वडिलांच्या शब्दांनी दिली नवी ऊर्जा
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातल्या शडेश्वर गावात राहणारी प्रियंका गेडाम. नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस स्थानकात ती उपनिरीक्षक आहे. प्रियंकाचे आई-वडील शेतमजूर व फर्निचरचे काम करणारे. घरची परिस्थिती तशी बेताचीच. तरीही आईवडील तिच्या आणि तिच्या धाकट्या बहीणभावाच्या शिक्षणासाठी अविरत प्रयत्न करणारे. प्रियंका अभ्यासात हुशार. शिक्षण क्षेत्रात करिअर करायचं असल्यानं तिने बारावीनंतर बी.एड पूर्ण केले. मात्र शिक्षक भरती बंद झाल्याने तिचे हे स्वप्न भंग पावले.
पर्याय म्हणून सोबत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास ती करत होती. 2014 मध्ये उपनिरीक्षक पदाची परीक्षा तिनं दिली. मात्र शारीरिक सराव न झाल्याने तिच्या पदरी निराशा आली. तिने लगेच दुसऱ्यांदा तयारी सुरू केली. शिकवणी लावायची तर शहरात जावं लागणार होतं, पैसे लागणार होते. नागपूरमध्ये पार्ट टाइम जॉब करायचं तिनं ठरवलं. खरं तर अभ्यास आणि नोकरी तिच्यासाठी तारेवरची कसरत ठरत होती. कठोर मेहनतीनं तिने उत्तम गुण मिळवले. पण आरक्षित जागा शिल्लक नसल्यानं तिची संधी हुकली.
गावातही तिच्या परीक्षेतल्या अपयशाबद्दल चर्चा होत असे. आईवडील, ती स्वतः अपार मेहनत घेत असूनही यश मिळत नसल्यानं ती खचून गेली. प्रयत्न थांबवण्याचं तिनं ठरवलं. तिने हे व्यक्त करताच वडील पुढे आले. त्यांचा प्रियंकाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी ठणकावलं,”प्रियंका, जोपर्यंत तू पीएसआय होत नाहीस तोपर्यंत गावात पाय ठेवायचा नाही.”
त्यांच्या शब्दांनी तिला वेगळी ऊर्जा मिळाली. ती दुप्पट जोमाने अभ्यासाला लागली. तिने नोकरी सोडली. आता ती तिसर्यांदा परीक्षा देणार होती. मात्र पाच दिवस बाकी असताना तिच्या आईवडिलांचा अपघात झाला. घरात मोठी असूनसुद्धा ती नाईलाजास्तव आई-वडिलांच्या भेटीला सुद्धा जाऊ शकत नव्हती. वडिलांचे शब्द कानात घुमू लागल्याने तिने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले.
8 मार्च 2019 च्या जागतिक महिला दिनाच्या दिवशी प्रियंकाच्या मेहनतीला यश मिळाले. तिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. तिने पहिला फोन वडिलांना केला. वडिलांचा विश्वास जिंकल्यामुळे ते निशब्द झाले होते. फक्त ओघळत होते ते आनंदाश्रु…प्रशिक्षणानंतर गावात तिचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले.
प्रियंकाच्या मते “सहनशीलता, मेहनत, चिकाटी सकारात्मक दृष्टिकोन, अपयशावर मात करण्याची जिद्द,आत्मविश्वास आवश्यक असते’ पाठांतर किंवा माहितीपेक्षा आपण काय आत्मसात करत आहोत. आपले मत काय आहे याला महत्त्व आहे.”
– नीता सोनवणे,नागपूर

Leave a Reply