गडचिरोलीचे युवा सेलिब्रिटी – सामाजिक समस्यांची सखोल जाण असणारी आशा

सामाजिक समस्यांची सखोल जाण असणारी आशा

गडचिरोली जिल्ह्यातल्या मेंढा (लेखा) गावाचं अठराशे हेक्टरचे घनदाट वनक्षेत्र. या वनक्षेत्रात सहकाऱ्यांसह पायी फिरून वनस्पतींची, वनकार्य नियोजन आराखडा  करण्याची जबाबदारी तिच्यावर आलेली. वनक्षेत्रातील वेगवेगळ्या ७० टापूंचं ‘जीपीएस’चा वापर करत सीमांकनही करायचं होतं.  हे काम करत असताना जंगलाच्या मध्यभागी पोचल्यानंतर रात्री पुन्हा वापस येण्यात वेळ दवडण्याऐवजी जंगलातच जेवण रांधायचं, रात्री वस्ती करायची, दिवस उजाडला की कामाला लागायचं. अशा रीतीने, हळुहळु तिने हे काम पूर्ण होण्यास मदत केली. मेंढालेखाच नव्हे, तर १० ते १५ गावांना २० वनकार्य नियोजन आराखडे बनवण्यासाठी सुरुवातीच्या काळात मदत करण्यात आली. हे सारं नेटकेपणे करणारी आशा लाटकर. गडचिरोली जिल्ह्यातलं चुरचुरा हे तिचं  छोटसं गाव.  पाच बहिणी आणि आई असं तिचं कुटुंब. बहिणींत सर्वात धाकटी आशा.

गावातच सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर गोगाव इथे आशाने बारावी पूर्ण केली. त्यानंतर चंद्रपूर इथे बीएची पदवी घेतली.  बीएनंतर काय करायचं,  हा प्रश्न इतर तरुणांसारखाच  तिच्यासमोरही होता. मोठ्या बहिणी मीना आणि चेतना या डॉ अभय आणि डॉ राणी बंग यांच्या सर्च  या संस्थेत काम करत होत्या. या दोघींकडून आशालाही  सामाजिक काम, एनजीओ, प्रकल्प याविषयी बरंच समजू लागलं, गोडीही वाटू लागली. आणि तिने सामाजिक क्षेत्रात काम करण्याचं ठरवलं.  तत्पूर्वी पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी तिने गडचिरोलीतल्या फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय इथे मास्टर्स इन सोशल वर्क अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. २०१० मध्ये ती एमएसडब्ल्यू झाली.

कॉलेज संपल्यानंतर आशाने ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेत किशोरवयीन मुली आणि गर्भवती माता यांच्या आरोग्य, पोषण, आहार यासंबंधी काम केलं. या ११ महिन्यांच्या काळात मुलींच्या समस्या आशाला जाणवल्या. आहाराकडे मुलींचं लक्ष नसायचं. मुलींमध्ये रक्तक्षयाचं प्रमाण वाढलेलं असायचं.  या युवतींचा आहार सकस व्हावा, आरोग्याबाबत, मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जागृती व्हावी यासाठी आशाने काम केलं. बेसलाईन सर्वेक्षणापासून जनजागृती मोहीम आखून अंमलबजावणी करण्यापर्यंतच्या कामाचा तिने अनुभव घेतला.

याच कामाच्या बळावर,  ‘बायफ’ संस्थेची स्पार्क फेलोशीप आशाला मिळाली. बायफतर्फे तिने फॉरेस्ट मँपिंगचं काम सुरु केले. या कामासाठी तिला  जागतिक कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल तसंच डॉ.विजय एदलाबादकर, देवाजीभाऊ तोफा यांचं मार्गदर्शन लाभलं. माधवरावांच्या बर्‍याच आठवणी आशा सांगते.  सामूहिक वनहक्कांची अंमलबजावणी होण्याचा तो काळ. देशात, प्रथमच हे मेंढालेखात घडत होतं. आणि यात आशा सक्रीय होती.  आशाने मेंढालेखा ग्रामसभेला कामाचं नियोजन करण्यात मदत केली. या काळात, तिने सहकार्‍यांसोबत मेंढ्यातील वनक्षेत्रात फिरून तिथल्या  जैवविविधतेच्या नोंदी जमा करून डेटाबेस बनवण्याचं काम हाती घेतलं. बायफच्या अधिकार्‍यांना या कामाचं सादरीकरण करायचं, त्यांच्या सूचनांसह नवं काम करायचे, असा तिचा दिनक्रम असायचा. या कामातून तिला आदिवासी संस्कृतीचा, जीवनशैलीचा  नव्याने परिचय होत होता.

मेंढालेखा गावाकडे असलेल्या अठराशे हेक्टर वनक्षेत्राचे सीमांकन करण्याचं काम नुकतंच सुरु झालेलं. त्यात मग बांबू, साग, मोहाच्या झाडांनी वेढलेल्या जंगलात जाऊन नोंदी घेणं, जीपीएसद्वारे मॅपिंग करणं ही कामं सुरु होती. वेळप्रसंगी कित्येकदा जंगलात सहकार्‍यांसह मुक्कामी राहण्याची वेळ यायाची. हा सर्व प्रवास विलक्षण आनंददायी होता, असं आशा सांगते. एक वर्षाची बायफची फेलोशीप पूर्ण झाल्यानंतर आशाने ‘वृक्षमित्र’ या संस्थेसोबत  महाराष्ट्र जनुकोष प्रकल्प संस्थेतून सामूहिक वनहक्क मिळालेल्या गावांचे वनकार्य नियोजन आराखडे बनवण्यासाठी मदत केली. या कामानंतर आशाने पुढे अवंता फाऊंडेशनच्या आरोग्य आणि पोषणविषयक प्रकल्पाची धुरा हाती घेतली.

अंगणवाडी सेविका आणि आशाताईंचा कौशल्य विकास करण्यासाठी तिने गडचिरोली जिल्ह्यात फिरून बेसलाईन सर्वेक्षण, त्यातून कौशल्यवृध्दीसाठी नियोजन केलं. यासह कॅस प्रणालीचा वापर सुलभपणे करता यावा, यासाठी दिशादर्शन केलं. तिने अंगणवाडी सेविका, आशाताईंसोबत गृहभेटी दिल्या.   लोहाच्या गोळ्या, गर्भारपणातल्या लशी, बाळाच्या लशी, बाळाला स्तनपान या सर्वांविषयीचे गैरसमज दूर करणं याबाबत काम केले. अनेक महिलांना वाटायचं की लोहाच्या गोळ्या घेतल्यास गर्भावर परिणाम होईल. हा समज दूर करण्यासाठी काही उपक्रम आखले.  संतुलित आहाराविषयी माहिती दिली. लसीकरण सत्रात ‘सासू-सून संमेलन’ ही कल्पना लढवली. याने महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी मदत झाली. ग्रामपंचायतीत ‘पोषण आणि आरोग्य’ या विषयावरील वित्त आयोगाच्या निधी नियोजनात महिलांचा सहभाग कसा वाढविता येईल, याबाबत तिने खास प्रयत्न केले. तत्कालीन  जिल्हा परिषद सीईओ विनोद राठोड यांना हे काम आवडलं होतं. त्यांनी आशा लाटकर आणि सहकार्‍यांना वेळोवेळी उत्स्फूर्तपणे मदत केली. यातून कामाला आणखी गती मिळाली.

दोन वर्षांपासून आशा आता ‘लेन्ड अ हँड इंडिया’ या संस्थेतर्फे गडचिरोली जिल्ह्यात काम करते आहे.  या भागातल्या अधिकाधिक मुलांना व्यावसायिक शिक्षण मिळावं, प्रत्येक मुलाकडे एक तरी कौशल्य असावं, यासाठी ही संस्था  तांत्रिक स्वरूपाची मदत करते. गडचिरोली इथली शासकीय आश्रम शाळा, जिल्हा परिषद शाळा यांच्यासोबतही काम सुरु आहे. व्यावसायिक शिक्षणातून रोजगाराची संधी किंवा पुढील शिक्षणासाठी कोणकोणते मार्ग आहेत याचा पाठपुरावा करणं, हे आशाचे काम. या कामात तरूणाईशी संवाद होतो. त्यांचाशी बोलत असताना त्यांचं वैयक्तिक जीवन, करियर संधी आणि कौटुंबिक परिस्थिती आदींची माहिती मिळते. शासकीय योजना, रोजगाराच्या संधी याबाबत या युवक-युवतींना आवश्यक माहिती दिली जाते.

आशाने स्वत: आर्थिक हलाखी सोसली आहे. तिच्या मोठ्या बहिणींच्या मदतीने  तिने शिक्षण घेतलं. नवनवीन कौशल्यं आत्मसात करत कष्ट आणि अभ्यासाच्या बळावर आज ती स्वत:च्या पायावर तर उभी आहेच. आणि एकूणच सामाजिक समस्यांविषयीची, खास करून गडचिरोलीतल्या प्रश्नांविषयीची तिची समज सखोल आणि व्यापक झाली आहे.

  • अनंत वैद्य

Leave a Reply