सहा वर्ष विश्वासाची, जबाबदारीची, सद्भावनेची
दोन महिन्यांपूर्वी आम्ही सगळे नवी उमेदचे पत्रकार मिटिंगला जमलो होतो. नवी उमेद मंचाचं सध्याचं स्वरूप, त्यात नवं काय करता येईल, स्टोरी लिहाताना काय बदल हवेत अशा चर्चा सुरू होत्या. सोशल मिडियावर कितीही राजकीय धुमश्चक्री सुरू असली तरी आमचा फोकस आम्ही ढळू देत नाही. आरोग्य दिवस, पृथ्वी दिवस, मासिक पाळी व्यवस्थापन दिवस, जूनमधला पर्यावरण दिवस या निमित्ताने कोणत्या जिल्ह्यातलं काम स्टोरीसाठी निवडायचं, नवं कुठे काय चाललंय हे बोलत होतो. विविध विषय पुढे येत होते. नवी उमेदच्या वाढदिवसाची आखणीही त्याच मिटिंगमध्ये केली. तेव्हा जाणवलं की, खरोखर उमेद देणारी आपली टीम आहे. जिल्ह्यातून स्टोर्या पाठवणार्यांसाठी नवी उमेदचं काम पूर्ण वेळाचं नाही. आमचे हे सहकारी अन्य काम करून नवी उमेदला योगदान देतात.
नवी उमेदचे प्रतिनिधी नवं काही सुचवतात, त्याची जबाबदारी घेतात ते इथे वेगळं काही करायला मिळतं, त्यांच्या स्टोरीद्वारे सामाजिक बांधीलकी जपली जाते, कुणाचं तरी भलं होतं, चांगल्या कामाची चर्चा होते म्हणून. ही सद्भावनाच नवी उमेदच्या टीमला एकमेकांशी बांधून ठेवते. सहा वर्ष झाली. नवी उमेदची टीम एकत्र आहे. नवी उमेदसाठी जिल्ह्याजिल्ह्यातून प्रतिनिधी मिळवून देणारे परभणीचे बाळासाहेब काळे, मंचासाठी स्टोरी लिहिण्यासोबत रत्नागिरीतला आमदार संवाद मंच उभा करणारी जान्हवी पाटील, व्हिडिओ, फोटो एडिटिंगमध्ये मदत करणारा आणि विविध विषयांच्या स्टोरीज देणारा धुळ्याचा प्रशांत, नंदुरबारचा रूपेश, सतत फोन करून असंख्य विषय सुचवणारी नाशिकची चारू, नेहमीच लेखनोत्सुक नाशिकचीच भाग्यश्री, मला माहीत नसलेल्या विषयाची ओळख करून देणारा बीडचा दिनेश, ट्विटर-इन्स्टा-युट्युब सांभाळणारा अनंत, शेतीतल्या खाचाखोचा सांगणारा सातारचा संतोष, नवी उमेदच्या पोस्ट्स एडिट करण्यासाठी मला मदत करणारी सोनाली, मदतीला नेहमी तत्पर असलेली स्नेहल, नव्या उत्साहाने सामील झालेला कराडचा तुषार….. आणखीही बरेच. अशी सगळी नवी उमेदची टीम. यांच्यामुळेच आज गडचिरोलीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतचे 25 जिल्हे नवी उमेद मंचावर दिमाखात झळकत असतात. हा खरा आपला महाराष्ट्र. आमच्या या सहकार्यांमुळेच असंख्य मालिका सहज शक्य झाल्या. ते पाच दिवस तिला परत मिळवून देऊया, लोककारणार्थ, शाळा मुलांच्या दारी, छायाचित्रकथी, शिकणे आनंदाचे, दूध आईचं-पोषण बाळाचं, बाबाचं मनोगत, समाधानाचे क्षण, भिंगरी आणि भोवरा, कोविडचं संकट आलं-महिला बचतगटांनी गावांना सावरलं, बातम्या तुमच्या-आमच्या मुलांच्या, रक्त तपासणीः केव्हा?कशासाठी? ही काही मोजकी उदाहरणं. कोविडकाळ हा सगळ्यांच्या परीक्षा बघणारा. पण या काळातही नवी उमेदच्या प्रतिनिधींनी वाचकांची उमेद जागती ठेवली. माहितीच्या जंजाळात कोविडविषयीची योग्य आणि खरीखुरी माहिती देण्याचा प्रयत्न केला. यात, धारावीची गोष्ट, भारताबाहेरचा कोविडअनुभव, कोंडलेली मुलं-चाचपडणारे पालक, चला, शाळेला चला, गोष्टींचा शनिवार, व्ही फॉर व्हॅक्सिन, गावासाठी शाळा-शाळेसाठी गाव, गावकर्यांनी उभारली कोविडसेंटर्स, धडपडणारी मुलं, सुरक्षेचा लसा’वी’, तुम्ही काय काळजी घेता, चुकीच्या माहितीच्या भडिमाराला फसू नका, सरपंचाचं गाव अशा बर्याच मालिका केल्या. या मालिकांना वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
कोविडकाळात सगळेच घरात बसून. अशावेळी नवी उमेदकडे फेसबुक, युट्युब अशी सगळीच माध्यमं हातात होती. आणि या काळात ऑनलाईनचाच सगळ्यांना आधार होता. त्यातूनच मग विविध विषयांवरील जवळपास 45 उमेद चर्चा, माझा प्रवासचे 11 भाग, अशी असते पत्रकारी अशा काही वेगळ्या मालिकांमधून विविध विषय नवी उमेदवर चर्चेला आले. नुकतीच फेब्रुवारी महिन्यात झालेली ऑनलाईन मंथन परिषद ही पर्यावरणीय बदल या विषयाला वाहिलेली होती.
नवी उमेद मंच चालवणारी आमची मूळ संपर्क संस्था. आम्ही धोरणअभ्यास, आमदारांच्या कामगिरीचं विश्लेषण, त्यांना माहिती पुरवणं, आमदारांच्या मतदारसंघात अभिनव उपक्रम व्हावेत यासाठी मदत, पाठपुरावा हे काम करतो. नवी उमेद मंच याही कामाला बळ पुरवतो.
नवी उमेदचे मागचे दोन्ही वाढदिवस कोविडच्या सावटात गेले. तरीही वाचकांना सामील करून घेत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोर्हे यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा ऑनलाईन कार्यक्रम आम्ही केलाच होता. या वेळच्या वाढदिवसाचा विषय आहे – पोस्टमुळे काय घडलं? आम्ही गेल्या वर्षभरातल्या उत्तम रिच असलेल्या पोस्टस् निवडल्या. या स्टोर्या प्रसिद्ध झाल्यावर काय घडलं ते त्या त्या स्टोरी नायक-नायिकांकडून जाणून घेतलं. त्यांच्या बाबतीत काय भलं घडलं, ते पुढचे चार दिवस तुम्हाला नवी उमेदवर वाचायला-बघायला मिळेल.
२०१६ ते २०२२. सहा वर्षांच्या काळात नवी उमेदने काय केलं? फेसबुकवरच्या तू-तू-मैं-मैं वातावरणात चांगुलपणा शाबुत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात जे चांगलं घडत आहे ते लोकांसमोर आणलं. मुंबई, पुण्यापलीकडे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र अशा सगळ्या भागातल्या लहान-मोठ्या गावांतल्या सामान्य माणसांच्या असामान्य गोष्टी उमेदने प्रकाशात आणल्या. खर्याखुर्या स्टोऱ्या. कुणाच्या? कांदा कापताना आईच्या डोळ्यात येणारं पाणी बघून कळवळल्याने डोळ्यातून पाणी का येतं त्यामागचं विज्ञान जाणून घेत एक छोटंसं यंत्र तयार करणारा बीडचा छोटा ओंकार. कोविडकाळात आपल्याला पगार मिळत राहिला. पण काम कमी करावं लागत होतं तर आता थोडे आपल्या खिशातले पैसे खर्च करून शाळेला नवं रंगरूप देणारे शिक्षक लक्ष्मीकांत खडकीकर. वडिलांचं व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा यवतमाळचा छोटासा अंकुश. शेती, माती आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या डॉ.सत्यभामा चोले अशांच्या स्टोर्या. हे सारे महाराष्ट्राचे हिरो.
मराठी पुस्तकं किंवा एकूणच मराठी वाचन कमी झाल्याची ओरड सध्या ऐकू येत असते. पण नवी उमेदचा वाचकवर्ग आणि स्टोरीजवर येणाऱ्या कमेंट वाचून असं खरोखर वाटत नाही. कारण उमेदने सतत भरपूर आणि सकस कंटेट वाचकांना मिळवून दिला आहे.
फेसबुकवर नवी उमेदला यश मिळालंच. 2017 सालापासून नवी उमेदने युट्यूब, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरही आपला ठसा उमटवला आहे. सध्या नवी उमेदचे युट्यूबवर 12300, इन्स्टाग्रामवर 782 आणि ट्विटरवर 1605 सबस्क्राईबर्स आहेत. या सगळ्या प्रवासात ‘युनिसेफ’ कायमच ठामपणे आमच्यामागे उभी राहिली.
सध्या सर्वच माध्यमांवर विखारी राजकारण, भांडणं, टीका हे सगळं सुरू असल्याचं आपण रोजच पाहतो आहेत. अशा वातावरणात चांगलं शोधणं, त्याविषयी लिहिणं हे आम्ही नेटाने करत आहोत. आम्हाला वाचकांचा स्नेह आणि पाठिंबा मिळत राहो.
– वर्षा जोशी-आठवले
संपादक, समन्वयक
नवी उमेद
या कामाला आर्थिक पाठबळाची खूप गरज आहे. त्यासाठी आवाहन करत आहोत. आमच्या बँक खात्याचा तपशील असा:
Account name: SAMPARK
Bank of Baroda, BACKBAY RECLAIMATION BRANCH
Account no: 03820100004549
IFSC code : BARB0BACKBA (मधला आकडा शून्य आहे)
Type of Account: Saving

Leave a Reply