सांगली जिल्ह्यातल्या कुमठे गावचे प्रशांत पाटील. घरची शेती. उत्पादनापेक्षा लागवड खर्च जास्त ही गोष्ट प्रशांत यांना जाणवत होती. शेतीत पैसे सुटत नाहीत, शेतीत आता राम उरला नाही हे सारखंच वाटू लागलं होतं. एकीकडे रासायनिक खतांचा वापर आता वाढतो आहे. त्यामुळेच आरोग्य आणि निसर्गालाही धोका निर्माण झाल्याचं त्यांच्या लक्षात येत होतं. यावर काय करावं याचा विचार सुरू होता.

सांगलीत प्रामुख्याने द्राक्ष शेती. द्राक्ष वेल आतून सक्षम असेल तर द्राक्षांवर फवारली जाणारी रासायनिक औषधांची मात्रा कमी होईल, खर्च कमी होईल असा विचार प्रशांत यांच्या मनात आला. शेती करत करतच असा अभ्यास सुरू झाला. त्याचवेळी त्यांना दशपर्णी अर्काची माहिती मिळाली. दशपर्णी अर्क हा पूर्णपणे नैसर्गिक असून शेताच्या आजूबाजूला मिळणाऱ्या १० प्रकारच्या वनस्पतीच्या पाल्यापासून बनवला जातो. याच अर्काचा वापर करत, त्यांनी घरीच काही प्रयोग करायला सुरुवात केली. सलग सहा वर्ष प्रयोग करत हाती लागलेल्या औषधाचा त्यांनी स्वतःच्या शेतात पहिल्यांदा प्रयोग केला. हे औषध पिकांवर चांगला परिणाम दाखवू लागलं आणि हळूहळू खतांचा वापर कमी झाला. खतावर खर्च होणाऱ्या पैशाची बचत व्हायला सुरुवात झाली. द्राक्ष पिकाच्या घडात व चवीत फरक दिसायला लागला. शिवाय रासायनिक खतांचा कमी वापर झाल्याने जमिनीचा पोत वाढला.
प्रशांत यांच्या प्रयोगांना त्यांच्या कुटुंबाने कायमच मानसिक आर्थिक पाठबळ दिलं. हळूहळू आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही प्रयोगातून तयार झालेलं द्राव्य द्यायला त्यांनी सुरुवात केली. या शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळू लागला. द्राक्षावर येणारा भूरा रोग, फळाचा फुगीरपणा कमी होणे, घडांची संख्या कमी असणे अशा विविध समस्यांवर त्यांचं द्राव्य शेतकऱ्यांना उपयोगी पडलं. सांगलीतच नव्हे तर एकूण भारतात भाजीपाला उसासाठी मोठ्या प्रमाणात रसायने वापरली जातात. त्यातून होणारे अपाय आपण रोज वाचतच असतो. म्हणूनच द्राक्षावरचा प्रयोग साध्य झाल्यावर भाजीपाला, उस, फळबागेसाठी त्यांनी प्रयोग सुरु केले. त्यातूनच द्राक्षासाठी ग्रीन फॉस्फरस, फळबागांसाठी रुबी अर्क, पालेभाज्यांना ग्रीन संजीवनी अर्क, ऊसासाठी शुगर किंग अशी उत्पादनं प्रशांत यांनी तयार केली. तासगाव, कुमठे, बिसुर तसेच कर्नाटक येथील द्राक्ष, शेवगा, फळबाग शेतकऱ्यांना त्यातून उत्पादनाचा फायदा झाला, जमिनी सुधारल्या. रासायनिक खतांचा वापर हळूहळू कमी करून उत्पादन वाढवता येते हे प्रशांत पाटील यांच्या अर्कानी दाखवून दिले. सतत प्रयोग करत, विज्ञानाचा वापर करत, स्वतःच शेत, पीक, निसर्ग समजून घेतल तर शेती नक्कीच फायदेशीर आहे असं प्रशांत पाटील सांगतात.
Related