खरोखरच ‘सर्वसमावेशक’- पुणे मेट्रो!
फ्लॅशबॅक
31 ऑगस्ट 2021
ठिकाण – संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन, पिंपरी, पुणे
खरंतर मेट्रो प्रत्यक्ष सुरू व्हायला अजून काही महिने बाकी आहेत, पण आजच्या दिवशी या मेट्रो स्टेशनवर सुमारे चाळीसेक विकलांग व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलंय. त्यात अंध आहेत, व्हीलचेअर वापरणारे विकलांग आहेत, मूकबधीर आहेत, डोळ्यांनी कमी दिसणारे आणि गतिमंद लोकही आहेत. यांना आज बोलावलंय ते पुणे मेट्रो आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी उपक्रमातंर्गतच्या ‘माझी स्मार्ट मेट्रो’ या उपक्रमातंर्गत. हे सगळेजण स्टेशन पाहतायत, लिफ्ट पाहतायत, मेट्रोत चढून आणि बसून पाहतायत, काय अडचणी येतायत, काय चांगलं वाटतंय, काय सुधारणा हव्यात याविषयी भरभरून बोलतायत.
“खरं तर पुणे मेट्रो आणि पीसीएमसी स्मार्ट सिटीकडून या अनौपचारिक कार्यक्रमाचं निमंत्रण आलं तेव्हा मला तर भरूनच आलं. मेट्रो आता अलमोस्ट तयार आहे. पण ती प्रत्यक्ष धावण्याआधी, मेट्रोचा ज्यांना खूप फायदा होऊ शकतो, अश्या सर्वांशी विशेषत: विकलांग लोकांशी बोलून, त्यांना स्टेशन आणि मेट्रो दाखवून, त्यांच्या सूचना आणि प्रतिक्रिया जाणून घेण्याची तयारी शासकीय विभागाने दाखविली हे मला फारच स्वागर्ताह पाऊल वाटलं.” या कार्यक्रमात सहभागी झालेली दीक्षा दिंडे बोलत होती. दीक्षा स्वत: विकलांगासाठी आणि इतर गरजू लोकांसाठी भरपूर काम करते. संयुक्त राष्ट्रात ‘ग्लोबल यूथ अॅम्बेसेडर’ म्हणून तिनं भारताचं प्रतिनिधित्वही केलेलं आहे.
तर या कार्यक्रमाबद्दल दीक्षा सांगत होती, “आजच्या कार्यक्रमासाठी जे वेगवेगळे विकलांग लोक आले आहेत, त्या आ. बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेकडूनही अनेक जण आले आहेत. आम्ही जेव्हा संत तुकारामनगर स्टेशनजवळ आपापल्या वाहनातून उतरलो, तिथून आम्ही निरिक्षणाला सुरूवात केली. खरंतर माझ्यासारख्या व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्तीसाठी स्टेशनवर घेऊन जाण्यासाठी सुद्धा कोणी सहकार्य करणार असेल, तर मदत होणार आहे, हे जाणवलं आणि तश्या सूचना आम्ही दिल्या. संत तुकारामनगर स्टेशनवरची लिफ्ट उत्तम आहे, व्हीलचेअर कसलाही अडथळा न येता आत जाऊ शकते. शिवाय लिफ्टमध्ये व्हीलचेअर व्यवस्थित बसू शकते.
अंध व्यक्तींसाठी लिफ्टमधील जी बटणं आहेत, त्यावर ब्रेल लिपीतूनही सूचना आहेत, जेणेकरून त्यांना कुठे जायचं, काय करायचं ते कळेल. स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर गेल्यावर मात्र मला आणि इतर विकलांगांना एक गोष्ट जाणवली ती अशी की, प्लॅटफॉर्म आणि मेट्रोची बोगी याच्यात अंतर जरा जास्त आहे, त्यात व्हीलचेअरचे चाक किंवा अंधांची काठी अडकू शकते. आत डब्यात व्हीलचेअरचे पार्किंग करायला जागा आणि आधाराला रॉड आहेत, त्या रॉडवर जर ब्रेलमध्ये काही कोरता आलं तर उत्तम अश्याही सूचना अंध मित्रांनी दिल्या. शिवाय कुठले स्टेशन आले यासाठी उद्घोषणा आणि डिस्प्ले बोर्डही असणार आहे, हे चांगलं वाटलं. याशिवाय टॉयलेटही आम्ही पाहिले, तिथं रॅम्प वगैरे आहे, पण स्वच्छतागृहाचा मुख्य दरवाजा इतका जड आहे की व्हीलचेअरवरील व्यक्तीचा पुरेसा जोर ते दार ढकलायला लागू शकणार नाही, तसा जोर लावायचा प्रयत्न केला, तर माझी व्हीलचेअर कदाचित रॅम्पवरून खाली जाईल.”
दीक्षाने आणि इतर विकलांग मित्रांनी दिलेल्या सूचना पुणे मेट्रोचे डीजीएम मनोज कुमार डॅनिअल, पुणे क्लस्टर सेंटरच्या रश्मी उर्ध्वरेषे, पीसीएमसी स्मार्ट सारथी टीमचे प्रकल्प सल्लागार अमोल देशपांडे आणि इतर अधिकारी लक्षपूर्वक ऐकत होते, त्या सूचना नोंदवूनही घेतल्या गेल्या.
कट टू आज- मार्च 2022
हा कार्यक्रम होऊन सात महिने होऊन गेले, विकलांग मित्रांनी दिलेल्या सूचनांचा कितपत प्रत्यक्षात उपयोग होतोय, यासाठी आम्ही पुणे मेट्रोशी संपर्क साधला. तेव्हा असं कळलं की या कार्यक्रमात दीक्षा आणि इतर विकलांग मित्रांनी दिलेल्या बहुतेक सर्व सूचना पुणे मेट्रोने स्वीकारलेल्या आहेत. मेट्रो स्टेशनवर प्रवेश केल्यानंतर व्हीलचेअरवर वापरणाऱ्यांच्या मदतीसाठी पुणे मेट्रोने स्वयंसेवक नेमलेले असून ते विकलांग मित्रांना स्टेशनमध्ये घेऊन जाणे, अथवा तत्सम अशी सर्व मदत करतील. शिवाय मेट्रोची बोगी आणि प्लॅटफॉर्म यांच्यातील अंतर कमी असणाऱ्या, कोलकात्यात बनलेल्या नव्या बोगी आता पुण्यात दाखल झाल्या असून त्याच वापरल्या जाणार आहेत. विकलांगांसाठीच्या स्वच्छतागृहात रॅम्प, मदतनीस, आत व्हीलचेअर फिरायला जागा आणि खांब करण्यात आले आहेत. शिवाय रस्ता ओलांडण्यासाठी सुद्धा मेट्रो स्टेशनचा मोफत वापर लोकांना करता येणार आहे, त्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याची गरज नाही. पिंपरी ते फुगेवाडी या पहिला टप्प्याचं उद्घाटन 6 मार्च 2022 रोजी होतंय.
आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे, मेट्रो स्टेशन आणि ऑफिसेस साठीची 70 टक्के वीज ही सौरउर्जेवर बनवली जाणार आहे, कमीतकमी प्रदूषण घडावे यासाठी मेट्रो प्रयत्नरत आहे. त्यामुळेच पुणे मेट्रोमधून सायकलस्वारांना त्यांच्या सायकली न्यायला, तसेच पार्किंग लॉटमध्ये तुमच्या इलेक्ट्रिक बाईक चार्ज करायला सुद्धा तुम्ही ठेवू शकता, असेही पुणे मेट्रोतर्फे सांगण्यात आले.
याचसोबत आम्ही पीसीएमसी स्मार्ट सारथी प्रकल्पाचे सल्लागार अमोल देशपांडे यांच्याशीही संवाद साधला. ते म्हणाले, “ पुणे मेट्रोला जास्तीत जास्त नागरिकांच्या अपेक्षा जाणून घ्यायच्या आहेत. त्यामुळे पीसीएमसी स्मार्ट सिटीच्या अंतर्गत केवळ विकलांगच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक, शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलं, घरकामगार महिला, असंघटित कामगार यांच्यापासून ते आयटी प्रोफेशनल्स, गृहिणी आणि अधिकाऱ्यांपर्यंत सुमारे 5000 लोकांना आम्ही मेट्रो स्टेशन आणि मेट्रो दाखवून त्यांच्या सूचना आणि प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. मुख्य म्हणजे समाजातील गरीब समजल्या जाणाऱ्या वर्गासाठीही मेट्रो तुमचीच आहे आणि ती तुम्हांला परवडेल अश्या दरांत उपलब्ध होणार आहे, हा विश्वास आम्ही देतोय. याशिवाय महामेट्रो अॅप आणि पिंपरी- चिंचवडच्या स्मार्ट सारथी अॅपवरून, मेट्रोच्या वापरकर्त्यांना फीडर सर्व्हिसही दिली जाईल. ज्यात तुम्ही घरबसल्या जवळच्या मेट्रो स्टेशनसाठी ई रिक्षा, ई कॅब किंवा सीएनजी रिक्षा बुक करू शकता आणि मग मेट्रोने पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकता.”
इतकंच नाही, माहिती घेतली असता हे कळाले की, विकलांगासाठी तर पिंपरी- चिंचवड मनपा अनेक योजना राबवतेय. 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनी दीक्षासह अनेक कर्तृत्त्ववान विकलांगांचा महापौर आणि आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात एक योजनाही महापौर उषाताई ढोरे यांनी जाहीर केली, ज्यात विकलांग व्यक्तीने विकलांगाशी विवाह केल्यास त्यांच्या संसाराला सहाय्य म्हणून 2 लाख रूपयांची मदत पिंपरी चिंचवड मनपा करणार आहे. पीसीएमसीमध्ये विकलांगांसाठी 35 हून अधिक योजना आहेत. विकलांगांना पिंपरी चिंचवड मनपामार्फत दर महिन्याला सुमारे 2500 रू. ची मदतही देण्यात येते, आणि विकलांगांच्या पालकांनाही 2500-3000 रू.ची मदत केली जाते. पिंपरी चिंचवडमध्ये विकलांगांच्या सर्व गरजा ध्यानात घेऊन, त्यानुसार निवासासाठी ‘दिव्यांग निवास’ हे गृहसंकुल बनविण्याचे कामही सुरू आहे. एकूणच पिंपरी- चिंचवड हे शहर प्रत्येक नागरिकाचे आहे, विकलांगांचे तर आहेच आहे, त्यांना सोयीस्कर ठरतील अश्या गोष्टी उपलब्ध करून देण्याचा पिंपरी चिंचवड मनपाचा प्रयत्न सुरू आहे.
– स्नेहल बनसोडे- शेलुडकर, पुणे. (पिंपरी- चिंचवड)

Leave a Reply