
समोरच्याने एखादं चॅलेंज दिलं की ते स्विकारायला मला आवडतं..’ऋचा, ये तु कर सकती हैl’ असं मन साद घालते आणि वेगवेगळ्या संकल्पनांवर काम करत राहते. त्यामुळेच पत्रकार, रेडिओ जॉकी, उद्योजिका तसेच शेफ यासह ‘ती’ कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तमपणे पार पाडते आहे. तिचं नाव आहे ऋचा. ऋचाच्या नावापुढे आज एवढ्या ओळखी दिसत असल्या तरी हा प्रवास सोपा नसल्याचं ती सांगते. ऋचा सांगते, “बाहेरचे जाऊ द्या, घरचेही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. तेव्हा स्वत:ला सिद्ध करायचं आव्हान माझ्या समोर होते. केकसाठी लागणारे साहित्य असो की कस्टमाईज प्रिटींगसाठी लागणारा माल हे सर्व उद्योग मी सुरू केले. तेव्हाच माझं पाहून माझ्या इमारतीत राहणाऱ्यांनीही तेच उद्योग सुरू केले. माझी सरळ सरळ नक्कल होत होती. तेव्हा खूप राग यायचा. मात्र व्यवसाय करणे आणि तो यशस्वी करणे हे प्रत्येकाला शक्य होतंच असं नाही, हे मी स्वत:ला समजावलं.”
ऋचाने पत्रकारितेचे शिक्षण घेत असतांना स्थानिक वृत्त वाहिनीवर अँकरिंग केलं. पाककृतीशी संबंधित कार्यक्रम केले. नंतर एफएम सुरू झालं आणि तिने रेडिओवर आर जे ऋचा म्हणून काम सुरू केलं. या काळात ती ऋचा देशपांडेची ऋचा शहा झाली. भिन्न परंपरा असल्या तरी शहा कुटुंबात ती रमली. शहा कुटुंबाचा प्लास्टिक पिशव्यांवर प्रिटींगचा व्यवसाय होता. काही काळाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आली. आणि हा व्यवसाय बंद करण्याची वेळ शहा कुटुंबावर आली. प्रत्येकाचे मार्ग वेगळे झाले.
आपलं स्वत:च काही असावं या उर्मीने ऋचाने कस्टमाईज प्रिटींगची कल्पना कुटुंबासमोर मांडली. सगळ्यांनी ऋचाचं म्हणणं हसण्यावारी नेलं. पण ऋचाने निर्णय घेतला आणि हाच व्यवसाय सुरू करायचा ठरवलं. त्यासाठी तिने ५२ हजार रुपये गुंतवले. छपाईसाठी यंत्र मागवलं. यंत्र आलं. तेव्हा ते कुठं ठेवायचं कुठं असा प्रश्न पडला. तिने आईकडे मशीन ठेवलं. काम सुरू झालं. छपाईसाठी लागणारं प्रशिक्षणही तिने घेतलं. ऑर्डर मिळवत प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. आपल्या कामाची सतत जाहिरात करत राहिली. हे पाहून परिसरातील अन्य महिला, ओळखणाऱ्या इतर लोकांनीही तिची नक्कल सुरू केली. ऋचा सांगते, “त्या वेळी हे सारं पाहून राग यायचा. मला जे करायचे ते यांनी केलेच पाहिजे का असा संताप व्हायचा. सुरूवातीला माझे उद्योग हसण्यावारी नेणारा माझा नवरा माझी धडपड-तगमग पाहून मला साथ द्यायला लागला.

‘ऋचा व्यवसाय हा प्रत्येक जण करत असतो. मात्र तो यशस्वी होईल याची ग्वाही देता येत नाही. तू जिद्द, चिकाटी कायम ठेव, तू ज्या पद्धतीने जाहिरात करत आहे तशी सर्वांनाच जमेल असं नाही. हे सातत्य कायम ठेवलंस तर यश तुझंच आहे, असं तो कायम सांगायचा.’ आज हे शब्द खरे ठरत आहेत. ज्यांनी माझं बघून काम सुरू केलं होतं ते कधी बंद पडले कळलेच नाही.

ऋचाचं कस्टमाईज प्रिंटिंगचं काम नीट सुरू होतं. तेव्हाच तिने केक, चॉकलेट बनवणेही सुरू ठेवले होते. तेव्हा केक, चॉकलेट बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल कसा मिळवायचा प्रश्न तिच्यासमोर होता. एकतर मोठ्या प्रमाणावर ऑर्डर दिली आणि माल विकला गेला नाही तर तो अंगावर पडेल. त्यातून घरच्यांना बोलायला निमित्त मिळेल हाही विचार तिच्या मनात असायचा. त्यातही काहीवेळा काही लोक फक्त किंमती विचारत राहायचे. या साऱ्याचा तिला मानसिक त्रास होत होता. पण नवऱ्याने प्रत्येक वेळी साथ दिली. काळ कठीण खराच. जागाही लहान. त्यामुळे ऋचाच्या आईच्या घरातून प्रिंटिंगचं काम करावं लागत होतं. ऋचा म्हणते, “व्यवसाय सुरू केला तो जोडधंदा म्हणून. त्यामुळे दिवसभर आरे जे म्हणून काम करायचं. ते झालं कीच व्यवसायाला सुरूवात. त्यामुळे रात्री बेरात्री उशीरा पर्यंत ही कामं सुरू राहायची. तेव्हा आई-बाबा, सासू-सासरे, नवरा सगळेच कामात मदत करायचे, असं ऋचा सांगते. छपाई मशीन, अन्य सामान याचा पसारा वाटू नये म्हणून ते सारं आवरून घ्यायचे. त्यावेळी आपण आईची लाईट, जागा वापरतो याचं अपराधीपण कायम मनात राहिलं. तीन वर्ष त्याच ठिकाणी काम सुरू होतं. वर्षभरापूर्वी स्वत:चा गाळा घेतला.”

पाच वर्षापूर्वी ऋचाने प्रिंटिंग व्यवसायाला कामाला सुरूवात केली होती. मग, किचेन, उशी, डायरी, टी शर्ट सारं काही ग्राहकांच्या आवडीनुसार करून द्यायचं हे तिने ठरवलं होतंच. हा व्यवसाय सुरू असताना दोन वर्षापूर्वी करोनाने दार ठोठावले. या काळात घरोघरी केक बनवण्याचे काम महिलांकडून सुरू होते. मात्र त्यासाठी आवश्यक कच्चा माल मिळवताना अडचणी येत होत्या. हे साहित्य घरोघरी पोहचवण्याचे काम ऋचाने सुरू केलं. केक साहित्य, बर्थ डे डेकोरेशनसह अन्य साहित्य विकण्यास सुरूवात केली. यातूनच मधून केक बनविण्याचा व्यवसाय सुरू झाला.
दरम्यान, शनिवार-रविवारी आपल्याला जरा वेळ मिळतो. हे ऋचाच्या लक्षात आलं. त्या वेळेचाही तिने व्यवसायात उपयोग करायचं ठरवलं. त्यानुसार रविवारी घरपोच नाश्ता देण्यास सुरूवात केली. थोडा वेळ मिळतोय तर तोही घालव, पण मुलांना वेळ देऊ नको असं घरातल्यांनी तिला ऐकवलं. मात्र पाहू काय होतं असं म्हणत तिने या संकल्पनेवर काम सुरू केलं. यालाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या सर्व कामाच्या व्यापातही ती आरजे सतरंगी रुचा म्हणून काम करत आहे. लवकरच इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातही तिला काम सुरू करायचं असल्याचं ऋचा सांगते. या सर्व प्रवासात कुटुंबाने भक्कम साथ दिल्याचं ती सांगते.
– प्राची उन्मेष, नाशिक
Related