वस्तीला ताठ मानेनं जगायला शिकवणारं सार्वजनिक शौचालय
खाली जे फोटो दिसतायत ना ते सार्वजनिक शौचालयाच्या गच्चीवरचे आहेत. या गच्चीत 70 मुलांकरता अभ्यासिका, महिलांना शिवणकाम प्रशिक्षण, कापडी मास्क आणि कापडी सॅनिटरी पॅड निर्मिती असे अनेक उपक्रम सुरू आहेत. झोपडपट्टीतलं शौचालय म्हणजे घाण, अस्वच्छता, तुटलेले दरवाजे असंच सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर येतं ना? पण मीनाताईंचं शौचालय याला अपवाद आहे. घाटकोपर पूर्वमधल्या कामराजनगर इथं हे शौचालय आहे. कामराजनगरचं अगदी शेवटचं टोक.. या शौचालयाच्या पलिकडं खारफुटी, देवनार डपिंग आणि खारफुटीत राजकारण्यांच्या वरदहस्तानं वसणाऱ्या झोपड्या आहेत. सावित्रीबाई फुले महिला मंडळ या शौचालयाचं व्यवस्थापन करतं. मीना कांबळे या महिला मंडळाच्या अध्यक्षा आहेत.
बृहन्मुंबई महापालिकेच्या वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत हे शौचालय बांधण्यात आलंय. या शौचालयांचं व्यवस्थापन म्हणजेच देखभाल स्थानिक रहिवाशी मंडळांद्वारे करण्यात येते. हे शौचालय वापरणारी कुटुंब मासिक पासद्वारे वापराकरता पैसे देतात. त्यातून पाणी, वीज, स्वच्छता केली जाते. या कार्यक्रमाची ही मुख्य अटच आहे. तळमजल्यावर महिलांकरता 25 आणि पहिल्या माळ्यावर पुरुषांकरता 25 शौचालय आहेत. अपंगांकरता कमोडची सोय आहे. अगदी काटेकोरपणे इथली स्वच्छता पाळली जाते. वस्तीलाही शौचालय वापरण्याची, स्वच्छतेची शिस्त त्यांनी लावलीय. गंमत म्हणजे शौचालयाच्या आत छान म्युझिकही सुरू असतं. या शौचालयात 350 मासिक पास आहेत. सुरवातीला पासाची रक्कम महिन्याला 60 रुपये होती. पण लोकांनी स्वखुषीनं महिन्याला शंभर रुपये द्यायला सुरुवात केली. शौचालयाचं लहान-मोठं काही काम असलं तर वस्तीतलेच प्लंबर, वायरमन ही कामं मोफत करून देतात.
या सर्व प्रतिसादाला शौचालयासोबतच आणखी ठोस कारणं आहेत. मंडळानं फक्त शौचालयाचं बांधकाम आणि देखभाल यापुरतं मर्यादीत ठेवलं नाही. या भागात शाळागळतीचं प्रमाण खूप होतं. वस्तीतले मुस्लीम समुदायातले पालक मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत उदासीन आहेत. मुलांना शाळेत शिकवलेलं कळत नाही अशी अनेक कारणं या शाळागळतीमागं होती. परिस्थितीमुळं मीनाताईंना शिक्षण घेता आलं नाही. वस्तीतली मुलं शिकावित म्हणून त्यांनी एका डी.एड. प्रशिक्षित शिक्षिकेची नेमणूक करत 1 ली ते 10 वीच्या मुलांकरता शौचालयाच्या गच्चीवर अभ्यासिका सुरू केली. पालकांची सतत भेट घेऊन त्या शिक्षणाचं महत्त्व सांगत असतात. मीना विविध संस्थांच्या माध्यमातून ह्या मुलांना वह्या, पुस्तकं, शालेयपोयोगी सामान, पोषण आहार उपलब्ध करून देतात. वस्तीतल्या महिलांकरता बचतगट बांधणी, मार्गदर्शन, नवरा-बायकोमधली भांडणं मिटवणं, किशोरवयीन मुला-मुलींचं समुपदेशन ही कामंही शौचालयाच्या गच्चीवरील कार्यालयात केली जातात. या मंडळांतर्फे 6 बचतगटांची बांधणी करण्यात आली आहे. या महिला मासे, भाजी, कपडे, साबण यांची विक्री करतात. लॉकडाऊनच्या काळात वस्तीतल्या अनेकांचे रोजगार गेले. वस्तीतल्या महिलांना शिवणकामाचं प्रशिक्षण तर मीना देत होत्याच. त्यांनी वस्तीतल्या महिलांना धीर दिला. एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून शिलाईमशीन मिळवल्या. मास्क, हॅण्डबॅग, सॅनिटरी पॅड, नाईटी शिवण्याचं प्रशिक्षण दिलं आणि ऑर्डरही मिळवल्या. वस्तीतल्या महिलांकरता नियमितपणं विविध प्रशिक्षण आणि आरोग्यशिबिरंही त्या भरवतात. एखादं सार्वजनिक शौचालय वस्तीला ताठ मानेनं, स्वयंपूर्ण जगायला शिकवू शकतं याचं उत्तम उदाहरण हे मंडळ आहे.
हे शौचालय बांधण्याकरता अडचणी खूप निर्माण केल्या गेल्या. त्यामुळं पायाकरता दोनवेळा खड्डे खणण्यात आले. कंत्राटदाराला त्रास दिल्यानं तो पळून गेला. पण मीनाताई आणि त्यांच्या मंडळातल्या सदस्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. 2015 ला सुरू झालेलं काम 2017 ला पूर्ण झालं. मीना यांनी शौचालयासोबतच ही सर्व कामं झपाट्यानं सुरू केल्यामुळं राजकीय कार्यकर्त्यांचा त्रासही बंद झाला.
शौचालयाला आता व्यवस्थित पाणी पुरवठा होतोय. मीना आणि त्यांचं मंडळं स्वतः शौचालयाची देखरेख करतात. सफाईकरता त्यांनी माणूस नियुक्त केला आहे. पासाच्या रकमेतून शौचालयाची दुरूस्ती, देखभाल, सफाई कर्मचाऱ्यांचे पगार देता येतात. शौचालयामध्ये तोडफोड होऊ नये, मुली आणि महिलांच्या सुरक्षेकरता शौचालयाच्या बाहेर आणि पॅसेजमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कॅमेरे बसवल्यावर गर्दुल्यांचा त्रास कमी झाला. एका माणसानं सुरूवातीलाच काही कारणानं शौचालयाचं गेट तोडलं. या माणसाला मंडळाच्या महिलांनी चांगला चोप दिला. यामुळं शौचालयाच्या मालमत्तेचं नुकसान करण्याची हिंमत परत कोणाची झाली नाही, असं मीना सांगतात.
कोरोनाकाळात मीनाताईंनी इतर शौचालयांनाही खूप मदत केली. महिला मंडळांतर्फे चालवल्या जाणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचा महासंघ म्हणजे ‘स्वच्छता संवर्धन संस्था महासंघा’च्या अध्यक्षा आहेत. कोरोनाकाळात मासिक पासाचे पैसे वापरकर्ते देऊ शकत नव्हते. त्यामुळं शौचालयांच्या स्वच्छता, देखभालीचा खर्च कसा करावा हा सर्व मंडळांसमोर प्रश्न होतो. मीना यांनी अनेक कंपन्यांच्या सीएसआर, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या सार्वजनिक शौचालयांना स्वच्छता साहित्य आणि सामान उपलब्ध करून दिलं.
शौचालय स्वच्छतेबाबतची सामाजिक चौकट मोडून यशस्वी आणि उत्तमपणे शौचालय व्यवस्थापन करणाऱ्या मीनाताईंना सलाम…
– साधना तिप्पनाकजे

Leave a Reply