अंधांना नवी दृष्टी देणाऱ्या परीताई
रिताली कॉलेजमध्ये शिकते, लहानपणीच तिची दृष्टी गेली. ”सध्या आपण तिच्यासोबत आहोत, पण पुढे काय, स्वतःचं स्वतः आवरणं, थोडाफार स्वयंपाक, अगदीच पूर्णपणे कोणावर अवलंबून राहावं लागू इतपत बेसिक गोष्टी तरी तिला जमायला हव्यात, पण कसे…” तिच्या पालकांना वाटणारी चिंता.
राणी अंधत्वावर मात करून चांगली शिकली, आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी आईबाबा नाहीतर कोणी मैत्रीण तरी सोबत असायचीच. पण आता रोज ऑफिसला कसं एकटं जायचं…
सचिनला वाटतंय आपणही दादासारखी मोठ्या कंपनीत, मोठ्या हुद्द्याची नोकरी करावी, हुशार तर आपणही आहोत पण दिसत नाही तर आपण काम करू शकू का…
या सगळ्याची तयारी मुंबईतली स्नेहांकित हेल्पलाईन करून घेते. गेली २१ वर्ष ही संस्था काम करत आहे. संस्थापिका परिमला भट सांगतात, ”समाजात राहायचं तर आपल्याला सर्व गोष्टी यायलाच हव्यात. तर आपण ‘इक्वल फुटिंग’वर येऊ. आता तर आपल्या मदतीला तंत्रज्ञानही आहे.” अंधत्व हे आव्हान असलं तरी बुद्धिमत्ता, धडाडी, जिद्द असेल तर माणूस किती उंची गाठू शकतो याचं उदाहरण म्हणजे परिमला भट. परीताई, साठीच्या पुढच्या पण अद्ययावत तंत्रज्ञानाची, आजच्या काळाची उत्तम जाण असलेल्या. वाचन, गिर्यारोहणासारखे छंद जोपासणाऱ्या.
परीताईंचं स्वतःचं शिक्षण सर्वसामान्य मुलांसाठीच्या शाळा- कॉलेजमधलं. रुईया-रुपारेल- निर्मला निकेतन. शिकत असतानाच अंध विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींची, जसं की परीक्षेला लेखनिक न मिळणं, पुस्तकं ब्रेलमध्ये उपलब्ध नसणं, ती वाचून दाखवायला कोणी नसणं याची जाणीव होत गेली. परीताईंचे वडील विष्णू भट पत्रकार तर आई नमाताई भट कमला मेहता अंध विद्यालयात प्राचार्य. त्यामुळे इतरांसाठी काम करण्याची प्रेरणा आणि दिशा घरातूनच मिळाली. ”घरातून मिळणारी दिशा, संस्कार, प्रोत्साहन खूप महत्त्वाचं असतं.” परीताई सांगतात. शिक्षण झाल्यावर पहिली नोकरी कमला मेहता अंधशाळेत. त्यानंतर एअर इंडियात वैद्यकीय समाजसेवा अधीक्षकपदी नोकरी करून अंध महिला विकास समिती, नॅब अशा काही माध्यमातून त्यांचं काम सुरू होतं. अंध महिलांना पणत्या, पिशव्या, राख्या यातून रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिला.
अंध व्यक्तींपुढला तेव्हाचा मोठा अडसर म्हणजे १० वीच्या पुढे ब्रेल लिपीतून पुस्तकं उपलब्ध नसणं. मुंबई परिसरात या मुलांसाठी पुस्तकं ध्वनिमुद्रित करण्याच्या कामापासून २१ ऑगस्ट २००१ मध्ये ‘स्नेहांकित हेल्पलाईन’ ची सुरुवात परीताईंनी केली. मग वेगवेगळ्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून मागणी होऊ लागली. राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली इथल्या विद्यार्थ्यांनाही संस्थेनं सीडी पुरवल्या. परीताई सांगतात, ”या सर्व कामांसाठी स्वयंसेवकांची मोठी गरज होती. तेव्हा वृत्तपत्रांनी याविषयी जागृती करून मोठी मदत केली. विशेषतः समीर कर्वे आणि राजीव खांडेकर यांनी खूप मदत केली. आता बदलतं तंत्रज्ञान आणि कोविडपासून आम्हीही व्हॉट्सअप, टेलिग्राम, वुई ट्रान्सफरकडे वळलो आहोत.” संस्था आणि संस्थेशी जोडलेल्या अनेक स्वयंसेवकांमुळे अंध मुलांना वाचक, लेखनिक, ब्रेल लिपीत पुस्तकं मिळाली आहेत.
परीताईंच्या मते, पूर्वीपेक्षा आताच्या स्थितीत पुष्कळ फरक पडला आहे. आता अंध मुलांना प्रवेश देणाऱ्या सामान्य शाळांच्या संख्येत तुलनेनं वाढ दिसते. तंत्रज्ञान, बदललेले नियम यामुळे आता मुलं गणित, विज्ञान, इंजिनिअरिंग हवं ते शिकू शकतात. या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचायल्या हव्या. बँकेतल्या नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा मुलांनी आता कॉर्पोरेट क्षेत्रासाठी प्रयत्न करायला हवेत. जे आव्हानात्मक आहे ते करण्याचा प्रयत्न करायला हवा. आज संस्थेची काही मुलं आयबीएम, जेपी मॉर्गनसारख्या कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. पण कामासाठी हुशारी, कौशल्य असूनही नोकरी देताना अंध व्यक्तींसोबत भेदभावाच्या घटना अनेकदा घडतात, अशी खंत त्या व्यक्त करतात. अपंगांमध्ये २१ श्रेणी आहेत. रोजगार मेळाव्यात प्राधान्य हातापायाचे अपंगत्व, मग मूकबधीर, नंतर अल्प दृष्टी असलेल्यांना आणि सर्वात शेवटी विचार अंध व्यक्तींचा होतो. शिकवलं तर अंध व्यक्ती सर्व काही करू शकतात, हे समाजानं स्वीकारायला हवं, असं आवाहन त्या करतात.
स्मार्ट फोन, कॉम्प्युटर, इंग्रजी संभाषण, कम्युनिकेशन स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखत कार्यशाळा संस्था घेते. ”मुलाखतीला जाताना एकटे जा, लॅपटॉप घेऊन जा, त्यावर कसं काम करता ते दाखवा, मुलाखत कक्षात प्रवेश कसा करायचा, ड्रेसिंग कसं असायला हवं, हे सारं मुलांना शिकवलं जातं. सही कशी करायची, पांढरी काठी वेगवेगळ्या ठिकाणी कशी वापरायची, एकट्यानं प्रवास कसा करायचा, वित्तीय व्यवस्थापन, गृह व्यवस्थापन शिकवलं जातं. अल्प दृष्टी असलेल्यांना जुहूमधल्या ‘लोटस आय’ हॉस्पिटलच्या मदतीनं दृष्टी क्षमता थोडी वाढवता येईल का याची चाचपणी करून मार्गदर्शन केलं जातं.
”जी मुलं सामान्य मुलांच्या शाळेत शिकतात, आईवडिलांसोबत राहतात त्यांना चांगल्या प्रकारे एक्स्पोजर मिळतं पण काही वेळेस ती ‘ओव्हर प्रोटेक्टड’ असतात, असा अनुभव निवासी कॅम्पमध्ये येतो. याउलट विशेष शाळेतली मुलं अनेक गोष्टी करू शकतात. पण या दोन्ही प्रकारच्या शाळांची गरज आहे. सरसकट सर्व मुलं सामान्य शाळेत नाही शिकू शकत. दोन्हीपैकी कुठल्या प्रकारच्या शाळेची निवड करायची ते त्या मुलाची क्षमता, कुटुंबाची स्थिती, या सर्व बाबींवर अवलंबून असतं. अभ्यासासोबत मुलाचा संपूर्ण विकास महत्त्वाचा आहे.” परीताई सांगत होत्या. विशेष शाळेतल्या मुलांना सतत मार्गदर्शन करावं लागतं. अनेकांसमोर ध्येय नसतं, विचार व्यक्त करता येत नाहीत, त्यांना पूर्णपणे घडवावं लागतं. संस्था अंध मुलामुलींसाठी निवासी शिबीर भरवते. मागच्या वर्षी मे महिन्यात कोसबाडला झालेल्या शिबिरात १४ ते २१ वयोगटातली ३५ मुलं होती. विशेष प्रशिक्षक आणि स्वयंसेवक शिबिरात बऱ्याच गोष्टी शिकवतात. स्वयंसेवकांना अंधांच्या अडचणींची जाणीव व्हावी यासाठी संस्था मार्गदर्शन करते. ”अंधांशी बोलताना स्पेसिफिक राहावं लागतं.” ताई समजावून सांगतात, ”नुसते इकडे ये सांगून उपयोग नाही. उजवीकडे, डावीकडे असं स्पष्ट सांगावं. प्रवासात लोक खूप उत्साहानं मदतीला पुढे सरसावतात, पण काही वेळेस जिथे जायचं नसतं तिथे नेऊन सोडतात, त्यातून अंधांचा अधिक गोंधळ उडतो. त्यापेक्षा मदत हवी आहे का आणि कशा प्रकारची असं विचारावं. त्याचप्रमाणे अंध व्यक्तींनीही मदत नाकारताना अत्यंत नम्रपणे नाकारावी.”
तरी परीताईंच्या मते एकूणच मुंबईत एकूण अंध व्यक्ती एकटी फिरू शकते. देशात इतर ठिकाणी मात्र हे फार कठीण होतं. प्रयत्न चालू असले तरी रस्ते, रेल्वे, इमारती, वाहतुकीची साधने अधिकाधिक ऍक्सेसिबल झाली पाहिजेत, अशी मागणी त्या करतात. परिषदा, व्याख्यानांच्या निमित्ताने परीताईनी परदेश प्रवास केला आहे. विकसित राष्ट्रांमध्ये सगळ्याच बाबी ऍक्सेसिबल आहेत. तिथे अंधांना फिरताना पांढरी काठी लागत नाही. पायाभूत सुविधांसोबतच सगळ्या वेबसाईट्स, खाण्यापिण्यासारख्या सेवा पुरवणारी अँप्स, ग्रंथालयं ऍक्सेसिबल होण्याची गरज परीताई व्यक्त करतात. ‘ब्रेल कन्व्हर्ट टू प्रिंट, प्रिंट टू ब्रेल’ हा क्रांतिकारी बदल असल्याचं त्या सांगतात. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलं तरी ‘ब्रेल मी (Braille Me)’ सारख्या उपकरणांची किंमत जवळपास ३७ हजार आहे. ऑर्बिटही तसेच खर्चिक. या उपकरणांवरील जीएसटी रद्द झाला तर त्याची किंमत थोडी कमी होण्यास मदत होऊ शकेल, अशी भूमिका त्या मांडतात.
संस्थेची सध्या अंधेरी, डोंबिवली आणि विले पार्ले अशी तीन केंद्र आहेत. विले पार्ले इथं सावरकर केंद्रात सोमवार ते शुक्रवार १ ते ५ या वेळेत उपक्रम चालतात. पण वेळेची मर्यादा येत आहे. त्यामुळे केंद्राला मोफत वापरण्यासाठी जागेची गरज आहे. महापालिकेनं जरी २ वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्या तर मोठी मदत होईल, असं परीताई सांगतात.
आपल्या कार्यातून अनेकांच्या जीवनातली नकारात्मकता घालवून त्यांना नवी दिशा देणाऱ्या परिमला भट यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
४ पेटंट, स्वतःची कंपनी आणि २०० अंध व्यक्तींना रोजगार देणारे सागर पाटील
”लहानपणी रेडिओ माझा सोबती. ऐकण्यासोबतच तो चालतो कसा याविषयी प्रचंड कुतूहल. त्यामुळे आईबाबा काम करायला शेतावर गेले की रेडिओ उघडायचो. रेडिओ बंद पडला तेव्हा नवा रेडिओ त्याच मॉडेलचा आणला. तो उघडला, वायर बघितल्या आतल्या आणि त्याप्रमाणे जुन्या रेडिओची जुळवाजुळव करून तो चालू केला. दुरुस्तीला रेडिओ नेल्यावर दुकानदार काय करतात, ते समजून घ्यायचं, प्रयोग करायचे. हाच प्रकार टीव्ही, गावात लोडशेडिंगच्या इलेक्ट्रॉनिक कंदिल आणि इतर उपकरणांबाबत. ”स्वतःच्या अंधत्वावर मात करून इलेक्ट्रॉनिक्स आणि सौर ऊर्जा क्षेत्रातले उद्योजक, आयडिअल इनोव्हेटिव्ह ग्रुपचे संस्थापक सागर पाटील सांगत होते. सागर मूळचे रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातल्या रेवसजवळच्या नवखार गावचे. जन्मतःच मोतीबिंदूमुळे दृष्टिदोष. ऑपरेशननंतर थोडंफार दिसू लागलं पण खेळताना डोळ्यांवर झालेल्या आघातात दृष्टी गेली. तेव्हा गावात अंध मुलाचं शिकणं कठीण, हाच समज असल्यानं सुरुवातीची वर्ष शाळेशिवायच चालली असताना मुंबईला लग्न होऊन सासरी गेलेल्या मावशीची गाठभेट आयटीआयमधून शिकलेल्या काही दृष्टिबाधित व्यक्तींशी झाली. त्यांच्याकडून काही गोष्टी कळल्यावर छोट्या सागरला वरळीच्या हॅपी होम स्कुल फॉर ब्लाइंड या शाळेत घालण्यात आलं. मुळातच बुद्धिमान असणाऱ्या सागरनं शालेय शिक्षणातही चांगलीच प्रगती केली. एकीकडे मित्र, ओळखीच्या व्यक्तींचे रेडिओ, टेपरेकॉर्डर, वॉकमन, इमरजन्सी लाईट दुरुस्त करणं सुरूच होतं. बाहेरच्या दुकानदारांपेक्षा तुलनेनं कमी पैशात सागर उत्तम काम करून देत असल्यानं ओळखीत कामं होत होती. १० वी पर्यंत त्यांनी सोल्डरिंगवर मास्टरी मिळवली. सागर सांगतात, ”सुरुवातीला चटके बसले पण आता चटके न बसता दुसऱ्याला शिकवताही येतं. सोल्डरिंगची प्रक्रिया, तंत्र लक्षात घेऊन डोळस व्यक्ती करतात त्या प्रकारे सोल्डरिंग न करता स्वतःचं पर्यायी तंत्र यासाठी विकसित केलं.”
विद्युत कामांसाठी टेस्टर गरजेचा. पण त्यात दिसणारा प्रकाश तर सागर पाहू शकत नव्हते, मग त्यांनी बीप आवाज करणारा टेस्टर विकसित केला. दुरुस्तीच्या वेळी बोलक्या मल्टीमीटरची गरज भासली तेव्हा अमेरिकेतल्या एका नातलगाकडून तो मागवला. या दोन उपकरणांमुळे विद्युत उपकरणांवर स्वतंत्रपणे काम करण्यात सागरला यश मिळालं.
वर्ष २००६-०७ मध्ये १२ वी झाल्यावर इलेक्ट्रॉनिक्स शिकण्याची इच्छा होती पण अंधत्वामुळे अनेक महाविद्यालयांमधून नकारच मिळाला. आज याच महाविद्यालयांमध्ये सागर गेस्ट लेक्चरर म्हणून जातात.
१२ वी नंतर मग सागरनी रुईया कॉलेजमध्ये आर्ट्सला प्रवेश घेतला. त्याच दरम्यान कॉम्प्युटर शिकून स्वतःच इलेक्ट्रॉनिक्स शिकायला सुरुवात केली. रुईयात संगणक केंद्राचं काम पाहताना हार्डवेअर शिकून घेतलं. एकट्यानं ही कामं करता यावीत यासाठी स्वतःची काही साधनं तयार केली.
एम.ए पूर्ण झालं. नोकरी करायची नाही तर स्वतःचा व्यवसाय करायचा हे खूप आधीपासूनच सागरनं ठरवलं होतं. चार्जेबल लाईट्स बनवायला सुरुवात केली. २०१३ पासून स्वतःहून डिस्चार्ज न होणाऱ्या लाईट्स निर्मिती केली. फ्रिज, मिक्सर, वाशिंग मशीन सौर उर्जेवर चालतात. पंखे, हेडलाईट, दीपमाळा, बॅटरी विकसित केले. ”सुरुवातीला ओळखीतूनच कामं मिळत होती, मात्र अशा प्रकारे कुठला व्यवसाय नाही उभा राहू शकत, हे तेव्हाच लक्षात आलं होतं.” सागर सांगतो. त्याच म्हणजे २०११-१२ च्या सुमाराला सी डॅक कंपनीला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम विकसित करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर विकसित करायचं होतं. तेव्हा सागरला त्यांनी दोन वर्षांसाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलं. सागर यांच्या संगणकीय हुशारीची चुणूक कॉलेजमध्ये असतानाच दिसली होती. सागर विद्युत सुरक्षेसंदर्भातल्या एका कार्यशाळेला गेला होता. प्रेझेंटेशन सुरू असतानाच ऐन वेळी काहीतरी बिघाड झाला. आयोजकांनी खूप प्रयत्न केले पण कॉम्प्युटर काही सुरू होईना. तेव्हा सागर पुढे आले आणि काही मिनिटातच त्यांनी कॉम्प्युटर कार्यान्वित केला. सी डॅकमधल्या संधीनंतर आकाशवाणीत मुलाखत झाली. मग इतरही काही माध्यमातून बातम्या आल्या. ”याचा उपयोग लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, लोकांमध्ये नव्या प्रकारचा विश्वास, नवी ओळख प्राप्त करण्यासाठी झाला,” असं सागर सांगतो.
२०१३ मध्ये आयडिअल इनोव्हेटिव्ह ग्रुपची स्थापना सागरने केली. सौर दिवे, पॉवर सेव्हर, पोर्टेबल लाईट्स ही उत्पादनं कंपनीनं सुरू केली. सागर यांनी विकसित केलेल्या स्पेअर पार्टसमध्ये टाटा पॉवर, महिंद्रा अँड महिंद्रा, राष्ट्रीय केमिकल्स फर्टीलाइजर्स यासारख्या कंपन्यांनी रस घेतला. या सोबत इतर अंध व्यक्तींना कुठलीही फी न घेता त्यांनी शिकवायला सुरुवात केली होती. पण पैसे कमी पडत होते. ”टाटा पॉवरसारख्या कंपन्या माझी उत्पादनं वापरत होत्या. त्यातूनच या कामासाठी कंपन्यांची मदत घेण्याचं सुचलं. आणि मग जानेवारी २०१७ मध्ये आयडिअल इनोव्हेटिव्ह ग्रुप-एड्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना झाली.” सागर सांगतात. ऍक्सेसिबल टेस्टर, ऍक्सेसिबल पल्स, फ्रिक्वेन्सी पोलॅरिटी टेस्टर आणि सौर उर्जेवर चालणाऱ्या बेरीज बनवण्याचं पेटंट त्यांनी प्राप्त केलं. ही साधनं वापरून अंध व्यक्ती काम करू शकतात. सागर यांनी प्रशिक्षण दिलेल्या २०० अंध व्यक्ती सध्या काम करत आहेत. ७० ते ७५ जण स्वतःचा व्यवसाय करत असून १४ जण वेगवेगळ्या जिल्ह्यात सागर यांच्या कंपनीची फ्रँचायझी चालवत आहेत. प्रशिक्षणामध्ये कामासोबतच स्केअर पार्टस, उत्पादनाला मार्केट कुठलं मिळेल, लोकांना ती कशी विकायची याचीही कौशल्य शिकवली जातात.
अंध व्यक्ती आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांनी आजच्या कालानुरूप बदलण्याची गरज सागर व्यक्त करतात. संस्थांनी कागदी पिशव्या, उदबत्त्या यातून अंध व्यक्तींना तुटपुंजा रोजगार उपलब्ध करून देण्यापेक्षा कागदी पिशव्या तयार करणारं मशीन अंध व्यक्ती कशी घेऊ शकेल, त्यातून व्यवसाय कसा उभारू शकेल, हे पाहणं आवश्यक असल्याचं ते म्हणतात. ट्रस्टच्या माध्यमातून अंध व्यक्तींसाठी विविध उपक्रम, यूट्यूबच्या माध्यमातून मूकबधिरांसाठी देशातलं पहिलं चॅनल, सौर ऊर्जेचा प्रसार, सुरक्षित ऊर्जेचा प्रसार अशा अनेक गोष्टी सागर करतात. शॉकप्रूफ इंडिया हे आपलं ध्येय असल्याचं सांगून परदेशातला वीज वापर आणि आपल्या इथला वापरयातील फरक, घरात चुकणाऱ्या गोष्टी त्यातून घडणारे अपघात याची विस्तृत माहिती सागर देतात.
शिक्षण पूर्ण झालं तेव्हा त्यांनी त्यानं आपलं गावाचं घर सौर उर्जेवर चालणारं घर केलं. फ्रिज, मिक्सर अशी उपकरणं १२ व्होल्ट वर चालवण्यासाठी योग्य ते बदल केले. मग बोरिवलीतलं घर कमीत कमी उर्जेवर चालणारं केलं.
प्रत्येक अपंगानं स्वयंपूर्ण, स्वावलंबी आणि सन्मानपूर्वक जीवन जगावं, असं आपल्याला वाटत असल्याचं सागर पाटील सांगतात. त्यांच्या प्रत्येक उपक्रमात पत्नी नेत्राची उत्तम साथ त्यांना आहे.
बॅंकेत काम करताना…
बँकेत काम करणारी नवी उमेदची मैत्रीण अनुजा संखे घोडके हिचा अनुभव तिच्याच शब्दात –
एप्रिल २०१५. ओजसच्या वेळची प्रसुती व्हायला मोजून १५ दिवस असताना कळलं की, एका राष्ट्रीयकृत बॅंकेत माझी कारकून म्हणून निवड झाली आहे. मी मनापासून आनंदून गेले. येणारं मूल, संसार आणि माझं आर्थिक स्वातंत्र्य असे बरेच प्रश्न या बातमीने एका क्षणात निकालात काढले होते. मी प्रसुतीनंतर ६ महिन्यांनी नोकरीत रुजू झाले आणि हळूहळू अनुभवांची जंत्री जमा व्हायला लागली. मी सुरुवातीला अंबरनाथच्या शाखेत होते. बदलापूरहून तिथं जायचे. भरत नेहमी सोबत असल्याने गर्दीचा प्रवासही फक्त दोघांचा व्हायचा पण, हळूहळू लक्षात यायला लागलं की, बाळाला सोडून ऑफिसला जाणं नको वाटतं. अतिशय कंटाळा येतोय, नोकरी नसली तरी चालेल असं काहीसं वाटतंय. असं वाटण्यामागचं मुख्य कारण होतं, ऑफिसात काहीच काम नसणं.
अंध म्हणून माझी बॅंकेतली पहिलीच नोकरी होती. त्यामुळे कॉर्पोरेट शैलीतला माझा पहिलाच अनुभव होता. तर, एका अंध व्यक्तीबरोबर काम करण्याचा इतर सहकाऱ्यांसाठीही पहिलाच अनुभव होता. मला आठवतं, एक अधिकारी बाई तिथं होत्या. वयानं फार मोठ्या नसाव्यात. किंबहुना माझ्यापेक्षा लहानच होत्या. पण, त्या माझ्याशी थेट, सरळ संवाद साधतच नसत. मी जेवायला समोर बसले असून त्या शेजारच्या मॅडमला विचारायच्या, “ही जेवली का?” पहिल्यांदा मला वाटलं की, त्यांना माझ्याशी कसं बोलावं असा त्यांना प्रश्न पडत असेल. म्हणून मीच एक-दोनदा उत्तर दिलं. पण, नंतर लक्षात आलं की, त्यांना माझ्याशी बोलायचं नसायचं. शिवाय, मला काही कळत नाही असंही त्यांना वाटायचं. पण, मी हळूहळू या प्रकाराकडे दुर्लक्ष करायला शिकले. त्यांना मी काम करत नाही तरी मला पूर्ण पगार मिळतो याचा त्रास होत असे. त्यांनी असं मला ऐकू येईल इतपत मोठ्यानं दुसऱ्या एका मॅडमला हे ऐकवल्यावर मात्र मी ऑफिसच्या मध्यावर मोठ्यानं म्हटलं होतं की, मला पगार आर.बी.आय देते आणि काम करण्यासाठी आवश्यक संगणक आणि स्क्रिन रिडर सॉफ्टवेअर आपल्या बॅंकेने द्यायला हवं. ते मिळूनही मी काम नाही केलं तर हे ऐकून घेईन. पण, पुन्हा असं उगाच मला काही बोललात तर मात्र तक्रार करीन.
पुन्हा त्या बाई वाटेला, बोलायला कशालाच संपर्कात आल्या नाहीत. बदली होऊन वसईला आल्यावर असाच एक कटू अनुभव एका खातेधारकाकडूनही आला होता. मी पासबूक प्रिंटिंग करतेय म्हटल्यावर मला काहीही न बोलता थेट शाखा व्यवस्थापकांकडे जाऊन तो माणूस मोठ्यांदा म्हणाला, “इस अंधी को इधर क्यों बिठाया है?” तेवढ्याच मोठ्यानं, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर मधाचं बोट ठेवण्याची बॅंकेची शिकवण आमच्या सरांनी बाजूला ठेवून म्हटलं होतं, “वह मेरे अधिकार में यहां काम करती हैं. अगर आप को कोई दिक्कत है तो आर.बी.आय को कम्प्लेंट करें या फिर किसी और शाखा में जाकर पासबूक प्रिंट करवाएं. लेकिन, फिर इस तरिके से उन से बात की तो पुलीस कम्प्लेंट हो सकती है.” नंतर मला कळलं की, माझी तक्रार करणारा ज्येष्ठ नागरिक स्वतः पायाने अपंग होता.
२०१७ मध्ये मी अधिकारी पदासाठीची बॅंकेची परीक्षा दिली आणि दुसऱ्या राष्ट्रीयकृत बॅंकेत अधिकारी म्हणून २०१७ साली रुजू झाले. गेली ५ वर्ष मी इथेच काम करते. आजवर ३ शाखांमध्ये काम केल्यावर बऱ्यापैकी संगणकीय काम मी शिकले आहे. बॅंकेत नोकरी म्हणजे एका ठिकाणी बसून अनेक माणसांना भेटण्याची संधी. काम करताना त्या माणसांच्या आवाजापेक्षा, नावापेक्षा त्यांच्या खातेक्रमांकाने त्यांची ओळख पटायला लागते. तो नंबर कानावर पडला की, माणूसच ओळखीचा वाटायला लागतो. मी सुरुवातीला विरार प. शाखेत काम करत असताना इथेही पहिल्या बॅंकेसारखंच संगणक आणि स्क्रिन रिडर सॉफ्टवेअर मिळेपर्यंत काहीच काम नसायचं. पण, सहकाऱ्यांनी खाते उघडण्याची सर्व प्रक्रिया समजावून सांगितली आणि लोकांकडून अर्ज भरून, कागदपत्र बरोबर आहेत का याची खात्री करून घेण्याची जबाबदारी दिली. मी लोकांसोबत बोलू लागले. हळूहळू लोकांशी बोलण्यातली भीती गेली. त्यांना माहिती नसलेल्या गोष्टी इतर सहकाऱ्यांना विचारून सांगायला लागले. त्यामुळे सहकाऱ्यांसोबत मैत्रीचं नातं निर्माण झालं. जेव्हा माझ्यासाठी संगणक आणि बोलका सॉफ्टवेअर आला तेव्हा लॉग इन करण्यापासून ते कारकुनांनी केलेल्या कामांना सत्यापिक करण्यापर्यंतची अनेक छोटी मोठी कामं मला सर्वांनी मिळून जसा वेळ मिळेल तशी शिकवली.
हल्ली मी गावातल्या शाखेत काम करते. इथे माझ्याकडे पासबूक प्रिंट करण्याचं काम मुख्यत्वे असतं. शिवाय बॅंकेतल्या योजना, बचतीचे अनेक प्रकार, खाते उघडण्यासाठीची प्रक्रिया, बॅंकेच्या नेट ऍप्स याबद्दल लोकांना माहिती देत असते. यामुळे लोकांशी गप्पा मारण्याची संधी मिळते. अनेक ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक, अल्प शिक्षित, अशिक्षित महिला ग्राहक म्हणून येतात. बऱ्याच जणांना पासबूक प्रिंट करण्यासाठी आवश्यक असलेला खाते क्रमांक सांगता येत नाही. मला दिसत नसल्याने हा क्रमांक सांगणं तर अपरिहार्य होऊन बसतं. अशावेळी, निवृत्त झालेले अनेक ग्राहक इतरांचा खातेक्रमांक सांगत तासन्तास उभे राहतात. कोणतीही तक्रार न करता. कधी कोणी नसलंच तर, मी अशा लोकांचं बूक घेऊन माझ्या सहकाऱ्यांकडे उठून जाते. खातेक्रमांक आणि प्रिंट करण्याची लाइन विचारून घेतली की, पटकन त्यांना बूक भरून देते. अशावेळी त्या लोकांना खूप आनंद होतो आणि ते माझं तोंडभर कौतुक करतात.
अनेकदा स्त्रिया आपला अकाउंट नंबर सांगायला बिचकतात असा माझा अनुभव. सुरुवातीला मी कोणाला तरी विचारून त्यांचं बूक छापून द्यायचे. पण, एकदा शेजारचे सर दुसऱ्या ग्राहकासोबत व्यस्त होते आणि मदतीला दुसरे ग्राहकही नव्हते. त्या बाईंना म्हटलं, “देखो, गिन के १२ आकडों के लिए लोगों पे कितना निर्भर रहना पडता है? आज घर पे जाके बच्चे से नंबर पढना सिख लो. नहीं तो अगली बार से मैं आप का बूक नहीं प्रिंट कर के दुंगी. देखो मैं अंधी हूं लेकिन, पढाई की तो आज कम्प्युटर पर काम कर सकती हूं. आप को भगवान ने नजर दी है. मैं ये कर सकती हूं तो आप को तो १ से १० नंबर ही सिखने हैं!” बोलताना भाव असा की, त्यांना आतलं दुःख आणि आनंद दोन्ही उकलून सांगतेय. दुसऱ्या दिवशी नाही पण, पुढल्या आठववड्यात त्या बाई आल्या आणि हळूच म्हणाल्या, “मेडम, इंग्लिस में तो नहीं बता पाएंगे हिंदी में बताऊं क्या नंबर? आप को समझेगा ना?” त्यांच्या या प्रश्नाने मला किती आनंद झाला ते शब्दात सांगणं शक्य नाही. मी त्यांचा आवाज, खातेक्रमांक आणि त्यांचं नाव मनात कोरून ठेवलंय. त्यांना वाचता यावं ही माझ्या कामाची गरज होती. पण, त्यांनी ते मनावर घेऊन, मुलाकडून शिकून घेतलं हे जास्त समाधान देणारं आहे. त्यांनीच सांगितलं की, लहान मुलालासुद्धा गंमत वाटली होती जेव्हा मम्मी वाचायला शिकव म्हणाली तेव्हा. त्यांना मी आणि त्या मला बराच वेळ धन्यवाद देत राहिलो.
काम करताना भेटणारी, बोलणारी माणसं काम करण्याचा हुरूप आणि जगण्यासाठी आत्मविश्वास देतात. अतिशय सकारात्मक पद्धतीने माझ्या अपंगत्वाचा स्वीकार करून, आपल्यातलंच एक समजून माझे सहकारी माझ्यासोबत वावरतात. जेवताना सोबत बसणं, ठरवून एकाच रंगा-ठंगाचे कपडे घालणं, गप्पा मारणं, एवढंच नव्हे तर मस्करी करतानासुद्धा मला सामिल करून घेणं हे ही मंडळी अगदी सहज करत असतात. अधिकाऱ्यांपासून अगदी शिपायापर्यंत सर्वांशी मैत्रीचं नातं निर्माण होण्यामागचं श्रेय माझ्या सहकाऱ्यांना जातं. कारण, अंधत्वामुळे येणाऱ्या बऱ्याच अडथळ्यांना पार करून पुढे जाताना आवश्यक असलेली आपलेपणाची भावना, सहकार्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. बॅंकेतले माझे सहकारी आणि जवळजवळ सर्व खातेधारक यामुळे मी आनंदाने माझ्या अंधत्वावर मात करून बॅंकेतली नोकरी करू शकतेय हे निश्चित.
आम्हाला काय हवे आहे, ते समजून घ्या
”लोकांना ऑफिसनंतर घरी जाण्याची घाई असते, मला प्रॅक्टिसला जाण्याची.” जुडोमध्ये एशियन पॅरा गेम्समधल्या कांस्य पदकासह, आतापर्यंत १२ सुवर्णपदकं पटकावणारा, २०१८-१९ च्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचा मानकरी जयदीप सिंग सांगत होता. पंजाब नॅशनल बॅंकेतली नोकरी सांभाळून यंदा ऑगस्टमध्ये होणाऱ्या वर्ल्ड पॅरा गेम्स आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या एशियन पॅरा गेम्ससाठी जयदीप सध्या सकाळ-संध्याकाळ प्रॅक्टिस करत आहे. मुंबईतल्या वरळी इथल्या हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंडमध्ये असताना जुडोची ओळख झाली. तेव्हा देशात ‘ब्लाइंड जुडो’ प्रकार नव्हता. शाळेत असताना काही स्पर्धांमध्ये भाग घेतला. एक-दोन स्पर्धा जिंकल्यावर जयदीपला हा खेळ अधिकच आवडू लागला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं मिळवणारे कावस बिलिमोरिया त्याचे प्रशिक्षक. त्यांच्या प्रोत्साहनामुळे २००५ मध्ये कॉलेज सुरू झाल्यावरही जुडो खेळणं सुरू राहिल्याचं जयदीप सांगतो. २०१२ मध्ये भारतात ब्लाइंड जुडोला सुरुवात झाली आणि २०१४ च्या एशियन पॅरा गेम्समध्ये जयदीपनं कांस्य पदक जिंकलं. एरवी खेळाडूला आधी नाही मिळालं तरी किमान पदक मिळवल्यावर तरी पाठबळ मिळतं. अंध-अपंग खेळाडूंच्या बाबतीत तोही भेदभाव दिसतो. सरकारी गाईड लाईन्समध्ये नमूद असूनही तेव्हा स्वागताला कोणी आलं नाही, अशी खंत तो व्यक्त करतो. परिपत्रकाप्रमाणे आशियाई स्पर्धेतल्या पदक विजेत्यांना क्लास- वन अधिकाऱ्याची पोस्ट मिळू शकते. सर्वसाधारण खेळाडूंना ती मिळते पण अपंग खेळाडूंबाबत दुजाभाव होण्याचा अनुभव तेव्हा जयदीपनं घेतला. सरकार सांगतं, क्रीडा विभागातल्या अधिकाऱ्यांनी स्वतःहून अपंग खेळाडूंना अप्रोच व्हायला हवं, पण स्वतः कार्यालयात जाऊन, विचारणा करूनही जिल्हा क्रीडा प्रशासन अंध खेळाडूंच्या बाबतीत उदासीन असल्याचे अनुभव येतात, असं जयदीप सांगतो. अंध-अपंग खेळाडूंसाठी असलेल्या योजना विभाग त्यांच्यापर्यंत पोहोचवतच नाही. जयदीप सांगतो, ”अंध व्यक्तींना नोकरीत ५ टक्के आरक्षण आहे, अंध खेळाडूंसाठीच्या बहुतांश क्रीडा संघटनांना मान्यताच नसल्यानं त्यांची प्रमाणपत्र ग्राह्य धरलीच जात नाहीत. सरकारी नियमांनुसार स्थापन काही क्रीडा संघटना आहेत, पण त्यांच्याकडे सर्व क्रीडा प्रकार असतातच असं नाही. उदाहरणार्थ पॅरा ऑलिम्पिक कमिटी ऑफ महाराष्ट्र ही संस्था जुडोसाठी स्पर्धा भरवतच नाही. पण सगळेच खेळाडू काही आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणारे नसतात, हे लक्षात घेऊन या गोष्टींमध्ये सुधारणा झाल्या तर अंध खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. याचसोबत खेळण्यासाठीच्या खर्चासाठी निधी मिळवणं हेही आव्हानात्मक असतं. ”स्वतःला सिद्ध करण्याची ओढ, देशासाठी खेळण्याची भावना, मित्र, प्रशिक्षकांकडून मिळणारं प्रोत्साहन, पदकांची भूक आणि पदक मिळाल्यावर होणारं कौतुक यामुळे खेळण्याची उमेद कायम राहते. घर आणि ऑफिस याव्यतिरिक्त काहीतरी हवंच. त्यामुळे ऑफिसच्या धकाधकीतही प्रॅक्टिसनंतर येणारा थकवा अतीव समाधान देतो, असं जयदीप सांगतो.
मूळची अकोला इथली गायिका दुर्गा गवई सांगते, ”कोरोनाकाळात बाबा अमरावतीला होते कामासाठी. मला दिसत नसल्यानं पूर्वी ते बाहेरगावी जाताना सोबत असायचे. पण कोरोना काळात त्यांना तिथून अकोल्याला येणं शक्य नव्हतं. आम्हाला पैशांचीही गरज होतीच, मग आईची समजूत घालून बाहेर पडले.” गाण्याची आवड तिला लहानपणापासूनच. शाळेतही संगीत विषय होता. वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतानाही गाणं शिकणं कायम होतं. दुर्गा २०११ पासून म्हणजे १२ वी पासून वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून, ऑर्केस्ट्रांमधून गात आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या सुहाना सह्याद्री अंताक्षरीमध्ये ती पहिल्या पाचात होती. ”स्पर्धकांमध्ये मी तेव्हा वयानं सर्वात लहान होते.” दुर्गा तिचा अनुभव सांगत होती. ”सह्याद्री वाहिनीतल्या सर्वांनी तेव्हा खूप सहकार्य केलं. काळजी घेतली. ड्रेस, मेकअप याबाबतही माझ्याकडे जातीनं लक्ष दिलं. शूटिंग माझ्या सोयीप्रमाणे केलं.” दुर्गानं नुकतीच स्वतः कार्यक्रम अरेंज करायला सुरुवात केली आहे. गीत संवाद म्युझिकल ग्रुप, हा तिचा स्वतःचा ग्रुप. त्यासाठी फिरणं, आयोजकांशी बोलणी करणं, कार्यक्रम ठरवणं, कलाकार ठरवणं, ऐनवेळी काही समस्या आली तर त्यासाठी वेगळं नियोजन असणं, हे सर्व ती करते. त्याचसोबत ती पुण्यात हॉस्टेलवर राहून ऍक्युप्रेशर मसाजचा कोर्स करतेय. ”२८ जुलै २०२२ ची गोष्ट आहे. आमचा पहिलाच शो होता, पिंपळनेर, सटाणाजवळ. माझ्यासोबत हॉस्टेलवरचीच एक अंध मैत्रीण होती. बसनं आम्हाला १० तास लागले. तेव्हापासून तर अगदी एकटीनं कुठेही जाण्याचा माझा आत्मविश्वास अजूनच वाढला. कुठेही जाण्यापूर्वी मी नेटवरून सगळी माहिती मिळते. जातानाही विचारत विचारत जाते.” अलीकडेच तिने अकोल्यात अपंग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या ‘क्षितिज’ या संस्थेसाठी अकोला ते पुणे अशी कुरिअर सेवाही दिली. आपण जे काही शिकलो, आतापर्यंत जे काही कमावलं आहे त्यात पालकांचा आणि शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचं दुर्गा सांगते. एखादं मूल अंध असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष होणं, त्याच्यासोबत भेदभाव होणं, या गोष्टी घडताना दिसतात. पण माझ्या आईवडिलांनी या उलट बहीण आणि भावापेक्षा माझ्याकडे अधिक लक्ष दिल्याचं दुर्गा सांगते. अंध-अपंगांसाठी अनेक सोयीसुविधा होत आहेत, जागरूकता वाढत आहे. त्यामुळे प्रवास सुलभ होत आहे. पण तरीही रेल्वेनं प्रवास करताना अपंगांसाठीचा डबा नेमका कुठे येणार ते अनेकदा पटकन कळत नाही. त्यामुळे हा डबा कुठे येणार याची उद्घोषणा प्रत्येक स्टेशनवर व्हायला हवी. याखेरीज या डब्यातून अनेकदा अपंग नसलेल्या व्यक्ती प्रवास करतात, झोपून जागा अडवतात. एकट्यानं प्रवास करताना या गोष्टींचा त्रास होतो, यासंदर्भात सुधारणा व्हायला हव्यात, असं मत दुर्गा व्यक्त करते. ”याशिवाय आम्हाला देवही समजू नये किंवा मूर्खही समजू नये. काहीतरी दानधर्म करायचा म्हणून अंध व्यक्तींना मदत करू नये तर व्यक्ती म्हणून आमचा स्वीकार करावा, आमच्यावर विश्वास ठेवणं, जबाबदारी देणं, हे घडायला हवं, अशी अपेक्षा दुर्गा व्यक्त करते.
आयडिअल इनोव्हेटिव्ह ग्रुप आणि आयडिअल इनोव्हेटिव्ह ग्रुप-एड्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टचे संस्थापक, उद्योजक सागर पाटील सांगतात, ”अंध व्यक्तींसाठी सरकारी योजना, धोरणं बरीच आहेत. कागदावर ती सर्व चांगलीच आहेत. पण प्रश्न प्रशासनातल्या व्यक्ती कशा आहेत यावर त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवलंबून आहे. याखेरीज पात्रता निकषांमुळे योजना बऱ्याचदा अंधांपर्यंत नीट पोहोचत नाहीत. यासाठी सरकारनं आता वेगळा विभाग आहे, पण सध्या तरी योजनांची अंमलबजावणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची दिसून येते. निराधार योजना प्रत्येक ठिकाणी एकाच प्रकारच्या नसल्यानं त्यातून मिळणारी रक्कमही वेगवेगळी असते. याऐवजी सर्व निराधार योजना एकत्र करून त्यांची रक्कम एकाच प्रकारची असावी, लाभार्थ्यांना मिळणारा लाभ समान असावा. याचसोबत लोकांची, अंधांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. ज्या अंध व्यक्ती शिकलेल्या नाहीत, ज्या काम करण्याच्या स्थितीत नाहीत त्यांना खायलाप्यायला देणं गोष्ट वेगळी आहे पण धान्यवाटपाच्या चॅरिटीऐवजी अंध व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी खरी गरज काय आहे ते ओळखण्याची आवश्यकता आहे. अंध व्यक्ती सर्व काही करू शकतात, हे मुळात समाजानं स्वीकारण्याची, समजून घेण्याची आवश्यकता आहे. एक अंध व्यक्ती स्वतःचं ‘ब्रेल वाणी’ रेडिओ चॅनल चालवू शकते, असं असूनही,पात्रता असूनही रेडिओ जॉकी होण्याची संधी अंधत्वामुळे त्यांना नाकारली जाण्याची उदाहरणं आहेत. माझा एक अंध मित्र डोळस व्यक्तींसोबत अगरबत्ती करायला शिकला आणि लागणारी यंत्र घेऊन तो स्वतःचा अगरबत्तीचा कारखाना चालवतो. पण अशा प्रकारच्या सक्षमीकरणाऐवजी काही संस्थांना वर्षानुवर्षे संस्थांचं हित जपण्यासाठी अंध व्यक्तींना फक्त उदबत्ती, पिशव्या बनवायला लावून त्यांना अवलंबून ठेवण्यातच रस असल्याचं दिसतं. याचसोबत चांगलं उत्पन्न असणाऱ्या अंध व्यक्ती त्यांना आवश्यकता नसताना धान्यवाटपाच्या रांगेत उभ्या राहिलेल्या दिसतील. यातून ज्यांना खरोखरच गरज आहे, त्यांना ते लाभापासून वंचित राहतात. देणाऱ्या संस्था जोवर आहेत, तोवर या गोष्टी थांबणार नाहीत. या गोष्टी बदलण्याची गरज आहे. अंध व्यक्तींना सर्व संधी खुल्या झाल्या पाहिजेत. त्यांना काम करता यावं यासाठी ऍक्सेसिबल सिस्टिम सगळीकडे हव्यात.
गरज आपण डोळस होण्याची
”अंध व्यक्तींकडे फक्त एक ज्ञानेंद्रिय नाही, बाकीच्या चार ज्ञानेंद्रियांचा वापर करून आपल्याप्रमाणे तेही सर्व काही करू शकतात, हे प्रथम आपण लक्षात घेण्याची गरज आहे,” ब्रेल पाक्षिकांचे संपादक, अंध व्यक्तींसाठी पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध करणारे, त्यांना रंगभूमीवर आणणारे लेखक-दिग्दर्शक आणि ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ स्वागत थोरात सांगत होते. ”अंध व्यक्तींकडेही क्षमता, भावभावना, षडरिपू असून त्यांच्याकडे एक माणूस म्हणून पाहिलं पाहिजे. सहानुभूती दूर सारून सहवेदनेनं व्यक्तीकडे, प्रश्नांकडे पाहिलं तर रोजचं जगणं सुकर होतं.” स्वागत सर घेत असलेल्या स्वयंसिद्धता कार्यशाळेत हे शिकायला मिळतं. ही कार्यशाळा अंध आणि दृष्टी असलेल्या दोघांकरिता अंधत्व समजून घेण्यासाठी, ते स्वीकारत जगण्यासाठी. विशेषतः ग्रामीण भागात अंध व्यक्तींच्या घरातल्या कोणीतरी कार्यशाळेला येण्याचा आग्रह आम्ही जरूर धरतो, असं स्वागत सर सांगतात. ”या कार्यशाळांमधून पालकांची भीती काढून टाकली जाते. अनेक ठिकाणी अगदी घरातही अंध व्यक्तींना भीतीपोटी कुठे हात लावू दिला जात नाही, मोकळेपणानं वावरू दिलं जात नाही, त्यांना घरातच ठेवलं जातं, पण यातून पुढे प्रश्न जटिल होतात. अनेक मुलींच्या शिक्षणावर परिणाम होतो. अशा केसेसमध्ये आम्ही विरोध करणाऱ्यांना बोलावून त्यांचं मतपरिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करतो.”
अंध व्यक्तींसाठी धोरणात्मकदृष्टया बदलांची आवश्यकता आहेच पण आतापर्यंतची धोरणं, योजना व्यवस्थित राबवल्या गेल्या तरी पुष्कळ फरक त्यांच्या जीवनात घडू शकतो, पण त्यासाठीही मोठा संघर्ष करावा लागत असल्याचं ते सांगतात. ”शिक्षणाच्या अधिकाराबाबतच अनेक उदाहरणं देता येतील. कोल्हापूर तालुक्यात कार्यशाळेसाठी आलेल्या एका मुलीला शाळेनं १० वीच्या परीक्षेसाठी अंधत्वामुळे अर्ज नाकारला. मुलीचं हे वर्ष तर वाया गेलं आहे पण बीडीओ, स्थानिकांशी बोलून लक्ष ठेवायला सांगितलं आहे. एक मुलगी १० वी पर्यंत मुंबईत शिकली. पण कोरोना काळात वडिलांची नोकरी गेल्यानं कुटुंब गावाकडे आलं. पण मुलीला महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. तिनं अंधांसाठीच्या महाविद्यालयात जावं, असं त्यांचं म्हणणं. पण शिक्षण क्षेत्रात असलेल्या व्यक्तींना अंधांसाठी वेगळी महाविद्यालय नाहीत, हेही माहित नसण्याएवढी अनास्था आहे. त्या मुलीचंही हे वर्ष वाया गेलं. पण या शाळा- महाविद्यालयांची परवानगी रद्द होऊ शकते आणि त्यांच्यात सुधारणा झाली नाही तर आम्ही हे पाऊल उचलणार.”
सरकारी योजनांसाठीच्या लाभासाठी ठेवण्यात येणाऱ्या आकडेवारीबाबत कितपत खात्री बाळगायची हा प्रश्न आहे, यासंदर्भातली हकीगत सर सांगतात. ‘कोकणात देवरुखमधल्या कार्यशाळेसाठी अंध व्यक्तींची आकडेवारी हवी होती. स्थानिक प्रशासनाकडून ती तत्परतेनं मिळालीही. ती बघत असताना तिथल्या एक सहकारीच्या मुलीचं नाव दिसलं. ती १० वीत असताना सातवी लिहिलं होतं आणि यादीवर सन तर त्याच वर्षीचं म्हणजे २०२२ होतं, लगेच तिला फोन करून विचारणा केली असताना तिनं खुलासा केला. शाळेत तीन वर्षांपूर्वी झालेल्या तपासणीत मुलीला चष्मा असल्याचं निष्पन्न होऊन, तिचं नाव थेट अंधांच्या यादीत आलं होतं आणि तीच यादी तीन वर्ष साल बदलून दिली जात होती.
सरकार, प्रशासन अंधांसाठी पावलं उचलतं पण अंमलबजावणीतल्या त्रुटींमुळे त्याच्या परिणामकारकतेवर परिणाम दिसून येतो. लाभ प्राप्त करण्यासाठी अजूनही अनेक अंध व्यक्तींची बँक खातीच नाहीत. स्थानिक प्रशासनानं ५ % निधी अंध अपंगांसाठी खर्च करण्याचा नियम शहरांमध्ये बऱ्याच अंशी आता पाळला जातो. नागरिक, संस्था यांनीही अपंगांना नेमकं काय हवंय याचा विचार केला पाहिजे. १५ ऑक्टोबरला पांढरी काठी दिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात काठ्या वाटल्या जातात, पण ती कशी वापरायची याचं प्रशिक्षण नसल्यानं बहुतांश काठ्या न वापरता पडून राहतात, असं सर सांगतात. म्हणूनच पुण्यातल्या ४ महाविद्यालयांना अंध विद्यार्थ्यांना येताना पांढरी काठी सोबत आणण्याचा नियम करायला लावला.
स्वागत सरांच्या मते, सामाजिक पातळीवर मोठा बदल घडणं आवश्यक आहे. समाजाचा दृष्टिकोन आता बऱ्यापैकी सुधारला आहे. पण एखादी अंध व्यक्ती रस्त्यावर चालत असेल तर ”कशाला गर्दीच्या वेळी मधे कडमडतात” अशा प्रकारची हीन शेरेबाजी करणाऱ्या व्यक्ती आजही समाजात आहेत. सुसंवाद वाढेल तसा यात बदल होईल, असा विश्वास स्वागत सर व्यक्त करतात.
अकोला इथल्या क्षितिज दिव्यांग विरंगुळा पुनर्वसन केंद्राच्या संचालिका मंजुश्री कुलकर्णी याही हाच धागा पुढे नेतात, ”आपल्या सोबतच्या अंध व्यक्तींना मदत करावी, असं आपल्याला वाटायला हवं” अंध मुलामुलींच्या कलागुणांना, कौशल्याला प्रोत्साहन, अभ्यासात मदत, रोजगार अशा स्वरूपाचं काम संस्था २००८ पासून करत आहे. विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचं रेकॉर्डिंग संस्था करते, त्यांना लेखनिक मिळवून देते. मंजुश्री सांगतात, ” कॉलेजला जाणाऱ्या अंध विद्यार्थ्यांना येणारी एक अडचण म्हणजे प्रोजेक्ट्स. त्याला इंटर्नल मार्क्स असतात. पण बरेच अंध विद्यार्थी लेखनिक न मिळण्याच्या अडचणीमुळे ते करू शकत नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट्स देण्याऐवजी त्यांच्या तोंडी परीक्षा घ्याव्यात. खरोखर अभ्यास होण्याच्या किंवा शिकण्याच्या दृष्टीनेही त्यांना यात मदत होईल. याखेरीज ग्रामीण भागातली अंध मुलं आत्ता कुठे स्मार्ट फोन वापरायला लागली आहेत. त्यांना एकूणच संगणक नीट चालवता यावा यासाठी कॉलेजमधूनच संगणक प्रशिक्षण आवश्यक करण्यात यावं, ते गांभीर्यानं दिलं जावं, त्यासाठी अंध व्यक्तींना शिकवू शकतील असे प्रशिक्षक कॉलेजमध्ये असायला हवेत. या मुलांना परीक्षेसाठी लेखनिक मिळणं ही एक अडचण असते. यासाठी आम्ही अमरावती विद्यापीठात पाठपुरावा केला तेव्हा कुलगुरूंनी महाविद्यालयांनीच या मुलांना लेखनिक पुरवावेत, असा जीआर काढला. पण या गोष्टी जर सरकारनंच बंधनकारक केल्या तर सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांसाठी त्या लागू होतील. माझा एक विद्यार्थी पंढरपूरला पीएचडी करतोय. अतिशय हुशार आहे तो इतिहास विषयात. पण तिथे प्रबंध लिहून देण्यासाठी त्याला कोणी लेखनिकच मिळत नाही. एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये कोणालाच कसं वाटत नाही की आपल्या सोबतच्या मुलासाठी आपण पुढाकार घ्यावा?”
अंध व्यक्तींना रिडर्स, लेखनिक मिळण्यातली अडचण लक्षात घेऊन, त्यांच्यात आणि सर्वसाधारण मुलांमध्ये संवाद वाढावा यासाठी मंजुश्री ताईंनी ‘मैत्री’ शिबीर कॉलेजमध्ये सुरू केलं. आपल्याला एक तरी अंध मित्र किंवा मैत्रीण असावी, असं आवाहन त्या मुलांना करतात. या शिबिराला चांगला प्रतिसाद लाभतो.
अंध व्यक्तींना बँकेत वगैरे नोकरी मिळते पण अनेकदा आवश्यक असलेलं सॉफ्टवेअर सहा सहा महिने- वर्ष झालं तरी मिळत नाही. त्यामुळे त्यांना नुसतेच बसून राहावे लागते. किंवा ज्या पदासाठी निवड झाली आहे त्यापेक्षा अगदीच सामान्य काम दिलं जातं, मग ही मुलं निराश होतात.
यावरही मार्ग काढण्याची गरज मंजुश्री व्यक्त करतात. अंध व्यक्तींना संधी मिळाली तर त्याही सर्व काही करू शकतात.
मुलांसाठी डोळ्यांची काळजी हा मुलांसाठीच्या प्राथमिक आरोग्यसेवेचा एक अविभाज्य घटक झाला पाहिजे
अंधत्व स्वीकारत, त्याच्यासह जगत यश मिळवणाऱ्या व्यक्ती आज दिसतात. पण अंधत्व टाळता येऊ शकतं का? बालवयात येणाऱ्या अंधत्वाची कारणं, ते टाळता येऊ शकतं का? याविषयी आजच्या भागात जाणून घेऊया.
नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मृदुला भावे (DOMS,FRCS) यांनी याबाबत माहिती दिली. ”मुलांमध्ये जन्मतःच असणारा काचबिंदू, मोतीबिंदू यामुळे दृष्टी जाऊ शकते. मोतीबिंदूच्या केसमध्ये शस्त्रक्रिया करून दृष्टी परत मिळवता येऊ शकते. आपली दृष्टी ९ वर्षांपर्यंत विकसित होत असते. त्यामुळे काचबिंदूचं लवकर निदान होणं आवश्यक असतं.
अनुवांशिकता, जन्माच्या वेळेस पारदर्शक पडद्याला इजा होणं, बाळ प्री-मॅच्युअर असेल, वजन कमी असेल तर त्याच्या दृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता असते. गर्भार असताना आईला विषाणू संसर्ग, ‘टॉर्च’ ज्यात टॉक्सोप्लास्मोसिस, रुबेला(गोवर), नागीण आणि एचआयव्ही संसर्ग झाला असेल तर बाळाच्या दृष्टीबाबत जागरूक राहण्याची आवश्यकता असते. बाळाचा डोळा तिरळा असेल, वस्तू समोर असूनही ते पकडत नसेल तर वेळीच तपासणी करून घ्यावी. मात्र प्रत्येक वेळेस तिरळेपणा अंधत्वाकडे नेतो, असा गैरसमज बाळगू नये किंवा लगेच घाबरून जाऊ नये. पण खबरदारीचा उपाय म्हणून प्री मॅच्युअर, कमी वजन असलेल्या बाळांच्या डोळ्याच्या पडद्याची नियमित तपासणी करून घ्यावी. याखेरीज हा प्रकार विशेष आढळत नाही. पण ३ ते ४ या वयोगटात ट्यूमर होण्याची शक्यता असते पण या केसेस दुर्मिळ आहेत. केवळ कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणजे डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा बदलायचा असेल तर नेत्रदान या बाबतीत साहाय्यकारी ठरू शकतं.
टीव्ही हे अंधत्वामागचं कारण नाही तर मूल जवळ जाऊन टीव्ही पाहत असेल तर बऱ्याचदा त्याच्यामागचं कारण त्याला लांबून कमी दिसत असल्यानं ते जवळून टीव्ही पाहत आहे. थोडक्यात आपल्या मुलाला/मुलीला कमी दिसतं, याचं ते लक्षण असू शकतं. टीव्हीवर पाहून मुलं धनुष्यबाण, युद्ध यासारखे खेळ खेळतात, त्यातून खेळताना होणाऱ्या इजा, ग्रामीण भागात शेती करताना होणाऱ्या इजा हीदेखील अंधत्वामागची कारणं आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नियमित तपासणीतून समस्या लवकर निदर्शनाला येणं बऱ्याच अंशी शक्य असतं, त्यानुसार अंधत्वाची तीव्रता कमी राहावी यासाठी प्रयत्न होऊ शकतात. शहरात शाळांमधून डोळे तपासणी होत असली तरी ग्रामीण भागात अजूनही अधिक जागरूकता आवश्यक आहे,” असं डॉ. मृदुला भावे सांगतात.
इंडियन जर्नल ऑफ ऑप्थ्यामॉलॉजीच्या गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार देशातल्या सुमारे २ लाख १० हजार मुलांना दिसण्याची गंभीर समस्या किंवा अंधत्व आहे. २०१८ ते १९ या कालावधीत केलेल्या या अभ्यासात केलेल्या तपासणीनुसार अंधत्वाची सुमारे एक तृतीयांश कारणं टाळता येण्यासारखी होती. बालपणी येणाऱ्या अंधत्वाचा सामाजिक- आर्थिक विचार केला तर कमी संसाधनं असलेल्या अंध मुलांपैकी केवळ १० टक्के मुलांनाच विशेष शिक्षण मिळत असल्याचा अंदाज आहे. मुलांमधील टाळता येण्याजोगे अंधत्व टाळण्यासाठी प्राथमिक स्तरावर, चालू कार्यक्रमांबाबत देखरेख आवश्यक आहे. मुलांसाठी डोळ्यांची काळजी हा मुलांसाठीच्या प्राथमिक आरोग्यसेवेचा एक अविभाज्य घटक झाला पाहिजे. यात नवजात अर्भकांच्या डोळे तपासणीचाही समावेश आहे. लहान मुलांसाठीच्या डोळ्यांच्या काळजीची केंद्र विस्तारत असली तरी प्रामुख्यानं ती शहरी भागात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं प्रत्येक १० दशलक्ष लोकसंख्येमागे एक लहान मुलांसाठीच्या डोळ्यांच्या काळजीच्या केंद्राची आवश्यकता व्यक्त केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अशी १२-१३ केंद्र तरी आवश्यक असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.