पोटासाठी दाही दिशा

विक्रम अल्लावर. मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील एक्कलबार गावचे. बायको आणि दोन मुलांसह मजुरीचे काम करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून नाशकात आले आहेत. एकूण चार मुलं. दोन मुलं आई वडिलांबरोबर गावी तर दोन सोबत आहेत. गावाकडे छोटी शेती आहे मात्र पाणी नाही. तिच्यात पावसाळ्याखेरीज काही पिकत नाही. त्यांच्या पत्नी दसरी म्हणाल्या, ‘गावमे थोडी खेती है पर मेरे पती और दो देवर ऐसा मिलके बडा परिवार हैl थोडीसी कमाई मैं कैसे गुजरा करे ये हि समज मैं नही आताl पहली बार गाव छोडके इतनी दूर आये हैl नही तो आजतक आसपास के गाव मैं खेती का हि काम करते थेl पर थोडा बहुत पैसा मिल सकता है ये पता चला तो यहा पे आ गयेl’
बडवानी जिल्ह्यातून तीन कुटुंब आणि १५ ते २० लोक आले आहेत. त्यांच्या कंत्राटदाराने नाशिकच्या कॉलेज रोड भागात मोकळ्या मैदानावर त्यांची राहण्याची सोय करून दिली आहे. त्यांच्या पैकीच एक असणाऱ्या किरमाला गावच्या धनिलाल यमरे याने सांगितले, ‘मी नाशिकला पहिल्यांदाच आलो आहे. नाईलाज म्हणून आणि दोन पैसे जास्त मिळतील या हेतूने एवढ्या लांब आलो. येथील वातावरण चांगले आहे. लोक चांगली आहेत. शेठ पण काळजी घेतो. अजून एक महिन्यानंतर मात्र गावी जायचं आहे.’ असं म्हणताना त्याच्या डोळ्यात गावाकडे जाण्याची आस दिसली.
परराज्याबरोबर महाराष्ट्रातच्या काना कोपऱ्यातूनही लोक नाशिक किंवा पुण्यामुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये रोजगाराच्या शोधात दाखल होतात. वैजापूरच्या कैलास जाधव यांच्याशी बोलल्यावर त्याचा प्रत्यय येतो. ते म्हणाले, मी गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये मजुरीचे काम करतोय. गावाकडे थोडी शेती आहे, छोटं घर आहे. पण हाती फारसा पैसा लागत नाही. त्यामुळे गावाबाहेर पडण्यावाचून पर्याय नव्हता. इथे कष्ट करावे लागतात पण हातात दोन पैसे पडतात याचं समाधान वाटतं. जाधव यांचा एक मुलगा फॅब्रीकेशनच काम करतो तर एक मुलगा शिकतो आहे. पत्नी मुलांसह ते भाड्याच्या घरात राहतात. करोना काळात आणि विशेषतः कडक लॉकडाऊन असताना हातात अजिबात पैसा नव्हता तेव्हा फार हाल झाले हे मात्र सर्वजण एकमुखी आवर्जून सांगतात. अन्नवाटप होत होते, किराणा मदतही मिळत होती मात्र हाती कामही नव्हते आणि पैसाही नव्हता त्यामुळे सगळंच कठीण झालं होतं. त्या दिवसांच्या आठवणीही नको वाटतात असे ते नमूद करतात. मोलमजुरी करून पोट भरताना पैशाच्या मारामारीशी तडजोड करत जीवन जगावं लागतं, ही त्यांची शोकांतिका आहे.

  • भाग्यश्री मुळे, नाशिक

Leave a Reply