यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी तालुक्यातलं पुनवट. इथले एक शेतकरी विठ्ठल चिकटे. त्यांची २१ वर्षांची मुलगी प्रणाली चिकटे. समाजशास्त्राची पदवीधर. या आठवड्यात ती सायकलवरून परभणीमध्ये आली होती.
प्रणाली सांगत होती, ”पर्यावरणाचा ऱ्हास, हवामान बदल याचे थेट परिणाम आता आपण सर्वसामान्य भोगत आहोत. त्यावर आपल्याला काय करता येईल? इतर वाहनं टाळून आपण सायकलचा अधिकाधिक वापर केला तर प्रदूषण कमी करू शकू,इंधन वाचवू शकू, आरोग्य सुधारू शकू.”
एका सर्वसामान्य कुटुंबातली प्रणाली गेले वर्षभर सायकलवरून राज्यात फिरत आहे. आतापर्यंत १५ हजार किलोमीटरच्या सायकल प्रवासात तिने ठिकठिकाणी पर्यावरण, महिला सक्षमीकरण याबाबत लोकांशी संवाद साधला आहे.
”सुरुवात आपल्यापासून करू”, हा संदेश देताना छोट्या छोट्या गोष्टीतून ते कसं करता येईल, हे स्वतःच्या कृतीतून दाखवून देते. प्लॅस्टिकच्या बाटलीतलं पाणी ती पीत नाही.
२० ऑक्टोबर २०२० ला तिने प्रवासाला सुरुवात केली. सकाळी ६ वाजता ती प्रवासाला निघते. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी संवाद साधून झाल्यावर दिवस मावळला की एखाद्या गावी मुक्कामाला थांबते. आतापर्यंत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रवास करत ती बुधवारी परभणीत आली. सायकल असोसिएशननं खासदार संजय जाधव यांच्या हस्ते तिचा सत्कार केला.
आता हिंगोली, नांदेड जिल्ह्यात प्रवास करत तिच्या गावी या मोहिमेचा शेवट करणार आहे.”कोरोनानं आपले डोळे उघडले आहेत. त्यातूनच सायकल भ्रमंती करत राज्यभर जागृती करण्याचं ठरवलं,”असं प्रणाली सांगते. ”हवामान बदलामुळे शेतीचं, शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे. पर्यावरणाचं नुकसान, ते थांबवण्यासाठी आपण काय करू शकू, या सगळ्याबाबत देशात मोठी चळवळ उभी राहणं आवश्यक आहे.”
Related