प्रत्येक कामात सामाजिक भान जपणारा कोरिओग्राफर प्रतीक
उत्तर सोलापूर तालुक्यातल्या नान्नज गावात राहणारा पस्तीशीतला प्रतीक चिंदरकर.लहानपणापासूनच त्याला नृत्याची आवड. आवडीचं रूपांतर त्यानं व्यवसायात केलं. कोरिओग्राफर झाला. करिअरसाठी चार वर्षांपूर्वी तो पुण्यात स्थायिक झाला. तिथे तो डान्स अकॅडेमी चालवतो. अनेक दूरचित्रवाणी गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन त्यानं केलं आहे.
कोरोनामुळे निर्बंध पुन्हा एकदा कडक झाले. त्यामुळे प्रतीक गावी आला पण घरी बसण्यासाठी नाही. त्याने नर्सिंगचं शिक्षण घेतलं आहे. मिळालेला वेळ आणि शिक्षण यांचा उपयोग तो करत आहे. गेल्या साडेतीन- चार महिन्यांपासून तो नान्नजमधल्या कोविड सेंटरमध्ये विनामोबदला ब्रदर म्हणून सेवा देत आहे. प्रतीकची आई शीतल चिंदरकर याच रुग्णालयात गेल्या २६ वर्षांपासून ‘सिस्टर’ म्हणून काम करत आहेत. आज आई आणि मुलगा मिळून एकाच रुग्णालयात आरोग्यसेवा देत आहेत. विविध गाण्याचे कोरियोग्राफ आणि इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करणार्या प्रतीकला सोलापूर शहरातील सर्वच कोविड सेंटरमध्ये जनजागृती करायची आहे. गेल्या वर्षीही कोरोनाकाळात पुण्यातील अनेक गरिबांना एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तो जेवणाचे डबे पुरवण्याचे काम करत होता.
प्रतीकचं समाजभान, इतरांविषयीची कळकळ त्याच्या प्रत्येक कामातून दिसते. कलेच्या माध्यमातून तो बालकामगार, शेतकऱ्यांची आत्महत्या, स्त्रीभ्रूणहत्या, स्वच्छता अभियान यासारख्या विषयावर तो सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम घेतो. महिलांच्या अत्याचाराला वाचा फोडणारे ‘चुकी झाली देवा तुझी’ या गीताची संकल्पना त्याचीच. त्यासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून त्याने काम पाहिले आहे.
-अमोल वाघमारे, सोलापूर

Leave a Reply