”संविधान हाच माझा धर्म ”- स्वातंत्र्यसेनानी लीलाताई बेलेकर चितळे

॥ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विशेष मालिका ॥

स्वातंत्र्यसेनानी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, गांधीवादी, लीलाताई बेलेकर चितळे म्हणजे समतावादी चळवळीचा मोठाआधार. कष्टकरी, शोषित, महिला चळवळीतल्या अग्रणी. राजकारणात काही काळ घालवूनही सत्तेचा मोह न बाळगलेल्या. लीलाताई समाजवादी महिला सभा आणि सर्वाेदय आश्रम संस्थेच्या विश्वस्त आहेत.अमरावतीचं कस्तुरबा केंद्र, मातृसेवा संघाचं काम त्या आजही हिरीरीनं बघत आहेत.
लीलाताई अकोल्यातील काशिनाथ बेलेकर यांची कन्या. १६ ऑगस्ट १९३० रोजी जन्म. घरात आईवडीलांसह पाच बहिणभावंड.आजोबा गांधीवादी.वडिलांनीही रेल्वेची नोकरी सोडून चळवळीत भाग घेतला.पण हाताला काम नाही, पैसा नाही. यातून आलेल्या निराशेतून ते घर सोडून निघून गेले. आई स्वयंपाकी म्हणून काम करू लागली तर लीलाताई सूत कातायला जायच्या. लहान भाऊ पेपर वाटायचा.सगळ्यांचे मिळून २१ रुपये मिळायचे.मोठा भाऊ १९४२ च्या आंदोलनात जखमी होऊन तुरुंगात गेला.त्यावेळी त्या १२ वर्षाच्या होत्या. कठीण परिस्थितीत सय्यद कुटुंबानं बरेच दिवस धान्य -जेवण पुरवलं. तेव्हा हिंदू -मुस्लीम असा भेदभाव नसल्याचेही लीलाताई सांगतात.
स्वातंत्र्यसंग्रामात लहान वयातच त्यांनी जेलवारी केली. त्याची आठवण लीलाताईंकडूनच ऐकण्यासाठी सोबतचा व्हिडिओ अवश्य पाहा.
विद्यार्थी काँग्रेस, राष्ट्रीय युवती संघाच्या कार्यात लीलाताईंनी स्वतःला झोकून दिलं.
युवती संघाच्या संस्थापिका गांधीवादी ताराबेन मश्रूवाला यांच्या त्या मानसकन्या. त्यामुळे बापूंचा सहवास त्यांना लाभला. पंडित नेहरूंच्या आठवणीही त्या सांगतात. पुणे करारात बापू आणि बाबासाहेब एकमेकांना पुरक असल्याचे…एकमेकांना साथ दिल्यानेच बापूंचे उपोषण सुटले व जीव वाचल्याचे त्या सांगतात.
साडेसोळा वर्षांच्या असताना आईच्या इच्छेखातर त्यांनी लग्न केलं. मात्र आत्मसन्मान आणि चळळीत सहभाग घेण्याच्या अटीवरचं..! नवरा १८ वर्षानं मोठा. काहीच वर्षात पदरी दोन चिमुकले सोडून पतीचं देहावसान झालं. हार न मानता व्यक्तिगत जीवन तर त्यांनी सावरलंच शिवाय समाजासाठीही बहुमोल योगदान दिलं.
लग्नानंतर त्यांनी समाजशास्त्र विषयात एम.ए केलं. मॉटेंसरीचंशिक्षण घेतलं. याचा फायदा त्यांना नंतर बालवाडी व पाळणाघर सुरू करताना झाला.नागपुरात पाळणाघराची सुरूवात लीलाताईंनी केली. छोटीमोठी कामं करत १९५४ पासून स्मॉल सेव्हींग युनिट ट्रस्टची स्थापना केली. या क्षेत्रातील विदर्भातील त्या एकमेव महिला. उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित करण्यात आलं. लीलाताईंनी काही काळ राजकारणात घालवला. जनता दलाच्या विदर्भातील नेतृत्वाची धुरा त्या सांभाळत. परंतु तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्वासाठी राजकारण नाही, या भूमिकेतून त्यांनी राजकारणातून रामराम ठोकला.
लीलाताई आजही देशहितार्थ आपली भूमिका मांडतात. “गांधीविचार खुंटीवर टांगून ठेवल्याने सुराज्याचे स्वप्न अजून साकार झाले नसल्याचे” त्या म्हणतात. गांधी-नेहरू माझी दैवतं असून संविधान हाच धर्म असल्याचं त्या सांगतात. लीलाताई मुस्लीम लिगच्या महिला संघटनेशी जुळलेल्या असून त्यांनी इतर महिला संघटनांना त्यांच्याशी जोडून दिले आहे. युवावर्गाशीही त्या जोडलेल्या आहेत. युवापिढीवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे.
”मी देवाघरी गेल्यावर मला बापूंनी विचारले, की तू कोणते कार्य केलेस? तर मला द्यायला उत्तर नको का..”या विचारातून आजही त्या कार्यरत आहेत. स्वतःची कामं त्या स्वतः करतात. संवेदनशील मनाच्या लीलाताई घरासमोर कचरा वेचणाऱ्यांना चहा- बिस्कीट स्वतःच्या हातानं खाऊ घालतात. त्या स्वतःही रस्ता झाडतात.
अशा निस्पृह, कर्मयोगी, तत्त्वनिष्ठ, मातृहृदयी विदुषी लीलाताईंच्या छत्रछायेत बसल्यावर बापूंच्या दर्शनाची अनुभूती मिळते. ९३ वर्षांच्या या तरुणीचा उद्या वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना नवी उमेदकडून मन:पूर्वक शुभेच्छा..!
–नीता सोनवणे,नागपूर

 

Leave a Reply