कोविड फायटर्स शिक्षकमित्र

ll गावासाठी शाळा शाळेसाठी गाव ll

धोरणांत स्पष्टता आणि अंमलबजावणीत कल्पकता असली की यशाची खात्रीच. नांदेड जिल्हा हे याचं उदाहरण. ‘व्हर्च्युअल क्लासरूम, शिक्षकमित्र आणि अभ्यासक्रमाचं प्रमाणीकरण’ या त्रिसूत्रीवर जिल्ह्यानं अध्यापनातल्या अडचणींवर मात केली आहे. डाएट प्राचार्य डॉ. रवींद्र आंबेकर यामागे आहेत. गोष्ट नांदेडची असली तरी तिला अमरावतीतल्या अनुभवाची जोड आहे.

मार्च २०२० मध्ये डॉ. आंबेकर अमरावतीला राज्य संचालक (डाएट) होते. लॉकडाऊन जाहीर झाल्याबरोबर ‘वर्क फ्रॉम होम’, ‘स्टडी फ्रॉम होम’, या उपक्रमांतून त्यांनी करोनाकाळात मार्ग शोधला होता. शिक्षकांना ऑनलाइन अध्यापनात प्रशिक्षित करण्याची आखणी, हे पहिलं पाऊल. “आम्ही ८५० शिक्षक व ९६ हजार मुलांपर्यंत (२५ टक्के) पोचलो होतो”, आंबेकर सर सांगतात. उरलेल्या ७५ टक्के मुलांसाठी ऑफलाइन उपक्रम आखले गेले. अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या सूचनांनुसार ‘शिक्षकमित्र’ उपक्रम तयार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांची यात मोठी भूमिका होती. अमरावती जिल्ह्यात ९ हजारहून अधिक शिक्षकमित्रांकडून ९० हजार विद्यार्थी शिकत आहेत. सरपंच, सेवानिवृत्त, स्वयंस्फूर्तीने काम करणारे हेही शिक्षकमित्र आहेत. चिखलदऱ्याच्या सरपंच अनुसुयाबाई यांच्या घरातच दोन वर्ग रोज भरतात.

ऑगस्टमध्ये आंबेकर सरांची बदली डाएट प्राचार्य म्हणून नांदेड जिल्ह्यात झाल्याझाल्या त्यांनी अमरावतीतले दोन उपक्रम तातडीने राबवले. ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ आणि ‘शिक्षकमित्र’. शिक्षणाधिकाऱ्यांपासून केंद्रप्रमुखांपर्यंत सर्वांची बैठक घेऊन शिक्षकांपर्यंत पोचण्याची तयारी केली. ‘गुगल मीट’ने २५० व्यक्तीक्षमतेची १५ सदस्यत्व मोफत देऊ केली, हे या पूर्वतयारीतलं यश. यातून रोज २-३ सत्रं, अशा प्रकारे १५ तालुक्यांमधील शिक्षक समाविष्ट केले. सहा विभागांचं वेळापत्रक ठरवून पहिली ते आठवीचे १२ ते १३ हजार (एकूण १७,००० पैकी – म्हणजे ७० टक्क्यांहून अधिक) शिक्षक प्रशिक्षित केले. व्हर्चुअल क्लासरूमचं तंत्र शिक्षकांना फारसं जमत नव्हतं. मग संपर्क तालुकाप्रमुख व आयटी विभाग यांच्या मदतीने त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवलं. व्हर्च्युअल क्लासरूममध्ये एका वेळी २०-२५ मुलं जोडून घेता येतात, मुलांशी संवाद, देवाण-घेवाण होते, स्क्रीनशेअरिंग, पीपीटी, दृकश्राव्य माध्यमं वापरून शिकवता येतं; व्हाइट बोर्ड असला तरी भागतं, मोबाइल, ट्रायपॉड पुरेसं आहे, हे लक्षात आल्यावर शिक्षकांना आत्मविश्वास आला. तसे ते सर्वजण मोबाइल वापरत होतेच; आता अध्यापनासाठीही त्याचा वापर करायचा होता.

नांदेडमध्ये जिल्हा परिषदेच्या ९,३०० पैकी १,५०० ते २,००० शिक्षक व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे आता विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. दीक्षा अॅप हे एससीईआरटीने तयार केलेलं आहे. शिक्षकांनी मिळतील ते व्हिडिओ न पाठवता दीक्षा अॅपचेच व्हिडिओ पाठवावेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या. दीक्षा अॅपमधील माहिती, व्हिडिओ रंजक नि दर्जेदार तर आहेतच शिवाय त्याला अधिकृतता आहे, यातला मजकूर प्रमाणित आहे. हे वापरल्याने सर्व मुलांना एकसारखं शिक्षण, शिस्तबद्धपणे पोचू लागलं आहे. स्वयंअध्ययनाच्या सवयी लागल्या आहेत. कारण व्हिडिओ बघितल्यानंतर पुस्तक वाचायला सांगा, ही सूचना आंबेकर सरांनी दिलेली होती. ही झाली फक्त २५ टक्के मुलांच्या अध्यापनाची सोय.

ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा संगणक नाही, अशा ७५ टक्के मुलांपर्यंत ऑफलाइन पद्धतीने पोचावं लागणार होतं. मग शिक्षकमित्र तयार करायला सुरुवात केली. दोन महिन्यांत नांदेडमध्ये ७ हजार शिक्षकमित्र तयार झाले. पोलिस पाटील, बीएड पूर्ण केलेल्या व्यक्ती, लॉकडाऊनमध्ये शहरं सोडून घरी आलेले उच्चशिक्षित यात सहभागी आहेत. ५५ ते ६० हजार विद्यार्थ्यांपर्यंत ते अध्यापन नि अभ्यासक्रम पोचवत आहेत.

उपक्रमांचा उपयोग जाणून घ्यायला अथकपणे दौरेही आखले जातायत. लोहा, मुखेड, किनवट, नायगाव या तालुक्यांतली स्थिती सरांनी प्रत्यक्ष पाहिली. ग्रामीण भागात एका मुलाकडे मोबाइल असला तरी एकूण ३५ ते ४० टक्के मुलांना त्याचा लाभ होतो, असं शिक्षकांनी त्यांना सांगितलं. लांडगेवाडी (ता. लोहा) चे सरपंच नरेंद्र बल्लोरे यांनी ९-१० शिक्षकमित्र तयार केले आहेत. तर किनवटमध्येही उत्तम अंमलबजावणी दिसली. विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचवे यांनी गणिती क्रिया, वाचकौशल्याची वाक्यं यांचे मोठे बॅनर तयार करवून ते चौकांमध्ये, दुकानात लावलेले दिसले. शैक्षणिक दिनदर्शिकेतला मजकूर ३०-३५ गावांत त्यांनी स्वखर्चाने लावला आहे. दुकानदारही या उपक्रमात सहभागी होतात. ते खरेदीला आलेल्या मुलाला, ‘आधी ते वाचून दाखव’, असं सांगतात, त्यामुळे मुलांचा सराव चालता-बोलता होतो. आंबेकर सरांना एनजीओंचं सहकार्यही मिळू लागलंय. चिखलदऱ्यात ‘मेळघाट मित्र’ची मदत झाली, नांदेडमध्येही एनजीओ पुढे आल्या.

काही ठिकाणी शिक्षकमित्रांना शैक्षणिक साहित्य द्यायला शाळा कां-कू करत होत्या. सरांच्या सांगण्यावरून ती सोय झाली. गणितपेटी, भाषापेटी, इतर साहित्य नोंद ठेवून शिक्षकमित्रांना वापरू द्याव्यात, असं ठरलं. गावात शिक्षकमित्रासोबत एकाहून अधिक मुलं एका छताखाली येणार म्हटल्यावर संसर्गाची भीती. आंबेकर सर ठाम सांगतात की, “नांदेड जिल्ह्यात असा एकही अनुभव नाही. मुलांच्या घरात कोणीही कोविड पॉझिटिव्ह निघालं नाही. मास्क, सॅनिटायझरचा वापर, अंतर हे नियम कसोशीने पाळले जातात”.

शिक्षकमित्रांबाबत बोलताना सर भावुक होतात, “दोन-दोन शिफ्टमध्ये ते आनंदानं काम करतात, इतका मुलांचा प्रतिसाद आहे. हेही कोविड फायटर्स आहेत.” मानधन किंवा कोणत्याही स्वरूपाच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवणाऱ्या या फायटर्सना प्रमाणपत्र देऊन गौरवण्याचं आंबेकर सरांनी ठरवलं आहे. तर शिक्षकांना त्यांचं सांगणं आहे की, स्थिती पूर्वपदावर आल्यानंतही व्हर्च्युअल वर्ग बंद करू नका. आधुनिक, विकसित अशा या माध्यमाने सुट्टीच्या काळात सराव घेता येईल, विद्यार्थ्यांशी संवाद अखंड राहील.
– सुलेखा नलिनी नागेश
कोविड फायटर्स शिक्षकमित्र
डॉ. रवींद्र आंबेकर, डाएट प्राचार्य, नांदेड

Leave a Reply