सेवाभावी पुंडलिक
‘ते’ पोलीससेवेत, 26-11 च्या हल्ल्यात शहीद झालेले एटीएस प्रमुख हेमंत करकरे हे त्यांचे वरिष्ठ, त्यांची शिकवण लक्षात ठेऊन वाटचाल करणे हे यांचे धोरण, त्यातून वारांगनांच्या मुलांसाठी शाळा, व्यवसाय प्रशिक्षण, जनजागृती कार्यशाळा, किन्नारांचे प्रबोधन, त्यांच्या प्रश्नांवर काम, दरवर्षी शहीद पोलिसांना मानवंदना म्हणून एचआयव्हीसह जगणाऱ्या जोडप्यांचे स्वखर्चाने विवाह अशी यांच्या कामांची न संपणारी यादी. सेवानिवृत्तीनंतर ते गावी परतले. पुढे गावकऱ्यांनी त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड केली आणि यांच्या कामाला तर आकाशच मोकळे झाले. त्यांचं नाव आहे, पुंडलिक सपकाळे. 2020 साली सपकाळे पोलीस निरीक्षक पदावरून निवृत्त झाले. सुरवातीला स्वखर्चाने आणि एकट्यानेच सुरु केलेल्या त्यांच्या अनेक सामाजिक उपक्रमांना आता विविध संस्था, व्यक्ती तन-मन-धनानी साथ देत आहेत. त्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढते आहे.
चंद्रपूर येथील महाकाली पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस अधीक्षक हेमंत करकरे यांनी त्यांचे सहकारी पुंडलिक सपकाळे यांना परिसरातील वारांगनांची वस्ती रिकामी करण्याचे आदेश दिले. ते साल होते 1993-94. सपकाळे सर तेथे गेल्यावर त्यांना या महिला आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या खूप समस्या जाणवल्या. त्यांनी करकरे यांच्याकडून 5 ते 6 महिन्यांची मुदत मागून घेतली. त्यावेळी करकरे यांनी सपकाळे यांच्यावर विश्वास दाखवला. गोपनीय फंडातून आर्थिक मदतीचा मार्ग खुला करून दिला आणि सपकाळे कामाला लागले. त्यांनी सर्वप्रथम येथील वारांगना महिलांचे समुपदेशन केले. त्यांच्या मुलांसाठी शाळा सुरु केली. भविष्यात एड्स हा भयंकर आजार म्हणून सर्वत्र ओळखला जाणार असल्याची जाणीव करून दिली. त्याचा परिणाम म्हणून वारांगनांनी मुलांना शिकवून दुसऱ्या व्यवसायात टाकण्याचे ठरवले. त्यातील अनेकजणी शिवणकाम, ब्युटीपार्लर सारखे व्यवसाय शिकून वेगळी वाट धरू लागल्या. आज त्या वस्तीत नाममात्र वारांगना आहेत. त्यानंतर करकरे आणि सपकाळे यांची तेथून इतरत्र बदली झाली. 2008 साली पुन्हा सपकाळे पुन्हा तिथेच बदली होऊन आले. दुर्दैवाने 26-11 च्या हल्ल्यात एटीएस प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या करकरे यांचा गोळी लागून मृत्यू झाला. 1 डिसेंबर रोजी एड्सदिन आणि करकरे यांना श्रद्धांजली म्हणून सपकाळे यांनी एड्स जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केला आणि एचआयव्हीसह जगणाऱ्या जोडप्याचा स्वखर्चाने विवाह लावून दिला. चंद्रपूर आणि गडचिरोली येथील हे जोडपे आज सामाजिक कामात अग्रेसर आहेत. तो कार्यक्रम, उपक्रम पाहून उपस्थित लोक भारावले. त्यांनीही नवदाम्पत्याला पैसे, भांडी देऊ केली. त्यानंतर वर्षभर समाजातील निरनिराळ्या वंचित घटकांसाठी काम करायचं आणि 1 डिसेंबरला शहीदाना आदरांजली, विवाहसोहळा अशा कार्यक्रमाची प्रथाच पडली. सपकाळे यांनी आजपर्यंत स्वखर्चाने 29 जोडप्यांची लग्न लावून दिली. ते आज सुखात संसार करत आहेत. या वर्षीही 4 जोड्या विवाहबद्ध झाल्या. 2020 साली सपकाळे पोलीस सेवेतून निवृत्त झाले. जळगाव जिल्ह्यातील कानळदा या त्यांच्या मूळ गावी ते राहायला आले. करोनाची साथ सुरू होती. आणि निवडणुकाही जवळ आलेल्या होत्या. सपकाळ यांनी लोकांमध्ये करोनाबद्दल जनजागृती करणे, मास्क वाटप, गरजूंना अन्नधान्न्य, शिधा वाटप, वेडसर, दिव्यांग यांच्या आरोग्याची काळजी आदी त्यांना जमतील तशी कामे केली. चार महिन्यांनी निवडणुका जाहीर झाल्या. गावकऱ्यांनी सपकाळे यांना बिनविरोध सरपंच म्हणून निवडून दिलं. आज सरपंच म्हणून सपकाळे निरनिराळे उपक्रम यशस्वीरीत्या राबवीत आहेत. गावातील लोकांचे 90टक्के लसीकरण झाले असून उरलेल्यांचे लसीकरण सुरू आहे. मास्क, सामाजिक अंतर आदी गोष्टी कटाक्षाने पाळल्या जात आहेत. त्यांनी गावात तरुणांची फौज उभी केली आहे. सामाजिक कामात ही फौज सर्व ताकदीनिशी काम करताना दिसते.
दरम्यान सपकाळे यांनी किन्नर बांधवांसाठीही खूप काम केलं. किन्नर समाजातील व्यक्तींना मेल्यानंतर दफनभूमीत जागा मिळावी यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. किन्नर बांधवाना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. दारू वगैरे सारख्या व्यसनांपासून दूर राहण्यासाठी त्यांचं प्रबोधन केले. गेल्या 20 वर्षांपासून किन्नरांच्या विविध प्रश्नानवर सपकाळे सर काम करत आहेत. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, शहिदांना मानवंदना देताना त्यासाठी निवडलेला समाजसेवेचा हा मार्ग खरोखरच किती कौतुकास्पद आहे याचा प्रत्यय सपकाळे यांचे काम पाहिल्यावर आल्यावाचून राहत नाही. नाही का?
– भाग्यश्री मुळे, नाशिक

Leave a Reply