तलवारबाजीत आता ऑलिम्पिकमध्ये कोरायचंय नाव
शाळेत तलवारबाजीचा (Fencing) खेळ पहिल्यांदाच पाहिला तेव्हा संस्कृती होती पाचव्या वर्गात. तिला हा खेळ फारचा आवडला. या स्पर्धांमध्ये मुलं खेळतात मग मी का खेळू नये, असा विचार तिच्या मनात आला. आणि या विचारासरशी तलवारबाजी शिकायचा चंगच संस्कृती भास्करराव पडूळ हिने मनाशी बांधला. जिद्दीने तलवारबाजीचं शिक्षण सुरू केलं. शालेय स्पर्धेत तिने भागही घेतला. या स्पर्धेत तिला खेळताना बघून तलवारबाजी संघटनेचे सचिव श्रीकांत देशमुख यांनी तिच्यातली चुणूक ओळखली. आता देशमुख सरांकडे संस्कृतीचं तलवारबाजीचं प्रशिक्षण सुरू झालं. विविध शिबिरे, स्पर्धांच्या सहभागातून संस्कृतीचा तलवारबाजीचा प्रवास आजही सुरू आहे.
2013-14 साली, वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी संस्कृतीने बँकॉक येथील स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. 2018 ला इटली येथील स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. परंतु, यश मिळालं नाही. तरीही तिने पुढच्या राष्ट्रीय व राज्यस्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवलं. गोल्ड मेडल, सिल्व्हर मेडल आणि ब्रॉंझ मेडल अशी विविध पदके आणि सन्मान पत्रे तिने मिळवली आहेत.
संस्कृतीला खेळाचा वारसा मिळाला तो खरा घरातूनच. संस्कृतीची आई मंदाकिनी या त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात रनिंग, हॉकी, गोळाफेक या खेळात पारंगत होत्या त्यामुळे संस्कृतीने तलवारबाजीचा निर्णय घेतल्यावर पडुळ कुटुंबीयांनी तिला भक्कम पाठबळ दिले. भाऊ अजिंक्य देखील तलवार बाजीचा सराव करायचा आणि स्पर्धा गाजवायचा त्यामुळे या कुटुंबांनी तिला उत्तम पाठिंबा दिला. तलवारबाजीत संस्कृतीने जे यश मिळवलं, जालना जिल्ह्यासाठी तलवारबाजीसाठी संस्कृतीने दिलेल्या योगदानाबद्दल 26 जानेवारी 2018 रोजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते तिला जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात आला.
तलवारबाजी (Fencing)सारख्या क्रीडाप्रकारात आपली कारकीर्द गाजवणाऱ्या संस्कृतीला आता ओढ आहे एशियाड आणि ऑलम्पिक स्पर्धेची. सिंगापूर, थायलंड येथे आंतरराष्ट्रीय तलवारबाजीत तिने सहभाग घेतला होता. आता ऑलम्पिककडे तिचं लक्ष लागलं आहे.
नुकतंच एशियाड स्पर्धेसाठी ती पात्र ठरली असून तिची त्यासाठी तयारी चालू आहे. ऑलम्पिक स्पर्धेत भारताकडून खेळत चमकदार कामगिरी करण्याचं संस्कृतीचं ध्येय आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तिला अजय त्रिभुवन आणि विजय गाडेकर यांच्याकडून प्रशिक्षण मिळते आहे. याक्षेत्रात ती आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवते आहे आणि त्यासाठी कुटुंबाचं पाठबळ तिच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. एक मुलगी म्हणून कुठेच मागे न राहता, स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याने तिचा आत्मविश्वास वाढला आणि या क्षेत्रात भरारी मारण्याचं बळ देखील. या अनोख्या क्षेत्रात आपली चुणूक दाखवणाऱ्या संस्कृतीच्या जिद्दीला सलाम.
तलवारबाजी या खेळाचा ऑलम्पिक मध्ये समावेश झाला असून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आई-वडिलांचं प्रशिक्षक अजय त्रिभुवन आणि विजय गाडेकर यांची मोलाची साथ तिला मिळत आहे. त्यांच्या प्रेरणेतून आता ती तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत आहे याआधी तिने सिंगापूर थायलंड येथे आंतरराष्ट्रीय तलवारबाजीत सहभाग घेतला होता आता ऑलम्पिक कडे तिचे लक्ष लागले आहे.
– अनंत साळी, जालना

Leave a Reply