मला सामाजिक कार्याची पहिल्यापासून आवड होती. गरीब, अपंग व्यक्तींना मदत करणं, भुकेलेल्यांना अन्न देणं, दिव्यांग बांधवाना रस्ता ओलांडून देणं असं कार्य म्हणजे सामाजिक कार्य असून त्यामुळे ईश्वर प्रसन्न राहतो आणि गरजेच्या वेळेला आपल्या कामात येतो, असे साधे विचार माझ्या मनात यायचे. या सामाजिक कार्याच्या माध्यमातून राजकारणात जाता येतं, हेही मला माहिती होतं, मला त्यात इंटरेस्ट नव्हता. पण समाजकार्याच्या मोबदल्यात ‘देव आपल्यावर प्रसन्न होतो’ असा माझा सुरूवातीला समज होता हे खरंय! मी हे कार्य जसं जमेल तसं करत गेलो. परंतु कोरो संस्थेच्या सहकार्याने कार्यरत असलेल्या सावित्री महिला मंडळाच्या माध्यमातून माझ्या विचारांना आणखी स्पष्टता आली.
‘समाजकार्य म्हणजे उपेक्षित वंचित घटकांना प्रसंगी सोबत आणि दीर्घकाळासाठी दिशा देणे, त्यांना नेतृत्वक्षम करणे.’ हा विचार आता पक्का झाला आहे. पुर्वी मी दयेच्या भावनेतून मदत करायचो, त्याची जागा आता- ‘त्याच लोकांनी आपले प्रश्न सोडवणं’, या गोष्टीनं घेतली आहे. आज मात्र मी माझ्या घरातला अनुभव सांगणार आहे. मी साधारण परिस्थिती असलेल्या घरामध्ये लहानाचा मोठा झालो. घरात आई-वडील, दोन बहिणी आणि त्यात मधला मी. मोठी बहीण जन्मापासूनच पायाने थोडीशी पंगू. धाकटी बहीण छोटी असल्याने सगळ्यांची लाडकी! वडील व्यसनी असल्यानं आईनी धुणीभांडी करण्यात स्व:तला जुंपून घेतलं. भाड्याच्या घरात राहत असल्यानं माझ्यावर कामाची वेळ येणार होती, परंतु आईनं मला कामावर पाठवलं नाही. दहावी पास झाल्यावर मला कामावर जाणं क्रमप्राप्त होतं, तरी आई आणि बहिणीनं मला कामावर जाऊ न देता, शिकायला लावलं.
‘काहीही झालं तरी तू शाळा सोडून कामावर जाऊ नको, शिक.’ या त्यांच्या बोलण्यातून मला प्रचंड प्रेरणा मिळाली. मी कॉलेज करून कामावर जायला लागलो. त्याचवेळी मला महिला मंडळाची ओळख झाली. त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी सहभागी व्हायला लागलो. एका कार्यक्रमात समाज मंदिरासमोर रांगोळी काढायची होती. मी सहज पुढाकार घेतला. रांगोळी छान जमली, सर्वांनी कौतुक केलं. मला हायसं वाटलं. कारण लहानपणापासून घरातल्या कामाची आवड असल्यानं, मला रांगोळीचं कौशल्यही आत्मसात झालं होतं. घरातली कामं करण्यावरून मित्रांनी मला ‘बायल्या’ म्हणायला सुरूवात केली होती. पण मी हे आवडीचं काम सोडलं नाही. महिला मंडळाकडून, कार्यक्रमात माझं कौतुक झाल्यानं मला आणखी हुरूप आला. आवडीचं काम म्हणून घरातली कामं करावीच परंतु त्यामागचा लिंगाधारित विचार मुळापासून समजून घ्यायला हवा, हे मला इथं समजलं. आणि प्रकर्षानं जाणवलं की पुरूष म्हणून आपण खरंच किती महत्वाच्या कलाकौशल्य आणि गोष्टींपासून दूर होतो. घरातली कामं आवडतात म्हणून करणारा मी आता ‘समानतेचं मूल्य’ म्हणून ही कामं करायला लागलो. त्यामुळे हसणारे, नावं ठेवणारे असे सगळे मला अविचारी वाटू लागले. त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याची जास्त गरज वाटल्याने मी या लोकांशी स्वतःहून संवाद सुरु केला.
संविधान गौरव दिनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मुकेश बेलदार
दरम्यान मी मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून डिप्लोमा कोर्स पूर्ण केला आणि कंपनीत रुजू झालो. तसंच दोन्ही बहिणींची लग्नही झाली. परंतु लग्न झाल्यानंतर बहिणींच्या घरात समस्या मात्र सुरू झाल्यात. या समस्या प्रत्येक घरात थोड्याबहुत अंतराने निर्माण होतातच. परंतु त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र महिला मंडळामुळे बदलला आहे. अगोदर बहिणी नांदायला लवकर गेल्याच पाहिजे, त्यांचा संसार सुखी व्हायचा असेल तर त्यांनी त्यांच्या नवऱ्याला आनंदी ठेवलं पाहिजे, असा विचार असायचा. मात्र महिला मंडळाच्या समुपदेशनात सहभागी झाल्यानंतर माझे विचार बदलले. बहिणीला सामोरं जाव्या लागणाऱ्या समस्यांकडे मी संवेदनशीलतेनं बघायला शिकलो. बहिणीला तिच्या सासरी जाण्याची घाई करण्यापेक्षा – “तू तुझ्या अटींवर आणि समाधानानं जा” असं मी म्हणू लागलो. घरातला हा संवाद करता-करता लहान असणारा मी कधी मोठा झालो हे कळलेच नाही. कारण मला नेहमीच घरातील, नात्यातील लोक लहान-लहान म्हणायचे. परंतु माझी समज वाढत गेली आणि माझा निर्णय प्रक्रियेतला सहभागही वाढला. या सहभागाने मी आज मोठा झालो हे मात्र नक्कीच !
माझ्या आईच्या आईच्या (आजी) जुन्या घराची कोर्टातली केस आता मिटत आली आहे. त्याचे थोडेसे पैसे मिळणार आहेत. त्या पैश्याचं काय करायचं अशी चर्चा सुरू झाली. यात बहिणींनी पुढाकार घेत सांगितलं की ‘आम्हाला काहीही नको!’ परंतु मी येणाऱ्या पैशात तीन भावंडं आणि आई यांच्यासाठी चार समान हिस्से होणार असं सांगून कायद्याचा आग्रह धरला. पैसे जेव्हा येतील तेव्हाही मी सजगपणे कर्तव्य निभावेन हेही मला माहिती आहे. ही ताकद माझ्यात आली ती सावित्री कुटुंब विकास केंद्राच्या प्रेरणा आणि सातत्यपूर्ण संवादामुळे. कालपरवा गंमतीनं माझ्या लग्नाचा विषय निघाला. मी पत्नी आणि आई यांच्यात कधीच भेद करणार नाही. सर्व जबाबदाऱ्या निभावेल अस म्हंटलं. परंतु हे बोलताना- पत्नीची निवड खूपच विचारपूर्वक करेन असं म्हणालो. तेव्हा त्यावर सखोल चर्चा झाली. ‘खूप विचार करून म्हणजे नेमकं काय?’ यावर काथ्याकूट झाला. त्यात आईच्या कष्टाला निवांतपणा मिळावा, तिला सुख मिळावे हा विचार केंद्रस्थानी असलेला जाणवला. संविधान मूल्य मात्र समानता मानते. माणूस केंद्री विचारांचा आग्रह धरते. त्यामुळे पुन्हा स्वतःच्या समान कर्तव्याचा विचार आणि पत्नीच्या अस्तित्वासाठी संधीचा विचार नव्याने शिकता आला. असा नव्याने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित करणारा हक्काचा मंच मला, माझ्यासारख्या पुरूषांना उपलब्ध झालाय, याचा मला अभिमान आहे. याचमुळे आमची पुरूषीपणा सोडून माणूसपणाच्या वाटेवर चांगली वाटचाल सुरू झालीये.
मुकेश बेलदार, नाशिक.
शब्दांकन- संतोष जाधव, लोकनिर्णय सामाजिक संस्था, नाशिक