कर्मचाऱ्यांना सन्मान देणारा पोलीस अधीक्षक
धुळे जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वार्षिक तपासणी आणि सेवा पुस्तिकेवर बक्षीसांच्या नोंदी म्हणजेच शेरे मारण्याचा प्रसंग. काही पोलीस कर्मचारी अधीक्षकांच्या दालनात गेले. धुळ्याचे पोलीस अधिक्षक आहेत चिन्मय पंडित. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना खुर्च्यांवर बसवून घेतलं. त्यांची चौकशी करून समस्या जाणून घेतल्या. एरवी कर्मचाऱ्यांना या दालनात बसायलाही मिळत नाही. त्यामुळे अधीक्षकांनी सन्मानाची वागणूक दिल्याचा गेल्या 10 ते 15 वर्षातील हा पहिला अनुभव ठरल्याचे अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले. यामुळे नक्कीच आमचे मनोबल वाढेल, अशा प्रतिक्रीया महिला पोलिसांसह अन्य कर्मचार्यांच्या होत्या.
पोलीस दलात दरवर्षी पोलिसांच्या कामाचे मुल्यमापन होते. पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे आणि त्यांनी बजावलेल्या सेवेबाबत त्यांच्या सेवा पुस्तिकेत नोंदणी होऊन कर्मचार्यांना विविध प्रकारच्या बक्षीसांच्या नोंदी होतात. ही तपासणी करताना पोलिसांना स्वच्छ गणवेश आणि खांद्यावर पदांच्या फिती लावून जावं लागतं. मात्र, या तपासणीवेळी अनेक पोलिसांची भंबेरी उडते. अधिकारी काय प्रश्न विचारतील, काय सूचना करतील याची भीती प्रत्येकाच्या मनात असते. शिवाय, दालनात गेल्यावर अर्धा ते पाऊण तास उभं राहून अधिकार्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार, यामुळेच अनेकांचा थरकाप होतो. “यापूर्वी तपासणीवेळी दालनात उभं राहून प्रश्नांची उत्तरे देण्यासह तपासणीला सामोरे जाण्याचे प्रसंग घडले आहेत. परंतू, आज आम्ही दालनात जाताच साहेबांनी आम्हाला खुर्चीवर बसवून विचारपूस केली. यामुळे आम्हाला आश्चर्य वाटलं. आपल्या कर्मचार्यांना खुर्चीवर बसवून सन्मानाची वागणूक देणारे अधिकारी खूप कमी असतात. हा अनुभव खुपच सुखद होता,” असं महिला पोलीस कर्मचारी कल्पना ठाकूर सांगतात.
अशा तपासणीवेळी अनेकांना चक्कर येऊन कोसळणे, रक्तदाब वाढणे, हातपाय थरथरणे, असे अनेक प्रकार घडतात. यामुळे अनेक कर्मचारी तणावात असतात. यावेळी मात्र दालनातून बाहेर आलेल्या पोलिसांच्या चेहर्यावर समाधान होते. आम्हाला दालनात उभे न करता खुर्चीवर बसवून विचारपूस करण्यात आली. असं दहा वर्षात पहिल्यांदा झाल्याचं पोलीस नाईक प्रभाकर बैसाणे यांनी सांगितलं.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित म्हणतात, पोलीस हा देखील माणूसच आहे. त्यांना आपल्या दालनातील खुर्चीवर बसवून सन्मानाची वागणूक देणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे हे आमचे कर्तव्य आहे. यातून त्यांचे मनोबल वाढते, त्यांना कामात स्फुर्ती मिळते. शिवाय, त्यांच्या मनातील अनेक प्रश्नांचे निराकरण होते.
– कावेरी परदेशी धुळे

Leave a Reply