सर्वेक्षण, मौलानांची साथ आणि यशस्वी लसीकरण
राज्यात लहानग्यांमध्ये गोवरच्या साथीचा प्रादुर्भाव जाणवत असतांना नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्येही ही साथ मोठ्या प्रमाणावर उद्भवली. सुरूवातीला केवळ एकच बालरूग्ण असलेल्या मालेगावात बघता बघता आजारी बालकांची संख्या ७१ वर पोहचली. ही परिस्थिती नियंत्रणात आणतांना तेथील नागरिकांचे प्रबोधन करण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर होते. हे आव्हान महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत लीलया पेलले. सद्य परिस्थितीत मालेगावात एकही सक्रिय गोवर रुग्ण नसल्याचा दावा त्यांनी केलाय.
पण हे घडलं कसं? अर्थातच हे सोप्पं नव्हतं.मालेगाव महापालिका सातत्याने चर्चेत राहिली आहे. कोरोना काळात आलेल्या अडचणी सर्वश्रृत आहेत. गोवरच्या साथीतही मुंबईनंतर मालेगावात गोवरचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली. डॉ. ठाकरे सांगतात, “कोरोनाचा अनुभव गाठीशी असल्याने महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने आम्ही सर्वेक्षणावर भर दिला. घरोघरी अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या माध्यमातून ताप, पुरळ असलेल्या बालकांची माहिती गोळी करण्यास सुरूवात झाली. सर्व संशयित बालकांवर तातडीने उपचार करण्यात आले. काही ठिकाणी लसीकरण आणि उपचारांना होणारा विरोध पाहता आम्ही शक्कल लढवून मौलवी, धर्मगुरूंची मदत घेतली. त्यांना लसीकरणाचे महत्त्व, आजारामुळे बालकांना होणारा त्रास, प्रसंगी मृत्यूही होवू शकतो या विषयी इत्यंभूत माहिती दिली. “
“याचा फायदा असा झाला की मौलवी आणि समाजातील‌ प्रतिष्ठित नागरिक मशिदीत प्रार्थना झाली की, जमलेल्या नागरिकांना विशेषतः लहान बालकांच्या आई वडिलांना गोवरच्या साथीचे गांभीर्य उर्दू भाषेतून समजावून देत होते. सर्व बालकांचे लसीकरण गरजेचे आहे, एखाद्या बालकाला ताप , पुरळ अशी लक्षणं दिसत असतील तर ताबडतोब सरकारी दवाखान्यात दाखविणे आणि उपचार घेणे आवश्यक आहे, हे समजावत होते.”
दुसरीकडे, अंगणवाडी सेविका, आशा सेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन बालकांना थंडी- ताप अशी लक्षणे, अंगावर बालकाला पुरळ असल्यास तात्काळ रुग्णालयाला भेट द्या, अशी माहिती दिली जात होती. प्रबोधनावर भर देत असतांना परिसरात सातत्याने लाऊडस्पिकरद्वारे घोषणाही करण्यात येत होत्या.
आणि अर्थातच गोवर रुग्ण आढळल्यास बालकांवर तातडीने उपचार करण्यात येत होते, तर लसीकरणापासून वंचित असलेल्यांसाठी लसीकरण सत्र राबवण्यात आले. परिणामी गोवर रुग्णांची संख्या कमी होत गेली. या विषयी बोलतांना डॉ. ठाकरे यांनी सांगितले, “सर्वेक्षणातून असं लक्षात आलं की मालेगावमध्ये गोवर रूग्ण आढळण्याचे महत्त्वाचे कारण तिथला लसीकरणाचा अभाव आहे. अनेक बालकांना गोवरची लसच देण्यात आलेली नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बालकांना गोवरची बाधा झाली. यात गोवरची लस घेतल्यास बालक दगावू शकतं, अश्या अंधश्रद्धाही होत्या. हे गैरसमज- अंधश्रद्धा दूर करणं आणि लसीकरणासाठी पालकांना राजी करणं, हा आमच्या समोरचा सर्वात मोठा टास्क होता. म्हणूनच लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांचे सर्वेक्षण, घरोघरी आशा सेविकांचे प्रबोधन आणि महत्त्वाचं म्हणजे मौलवींच्या माध्यमातून केलेले जनतेचे प्रबोधन याचा चांगला फायदा झालाय. सध्या मालेगावात विशेष लसीकरण मोहीम सुरू असून आत्तापर्यंत २४५२ बालकांचे लसीकरण झालेले आहे आणि हा आकडा अजूनही वाढेल. बाह्य रुग्ण विभागात संशयित रुग्णांवर तातडीने उपचार, शाळा स्तरावर बालकांच्या आईशी संवाद साधत लसीकरण, औषधोपचार याची माहिती देत होतो, उद्घोषणा, धार्मिक माध्यमातून ही प्रबोधन सातत्याने सुरू होते. या सगळ्या माध्यमातून योग्य ती माहिती मिळाल्याने, त्रास होणारी बालके वेळेवर दवाखान्यात पोहोचली. आणि त्यांच्यावर वेळेत औषधोपचार झाले. या सामूहिक प्रयत्नांतून सद्य स्थितीत एकही सक्रिय गोवर बालरुग्ण मालेगाव महापालिका हद्दीत नाही आणि लोकांना लसीकरणाचे महत्त्व समजाविण्यात आम्ही बर्याच प्रमाणात यशस्वी झालो आहोत”, असे डॉ. ठाकरे यांनी सांगितले.
लेखन- प्राची उन्मेष, नाशिक

Leave a Reply