स्वप्न अधुरं राहू नये म्हणून
शिकण्याची प्रचंड इच्छा असलेली पण गरिबीमुळे ते करू शकत नसलेली प्रीती निबर्गी. यंदाच्या रक्षाबंधनाला तिला सोलापूरच्या रिफाह फाउंडेशनकडून भेट मिळाली. संस्थेने तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. प्रीतीप्रमाणेच रफीक,आकिब,अनस,आयेशा,प्राजक्ता, अशोक,अमोल,अल्ताफ अशा सोलापूर आणि पुण्यातल्या ३३ मुलांच्या शिक्षणाचा खर्च रिफाह फाउंडेशन करत आहे. बहुतांश मुलं ९वी/१० वीत शिकणारी. मुलांना ज्या शाखेत शिकायचं आहे त्याच्या संपूर्ण खर्चाची संस्थेची तयारी आहे. २०१५ पासून हा उपक्रम सुरू असून कोरोनाकाळातही यात खंड पडला नाही. फय्याज आणि रियाज सय्यद यांची ही संस्था.
फय्याज लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. भरपूर शिकावं आणि समाजाची सेवा करावी, हे त्यांचं स्वप्न. पण परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. पुढे बीकॉम होऊन त्यांनी व्यवसाय सुरू केला. आपल्याप्रमाणे कुठल्या गरीब मुलामुलीचं डॉक्टर, इंजीनिअर, शास्त्रज्ञ, अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरं राहू नये यासाठी मदत करायचं त्यांनी ठरवलं. त्यांची ही इच्छा रियाज यांनी प्रत्यक्षात उतरवली. सुरुवात साताऱ्यात राहणाऱ्या बहिणीनं करून दिली. अंजुमन खैरुल इस्लाम इथल्या शबानाची अडचण तिनं भावापुढे मांडली. हुशार मुलगी पैसे नाहीत म्हणून शिकू शकत नसल्याची खंत व्यक्त केली. रियाज यांनी शबानाला मदत केली. तेव्हापासून गरजू मुलांचं शुल्क भरणं, साहित्यासाठी मदत करणं सुरूच आहे. मुलांना मदत करण्यासोबतच परिसरातल्या अनेक गोरगरिबांनाही रियाज मदत करतात.
-जवेरिया रईस, सोलापूर

Leave a Reply