मुलांचे खेळणे आणि मुलांसाठी आणलेली खेळणी
मुलं स्वत: घेतलेले अनुभव / केलेली निरीक्षणे स्वत:च्या पद्धतीने मांडून बघत असतात. या वेळी त्यांना एखाद्या वस्तूची गरज वाटली तर मुलं ती वस्तू आसपास असलेल्या गोष्टींमधून बनवून घेतात. नंतर या गोष्टी मुलांचे हे मांडणे संपल्यावर पुनः पूर्वपदावर जातात. उदा. मुलं कधीतरी गाडीतून प्रवास करतात आणि त्यांना तो अनुभव आपल्या पद्धतीने पुन्हा घ्यावासा वाटतो. त्यांनी घेतलेला अनुभव समग्र असतो. तो अनुभव ती एकत्र मांडतात किंवा तुकड्या तुकड्याने. त्यांना गाडीच्या वेगाचा अनुभव पुन्हा घ्यायचा असेल तर ती स्वत: गाडी बनून पळतात किंवा एखादी लांब काठी हातांत धरून पळतात. त्यांना गाडीच्या रचनेचा अनुभव मांडायचा असेल तर मग जे सामान उदा. उश्या, डबे, घरातले फर्निचर इ. मिळेल ते वापरुन गाडी रचली जाते. बसचा अनुभव पुन्हा घ्यायचा असेल तर मिळेल त्या गोष्टी प्रवासी बनतात, कुणीतरी कंडक्टर बनतं इ. इ… ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काठी, उश्या, डबे आपापल्या जागेवर जातात. पुन्हा वेगळा काही अनुभव / निरीक्षण मांडताना याच वस्तू वेगळ्या पद्धतीने वापरल्या जातात. या सगळ्यामध्ये बाजारातून आणलेल्या तयार खेळण्यांचा उपयोग नसतोच. ती नसली तरी खरं तर मुलांना फरक पडत नाही. पण मोठ्यांच्या कल्पनेतून बनलेली खेळणी घरी हौसेनं आणली जातात. साहजिकच ती आकर्षक असतात, मुलं त्याकडे ओढली जातात. आणि मग खेळणे या नैसर्गिक प्रक्रियेकडून मुलं खेळणी या वस्तू (product) कडे जातात. खेळणी असणे किंवा नसणे यातून सामाजिक, आर्थिक स्तर मोजला जातो, मुलांमध्ये धोकादायक, विचित्र स्पर्धा सुरू होते.
हे सगळं आम्ही पालकांसमोर पहिल्या कार्यशाळेत सविस्तर मांडलं. काही व्हिडिओ दाखवले. या दृष्टीने मुलांच्या खेळण्याकडे लक्षपूर्वक बघायला सांगितलं. या त्यांच्या बघण्यातून अत्यंत महत्त्वाचे, आमच्या या मांडणीची पुष्टी करणारे व्हिडिओ पालकांकडून येत राहिले. अजून येत आहेत. आम्ही त्यांना घरातली खेळणी कमी करणे, मुलांना भेट म्हणून खेळणी न आणणे अश्या गोष्टी करायला सांगितल्या. बऱ्याच वेळा हे शक्य होत नाही याचं भान आम्हाला आहेच. पण पालकांना या सांगण्याचं मर्म समजलं आणि तयार बाजारू खेळण्यांची निरर्थकता सुद्धा! ही खूप मोठी गोष्ट आहे.
याच संदर्भात पसारा या मुद्द्यावर पण आम्ही बोललो. मुलाला पसारा आवरण्याची सवय लावणे आपण करू शकतो. त्याच वेळी हा केवळ पसारा नाही तर मुलांसाठी महत्त्वाचं काम असतं, त्याला लागणारा वेळ कमी जास्त होऊ शकतो याचं भान ठेवणं गरजेचं आहे. आपण वयाने मोठे आहोत म्हणून मुलाने मी सांगेन तेव्हा हा ‘पसारा’ आवरला पाहिजे असं जर मुलांना सांगत असू तर आपण मुलांना फक्त आज्ञा पाळायला आणि करायला शिकवत आहोत.
खरं तर अश्या बऱ्याच मुद्दयावर आमच्या ग्रुपवर चर्चा होत असतात. याचा अजून एक फायदा असा होतोय की पालक एकमेकांमध्ये चर्चा करतात. मुलाचा एखादा प्रश्न झाला तर तो कसं सोडवला ते एकमेकांना सांगतात. अश्या गप्पांच्या ओघात अनेक नवनव्या गोष्टी उमगत जातात, यामुळे या पालक मंडळींनासुद्धा एकमेकांच्या अनुभवामुळे स्वत:च्या मुलांकडे एका त्रयस्थ दृष्टीने बघणे शक्य होत असावे.
काही दिवसांपूर्वी एका आईने तिचा मुलगा सांडलेल्या पिठात मनसोक्त खेळतानाचा व्हिडिओ पाठवला होता. आईला मी विचारलं की पीठ सांडल्यामुळे चीडचीड होतेच. मग तो पिठात खेळायला लागला यानं तुम्हाला राग आला नाही का? यावर त्या आईने सांगितलं, पीठ सांडलं म्हणून कसंतरी वाटलं. पण आपण गटात मुलांना explore करू दे असं बोलतो. मग मला वाटलं खेळू दे याला थोडा वेळ! पिठाचा मऊपणा बघू दे.
गेल्या काही दिवसात स्वत:ची मुलं सोडून इतर मुलांच्या कामाचे निरीक्षण आणि documentation ग्रुपवर बघायला मिळत आहे. आपल्या मुलांना ओलांडून दुसरी मुलं ‘दिसणं’ ही घटना महत्त्वाची आहे. कारण स्वत:च्या मुलाच्या प्रेमापोटी पालक सुरुवातीला या शिकण्यामध्ये involve झाले होते. पण आता असं दिसतंय की ते खऱ्या अर्थानं शिकण्यातला आनंद घेत आहेत आणि त्यांना गोष्टी ‘दिसायला’ लागल्या आहेत.
आता या वर्षीची नवीन बॅच सुरू झाली आहे. नवीन पालक, नवीन मुलं! चर्चा आणि sharing सुरू झालं आहे. घरात मुलांसमोर वावरताना सर्वच मोठ्यांच्या वागण्यात नेहमी सुसंगती आणि समन्वय असावा यासाठी या बॅचची मागणी आहे की घरातल्या आजी आजोबांसाठी एक कार्यशाळा करूया. लवकरच ती पण करणार आहोत.
असा हा, पालकांना आणि आम्हाला समृद्ध करणारा आणि मुलांना स्वत:चे आकलन करू देणारा, प्रवास निरंतर चालू राहावा हीच इच्छा आहे.
– रंजना बाजी, रती भोसेकर

Leave a Reply