साखळी सदभावनेची, साखळी चांगुलपणाची

वाढदिवस, सण, अशा वेगवेगळ्या निमित्तानं आपण मजा करतो, खरेदी करतो. पण त्याचवेळेला समाजात अनेक अशी गरजू माणसंही असतात, ज्यांना दोन वेळेला पोट कसं भरावं, लेकराबाळांच्या शालेय साहित्याच्या गरजा कशा पूर्ण कराव्यात, तुटपुंज्या कमाईत कसं भागवावं असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर असतात. अनेक जण आपापल्या परीने अश्या गरजूंना मदत करतही असतात. पण कित्येकदा त्यात मदत घेणारा आपण ‘दान’ घेतोय, या भावनेनं अघडलेला असू शकतो, किंवा देणाऱ्याला आपण ‘दाता’ आहोत याचा किंचितसा का होईना अहंकार येऊ शकतो. अथवा काही वेळेला देणारी व्यक्ती समोरच्याची गरज काय आहे हे जाणून न घेता, त्याला काय द्यायला आवडतंय, परवडतंय अशाच वस्तू देते. ज्याचा समोरच्याला कधी कधी काहीच उपयोग नाही, असंही होऊ शकतं. माणसाची नेमकी गरज काय आहे, हे ओळखून मदतीचा हात दिला तर? तो सुद्धा आपण स्वत: पडद्याआड राहून? म्हणजे मग घेणाऱ्यालाही अवघडल्यागत होत नाही, आणि आपल्यातही ‘दान’ वगैरे केल्याचा अहंकार येत नाही. अगदी याच विचाराने ‘दान’ या संकल्पनेपेक्षा गरजू माणसांप्रति सदभावना बाळगीत, अनाम राहून आवश्यक ती छोटीशी मदत करण्याचा एक उपक्रम मुंबईच्या माधवीताई कुलकर्णी करत आहेत.
माधवीताई मुंबई दूरदर्शनच्या निवृत्त अधिकारी.  विलेपार्ले उपनगरात त्या हा छोटासा उपक्रम करतात. उपक्रम म्हणजे काय, तर पार्ल्यातील वर्षानुवर्षे ओळखीचा झालेला वडापावविक्रेता आणि स्टेशनरी दुकानदार यांना त्या दर तीन महिन्याला ठराविक रक्कम देतात. त्या विक्रेत्याला सांगितलेलं आहे की, “रोज तुमच्या दुकानावर कुणी गरजू-भुकेलं वडापाव घ्यायला आलं, तर त्यांना माझ्याकडून एक वडापाव रोज मोफत द्या. अर्थात रोज एकाच ठराविक व्यक्तीला देऊ नकात, वेगवेगळ्या गरजूंच्या तोंडी अन्न पडूदेत आणि त्यांचे पैसे वाचूदेत.” तसंच स्टेशनरी दुकानातही, “रोज एका गरजू विद्यार्थी / विद्यार्थिनीला किंवा पालकाला वही- पेन- पेन्सिल असं मोफत द्या.” तिथंही दुकानदाराने घेणारी व्यक्ती अथवा विद्यार्थी खरोखरच गरजू आहे का, ते पाहून मगच शालेय साहित्य द्यावं. या सगळ्यात कुठंही माधवीताईंनी त्यांचं नाव घ्यायला बंदी घातलेली आहे, त्यांचं नाव न घेता “कुणीतरी खास तुमच्यासाठी वडापाव ठेवलेला आहे” किंवा “कुणीतरी तुला वहीपेन द्यायला सांगितलंय, ते घे आणि नीट अभ्यास कर, याचे पैसे नकोत तुझ्याकडून”, असं त्या गरजू व्यक्तीला सांगितलं जातं.
कसलं भारी वाटत असेल ना, कुणीतरी सिक्रेट व्यक्तीने आपल्यासाठी खाऊ किंवा गरजेच्या वस्तू ठेवल्या असतील तर? घेणारी व्यक्तीही मग न संकोचता ते घेते. माधवीताईंनी असंच अंधेरीतल्या फळविक्रेत्यालाही दररोज दोन केळी गरजू व्यक्तीला द्यायला सांगितली आहेत. केळ हा तर परिपूर्ण पोषक आहार, लहानथोरांना चालणारा. दोन मोठ्या केळ्यात माणसाची एक वेळची भूक भागविण्याची क्षमताही असते. फक्त फुकट द्यायचंय म्हणून प्रत्येकवेळी रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना वाटून टाका, असं करू नका, हे त्या विक्रेत्याला माधवीताई आवर्जून सांगतात. म्हणजे अगदीच भुकेला वाटला तर भिकाऱ्यालाही अवश्य द्या पण शक्यतो वस्तू विकत घ्यायला आलेल्या व्यक्तीला या वस्तू मोफत द्या, असं त्या सांगतात. जेणेकरून त्या व्यक्तीलाही ती वस्तू किंवा पदार्थ/ फळ हवंच असतं. नको असणाऱ्या गोष्टी आपण त्यांच्यावर लादत नाही आणि दुसरं म्हणजे त्या व्यक्तीचा निदान त्या वेळचा खर्च नक्कीच वाचतो. आणि तिसरं म्हणजे भीक मागणाऱ्या व्यक्तीला इथं रोजच मोफत खाणं मिळतं, अशी सवयही लागत नाही, त्यामुळे भिक्षावृत्तीला प्रोत्साहन दिलं जात नाही.हे सुचलं कसं ते सांगताना माधवीताई म्हणतात, “खरंतर ही खरंच काही मोठी गोष्ट अथवा दान वगैरे नाही. ‘दान’ हा शब्द मला विचित्र वाटतो. इथं देणारा कुणीतरी मोठा आणि घेणारा कनिष्ठ असं जाणवतं. म्हणून तो अँगल बाजूला ठेवून गरजूला त्याला हवी असणारी वस्तू देणं आणि त्यात अनाम असणं, हे या उपक्रमातून जमू शकतं. नॉर्वेमध्ये ‘कॉफी ऑन द वॉल’ नावाचा प्रयोग गाजला होता. त्यात एका व्यक्तीने कॅफेत कॉफी घेतली आणि कॅफे मालकाकडे मात्र दोन कॉफींचे पैसे दिले. त्यावर विक्रेत्याने “तुम्ही एकच कॉफी पिऊनही दोन कॉफ्यांचे पैसे का देताय?”, असं विचारलं तर ही व्यक्ती म्हणाली- “ही कॉफी नंतर पुढे येणाऱ्या गरजूसाठी, माझ्याकडून!” मला ही संकल्पना फार आवडली म्हणून गेल्या वर्षभरापासून मी हे माझ्या पातळीवर सुरू केलंय. यात खर्चही फारसा येत नाही उदा. दोन मोठ्या केळ्यांचे दिवसाचे दहा रूपये, असं महिन्याचे तीनशे रूपये मी त्या फळ विक्रेत्याला देते. किंवा वही-पेनसारखी गोष्ट आपल्याला छोटीशी वाटते, पण त्याचे वाचलेले पन्नास रूपये, कुणासाठी तरी मोठे असू शकतात.”या सगळ्या उपक्रमात माधवीताई विक्रेताही अधूनमधून बदलतात. कारण विक्रेत्याला रोजच काय कुणाला तरी द्यायचं, याचा कंटाळा येऊ शकतो, तो टाळाटाळ करू शकतो. तसंच त्या वेगळ्या परिसरातले दुकानदार गाठूनही तीन- चार महिन्यांसाठी त्या परिसरातही हा प्रयोग करतात, जेणेकरून वेगळ्या परिसरातील नव्या गरजूंनाही याचा उपयोग व्हावा. अगदी रोजचा हिशोब त्या घेत बसत नाहीत, पण चांगले विक्रेते स्वत:हून रोज गरजू विद्यार्थ्याला वही- पेन दिला, याच्या महिनावार नोंदी न सांगताही ठेवतात. मुळात असे विक्रेते तुमच्या चांगल्या ओळखीचे आणि सुस्वभावी असतील, तरच ते खरोखर गरजू व्यक्ती ओळखून त्या व्यक्तीला तुम्ही दिलेली मदत देतील. वडापाव विक्रेत्याच्या स्टॉलवर तर एक छोटासा बोर्डही लावलेला होता, ‘इथं कुणासाठी तरी एक घास रोज ठेवलेला असतो, तुम्हीही ठेवू शकता!’ आणि या सगळ्यात माधवीताईंचं नाव कुठेच नसतं. बोर्ड अशासाठी की, तो पाहून दुसऱ्या कुणाला सुद्धा अशी गरजूंना वडापाव देण्याची संकल्पना सुचेल. खरं तर यावर लिहिण्यासाठीही माधवीताई तयार नव्हत्याच कारण ही फारच छोटी गोष्ट आहे, आणि हा बेसिक चांगुलपणा आहे, इतकं तर आपण करायलाच हवं, यात फार वेगळं काही नाही, असं त्यांना वाटतंय. पण आम्ही आवर्जून ही पोस्ट केली कारण हे वाचून माधवीताईंची संकल्पना अनेकांना कळेल, नववर्षातील उपक्रमांसाठी कल्पना मिळू शकेल आणि त्यातल्या मूठभरांनी जरी आपापल्या परिसरात हे केलं तरी ही सदभावनेची साखळी लांबत जाईल.

-स्नेहल बनसोडे- शेलुडकर

Leave a Reply