शेतकरी घडवणारी सगराेळीची शाळा
सोबतचे फोटो पाहिलेत का? ही आहेत सगरोळीच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कुलची मुलं. ही मुलं शाळेत शेती शिकतात. १९६० मध्ये स्थापन झालेल्या संस्कृती संवर्धन मंडळाची ही शाळा. कर्मयोगी बाबासाहेब केशराव देशमुख यांनी तेव्हा कुठलीही साधनं नसताना एका छोट्याशा झोपडीत शाळा सुरू केली होती.
सगरोळी, नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातलं गाव. लोकसंख्या सुमारे १० हजार. हे गाव शिक्षणाच्या बाबतीत नावाजलेलं आहे. पारंपरिक शिक्षणासोबतच सैनिक शिक्षण, विविध कौशल्य आधारित शिक्षण गावात मिळतं. कृषी विज्ञान केंद्रही इथं आहे.
कर्मयोगी देशमुख यांनी शाळेत आठवी ते दहावीसाठी कार्यानुभवअंतर्गत शेती विषयाला प्रोत्साहन दिलं. त्यासाठी संस्थेत सोयीसुविधा दिल्या. परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांना अधुनिक शेतीची माहिती मिळावी, शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा, हा यामागचा उद्देश.
२०१२पासून शेतीविषयक मुलभूत तंत्रशिक्षणांतर्गत यावर्गासाठी शेती आणि पशुपालन हा विषय विनाअनुदानीत तत्वावर सुरू करण्यात आला. हा केंद्र पुरस्कृत व्यवसायपूर्व अभ्यासक्रम आहे. मल्टीस्किल फाऊंडेशन कोर्स असंही याचं नाव आहे. प्रत्येक वर्गात ६० याप्रमाणे १८० विद्यार्थी याचे धडे गिरवतात.शेतीतील नवनवीन प्रयोग, सिंचनाच्या पद्धती, वाफे तयार करणे, चारा निर्मिती, बीज प्रक्रिया, गांडूळ खत निर्मिती, पिकांवर पडणारे रोग आणि त्याचे नियंत्रण, जनावरांची निगा, रोग आणि उपचार, आधुनिक नर्सरी, शेतीपूरक व्यवसाय आदीं भागाचा समावेश आहे.
”विद्यार्थी प्रात्यक्षिकातून पीक काढतात आणि त्याची विक्रीसुद्धा करतात,” तंत्रशिक्षणाचे समन्वयक नागोराव माचापुरे सांगतात.
संस्कृती संर्वधन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद केशवराव देशमुख म्हणाले, हा अभ्यासक्रम शालेयस्तरावर विनाअनुदान तत्त्वावर सुरू केला आहे. याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळतो. संस्कृती संर्वधन मंडळानं प्रत्याक्षिकासाठी साधारण दोन एकर जमीन दिली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थीही यात सहभागी होतात.”
– शरद काटकर, ता. बिलोली, जि. नांदेड

Leave a Reply