प्रकाशमय दिव्यांचा महाभाग्य गृहोद्योग

धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरामध्ये सप्तशृंगी नगरातला एक बंगला. आत शिरलो की 9 महिला काम करताना दिसतात. या महिला दिव्यांसाठी हाताने तुपाच्या वाती करतात. माजी उपमहापौर आणि नगरसेविका कल्याणी अंपळकर यांचा संकल्पनेतून दिवेनिर्मितीचा हा गृहउद्योग उभारला आहे . कोपरगाव इथले दिवे कल्याणीताईंनी पाहिले आणि आपणही असे दिवे आपल्या भागातल्या गोरगरीब महिलांच्या मदतीने तयार केले पाहिजे असे त्यांना वाटलं. हे दिवे कोण घेणार? बाजारपेठ कशी आहे? ते तयार केल्यानंतर विक्री व्यवस्थापन कसं करायचं? याचा फारसा विचार न करता त्यांनी सुरुवातीला काही महिलांना सोबत घेत निर्मिती सुरू केली.
यातली एक वात कमीत कमी सहा ग्रॅम तूप वजनाची आहे. ही वात एक तासापेक्षा अधिक वेळ प्रज्वलित राहत असल्याचं कल्याणीताई सांगतात. सद्यपरिस्थितीत फारसा नफा मिळत नसला, तरी जसजसा या दिव्यांचा प्रचार होईल तसा हा उद्योग अजून काही महिलांना रोजगार देईल, असा विश्वास कल्याणीताईं व्यक्त करतात. स्वच्छ आणि शुद्ध तुपाचा वापर करत असल्याचं त्या सांगतात. महाभाग्य गृहोद्योग असं त्यांनी नाव दिलं आहे. दररोज 4 हजार 500 वाती तयार केल्या जात आहेत. 11 वातींचा डबा हा सरासरी 80 रुपयांपर्यंत विकला जात आहे.
राजकारण आपल्या जागी, मुख्य हेतू समाजउपयोगी काम करणं हा आहे. विविध गृहउद्योगातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न असल्याचं कल्याणीताई सांगतात. धुळे शहराच्या उपमहापौर असताना कल्याणीताईंनी शहरातल्या स्वच्छता मोहिमेत महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

  • कावेरी परदेशी, धुळे

Leave a Reply