक्षक बी.जे.कथले, अ.गो.कुलकर्णी, एम.बी.गायकवाड यांनीही या प्रस्तावाचं स्वागत केलं. या तीन शिक्षकांनी प्रत्येकी पाच हजार असे पंधरा हजार रूपये आणि खडकीकर सरांनी २२ हजार रूपये असे एकूण ३७ हजार रूपये रंगकामावर खर्च केले. केवळ आठ दिवसात नववर्षाच्या सुरुवातीला ही रंगरंगोटी झाली.
शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या असून बदललेलं रूप पाहून मुलंही शाळेत यायला लागली आहेत. आता दोन दिवसात शाळेतील पाच वर्गाची आतून रंगरंगोटी केली जाणार आहे. भिंतीवर उजळणी, मराठी शब्द, इंग्रजी शब्द, गुणाकार, भागाकार, भूमितीच्या आकृत्या ,कविता ,चित्र असे डिजीटल बॅनर बसवले जाणार आहेत.
-दिनेश लिंबेकर, बीड