११ वर्षाच्या ‘सन्मित’ला सहाशेहून अधिक पक्ष्यांची नावे तोंडपाठ
पुण्यातील हडपसर येथील ग्रीन सिटी परिसरात राहणारा सन्मित संकेत दळवी. त्याला लहानपणापासून पशुपक्ष्यांविषयी प्रचंड जिव्हाळा. घराच्या परिसरात हिरवीगार झाडी असल्याने असंख्य पक्ष्यांचा थवा जमतो. पक्षी निरीक्षण करता करता तो त्यांच्या छबी आपल्या कॅमेऱ्यात अलगदपणे टिपायचा. पक्ष्यांचं अनोखं विश्व पाहायचा. त्याची पक्ष्यांविषयीची आवड पाहून त्याचे वडील त्याला नेहमी भिगवण, दुर्गा टेकडी, कवडी पाटसारख्या वेगवेगळ्या जागी पक्षीनिरीक्षणासाठी घेऊन जात. पक्षीनिरीक्षण करता करता तो पक्ष्यांचा अभ्यास करू लागला. पुढे त्याचा हा छंद वाढतच गेला.
सन्मितचे पक्षीप्रेम पाहून त्याच्या आई-बाबांनी त्याला पक्ष्यांविषयी माहिती असणारी पुस्तके आणून दिली. अभ्यासाचा कंटाळा आला की, तो तासन्तास पुस्तकातून पक्ष्यांची विविध माहिती मिळवू लागला. दरम्यान २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाले. लॉकडाऊन दरम्यानही त्याचे घराजवळच्या परिसरत पक्षीनिरीक्षण सुरूच होतं. याचवेळी त्याने त्याच्या आई-बाबांना पक्ष्यांची नावे तोंडपाठ असल्याचे सांगितले. आणि सर्व पक्ष्यांची नावे त्याने लिहून दाखवली. सन्मितच्या आई-बाबांना याचं फारच कौतुक वाटलं.
पुढे पक्ष्यांची नावे तोंडपाठ असल्याचा विक्रम करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला. त्याने अर्ध्या तासात ही नावं सांगितली. रेकॉर्डमध्ये नाव नोंद झाली तेव्हा त्याला ५०५ पक्ष्यांची नावे पाठ होती, मात्र आता सुमारे ६०० हून अधिक पक्ष्यांची नावं पाठ आहेत. पक्ष्यांच्या विश्वात रमणारा सन्मित आवाजावरून तो पक्षी कोणता आहे हे सहज ओळखतो. वसुंधरेचे वैभव वाढवणार्या विविध प्रकारच्या सुंदर पक्ष्यांचे आवाजही त्याला काढता येतात. लॉकडाऊन काळात त्याने अनेक पक्ष्यांचे स्केच देखील काढले आहेत. त्याच्या या छंदासाठी त्याच्या आईवडिलांनी प्रोत्साहन दिले. सन्मितची आई श्रद्धा सांगतात, २०२० मधील लॉकडाउनचा कालावधी आमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरला. यामुळे आम्हाला सन्मितची आवड, त्याला असलेलं ज्ञान आणि आकलन क्षमता या सर्व गोष्टी समजल्या. पूर्वी कामाच्या व्यापात आम्ही कधीच इतकं लक्ष देऊ शकलो नाही. आजकाल ऑनलाईन शिक्षणामुळे मुलं स्मार्टफोनचा जास्त वापर करतात. पण सन्मित पक्ष्यांची माहिती गोळा करण्यासाठी मोबाईलचा वापर करतो. तसेच पक्षी-प्राणी यांच्यावर आधारित पुस्तकांचे वाचतो.
– विनोद चव्हाण

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading