तिच्या आयुष्याची डबल बेल (भाग पाच)

भाग पाचः रोजीरोटीबरोबर एसटीने घडवले महाराष्ट्र दर्शन – लता डोके

मी लोणी जवळील सोनगावची. लहानपणापासून खूप संघर्ष करून शिक्षण पूर्ण केलं. कित्येक किलोमीटर पायी चालत जावं लागायचं. घरची परिस्थिती बिकट. त्यामुळे चांगलं शिकून मोठं व्हायचं, स्वत:च्या पायावर उभं राहायचं हे तर लहानपणापासून ठरवलं होतं. कळायला लागलं तसं नर्स होऊन रुग्णांची सेवा करायची हे स्वप्न होतं, त्यासाठी विज्ञान शाखाही घेतली होती. पण नियतीच्या योजना वेगळ्याच असतात. १२ वी पूर्ण होताच वडलांनी लग्न करून दिलं. लग्न होऊन जुन्नरला आले. सासरची परिस्थिती देखील साधारणच होती. पती तेव्हा मिलमध्ये काम करत होते. घरी बसायचं नाही, काहीतरी करायचं हे मनाशी नक्की होतं. कॉलेज दूर असल्याने आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांमुळे बाहेरूनच पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. याशिवाय मुलांचे क्लास घे, बँकेचे कलेक्शन कर अशी काहीबाही कामे मी करू लागले. मिलमधले काम सुटल्यावर नवऱ्याने भाजीविक्रीचा व्यवसाय सुरु केला. मीही मदत करायचे. त्याच दरम्यान २०११ मध्ये एसटीत महिला कंडक्टरसाठी जाहिरात वाचनात आली. आम्ही दोघी जावांनी सोबतच अर्ज केला. सुदैवाने दोघीनांही बोलावणं आलं. इंटरव्यूला गेलो. लेखी, मौखिक परीक्षेत दोघीही उत्तीर्ण झालो. एकत्रच पुणे डीव्हीजन ऑफिसला प्रशिक्षणाला गेलो. प्रशिक्षण पूर्ण झालं. नोकरी सुरु झाली. आज एसटी बरोबरच्या या प्रवासाला १२ वर्ष पूर्ण झाली. नोकरीआधी पुणे जिल्ह्याच्या बाहेर फारशी न पडलेली मी आज नोकरीच्या निमित्ताने सगळा महाराष्ट्र फिरले आहे. या प्रवासात खूप शिकायला मिळालं. अनुभवाची मोठी शिदोरी मिळाली असून ती पुढे आयुष्यभर साथ देत राहील याचा आनंद आणि अभिमान वाटतो. या भावना आहेत नारायणगाव डेपोच्या महिला कंडक्टर लता डोके यांच्या. एसटीने त्यांना आणि त्यांच्या संसाराला गती दिली, स्थैर्य दिलं, आर्थिक पाठबळ दिलं, अनुभवाचा मोठा खजिना उघडून दिला त्यामुळे एसटीचे कायम ऋणी राहू अशा शब्दात त्या आपली कृतज्ञता व्यक्त करतात.

एक महिन्याच्या ट्रेनिंगनंतर लता यांना जुन्नर राजूर रुटवर पहिली फेरी करावी लागली. त्या दिवशी गणवेश घालून बसमध्ये चढल्यावर धाकधूक वाटत होती मात्र दिवस संपल्यावर सगळं काही व्यवस्थित पार पडल्याने समाधान वाटले असं त्या सांगतात. त्या नंतर रोज डेपोत आल्यावर कोणत्याही बससाठी ड्युटी लागायची. लता यांनी जुन्नर ते बारामती, औरंगाबाद, मुंबई, सोलापूर, बार्शी, महाबळेश्वर अशा अनेक ठिकांणाच्या ड्यूटी केल्या. आजही तेच रुटीन आहे. याशिवाय गरेज पडेल तसे ऑफिस कामही केले. या प्रवासात भर रस्त्यात गाड्या बंद पडणे, ड्युटी संपवून घरी यायला उशीर होणे या गोष्टी अनेकदा झाल्याचे त्या सांगतात. पण सहकारी खूप मदत करतात हेही त्या आवर्जून सांगतात. कंडक्टर म्हणून काम करताना ‘जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ’ ठेवून काम करावं लागतं. त्यामुळे मग सुट्ट्या पैशांसाठी वाद घालणारे प्रवासी, प्रवासात शुल्लक गोष्टींवरून गोंधळ घालणारे विविध वयोगटातले प्रवासी यांच्याशी सामना करताना सुवर्णमध्य साधता येतो हे त्या नमूद करतात. बरेचदा वाढत्या रहदारीमुळे बस निर्धारित वेळेपेक्षा अंतिम ठिकाणी उशीरा पोहोचते. अशावेळी ड्युटी संपवून घरी परतणे अशक्य असते. लता यांना मग नारायणगाव डेपोतच मुक्काम करावा लागतो. सुदैवाने येथे महिलांसाठी स्वतंत्र व सोयीयुक्त असा विश्रांती कक्ष आहे. रात्रीचा मुक्काम करून पुन्हा सकाळी त्या ड्युटीवर जॉईन होतात. दुपारी ड्युटी संपवून मग घरी जातात. पण लांबपल्ल्याच्या अनेक ठिकाणांवर मुक्कामाची सोय नाही. अगदी महाबळेश्वर, बारामती, बार्शी अशा ठिकाणी देखील महिला कंडक्टरसाठी मुक्कामाची सोय नाही. तिथं गैरसोयीचा सामना करावा लागतो अशी खंत त्या व्यक्त करतात. १२ वर्षात अपघात वगैरेचा अनुभव आला नाही याविषयी त्या समाधान व्यक्त करतात.

लता यांना एक मुलगा, एक मुलगी. आज दोघेही इंजिनिअर झाले असून आपल्या कष्टाचं मुलांनी चीज केल्याचा आनंद वाटतो असं त्या म्हणतात. शहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाश्यांच्या वृत्तीत, व्यक्त होण्याच्या पद्धतीत जमीन आसमानचा फरक अनुभवायला येतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शहर ग्रामीण भागात, जवळ किंवा लांब पल्ल्याचे प्रवास करताना कधी या टोकाचे तर कधी अगदी विरुद्ध टोकाचे अनुभव येतात. मात्र प्रशिक्षणाच्या वेळी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रवाशांशी संयमाने वागतो, त्यांचा आणि आमचा प्रवास सुखाचा होण्यावर भर देतो हे देखील लता यांनी अधोरेखित केले.

  • भाग्यश्री मुळे, नाशिक.

Leave a Reply