सरपंच असलेल्या डॉक्टरने गावात उभारलं मोफत कोविड सेंटर

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात ‘गाव तेथे कोविड सेंटर’ हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला एका डॉक्टरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आपल्या गावात मोफत कोविड सेंटर उभारून ते कोरोनाग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करत आहेत. या डॉक्टरचे नाव आहे, अमित मधुकर व्यवहारे.
३७ वर्षांचे डॉ. अमित व्यवहारे हे मूळचे सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील पंढरपूर-कुर्डुवाडी रस्त्यालगत असलेल्या आष्टी या गावचे रहिवासी. अमित यांनी रशियामधूम एमडी फिजिशियन, तर मुंबई येथून डीसीएच पदवी घेतली. डॉक्टर त्यांच्या गावात बालरोगतज्ज्ञ म्हणून प्रसिध्द आहेत. कोरोन‍ाचा वाढता प्रादुर्भाव आणि रुग्णांची होणारी हेळसांड थांबावी म्हणून त्यांनी आपल्या गावातील शाळेत ५० बेडचे मोफत कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी जिल्ह्याचे सीईओ, डीएचओ, बीडीओ यांच्याकडून परवानगी घेतली.

याच गावातील जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांनी त्यांच्या सिल्व्हर ओक चिल्ड्रन स्कूलमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली. या सेंटरमध्ये रुग्णांना औषधे, सलाईन आणि ऑक्सिजन यासारख्या सुविधा पुरवल्या जातात. जर काही महागडी औषधे असेल तर ती रुग्णांना बाहेरून आणायला सांगितली जातात. दिवसभरातून चार ते पाच वेळा डॉक्टर चेकअपला येतात. मदतीसाठी नर्स आणि कम्पाऊंडर यांचा मोठा स्टाफ रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असतो. चांगले उपचार मिळत असल्याने अनेक रुग्ण उपचारासाठी येऊ लागले. जनपरिवर्तन संस्थेच्या वतीने रूग्णांना रोज अंडी, चहा, पोहे किंवा उप्पीट असा नाष्टा दिला जातो.

गेल्या २ महिन्यात दोनशेहून अधिक रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोना साथीत उपचारासाठी लाखो रुपयांची बिले येत असल्याचं एकीकडे ऐकू येत आहे. इथं मात्र आपला व्यवसाय बाजूला ठेवून डॉ.व्यवहारे मोफत उपचार देत असल्याचे पाहून गावातील लोकांनी देणगी गोळा केली. आणि जवळपास दीड लाख रुपये उपचारासाठी मदत म्हणून डॉक्टरांना दिले. देणगी म्हणून आलेली रक्कम ही आता उपचारासाठी वापरण्यात येत आहे.

डॉ अमित व्यवहारे यांना सामाजिक कार्याची प्रचंड आवड आहे. सह्याद्री प्रतिष्ठान, आष्टी या सामाजिक संस्थेतून त्यांनी अनेक उपक्रम आकाराला आणले आहेत. सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं योगदान पाहून गावकऱ्यांनी त्यांना निवडणूक लढवण्यास प्रोत्साहन दिलं. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. पुढे ते सरपंचही झाले. डॉ. अमित हे आता गावचा कारभार हाती घेत समाजकारणाबरोबरच राजकारण आणि वैद्यकीय सेवाही जोमाने करत आहेत.

– अमोल सीताफळे, सोलापूर

Leave a Reply