उर्दू शिक्षकांची किमया भारी, वीस दिवसात बाराशे होमवर्कची यादी
जळगाव जिल्ह्यातील पारोळा इथली जिल्हा परिषदेची उर्दू शाळा. इथं 24 वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करणारे अरिफ अहमद मुस्ताक अहमद. सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच अचानक कोविड19 ची साथ आली. लॉकडाऊन झालं, शाळा बंद झाल्या. शाळा बंद आणि शिक्षण सुरू हा उपक्रम शासनाने सुरू केला. पण, कुठं मोबाईलची अडचण तर कुठं इंटरनेट नाही या अडचणी आल्याच. यावर मात कशी करायची? मुलांचं नुकसान होणार नाही यासाठी काय करता येईल या विवंचनेत अरिफ अहमद होते.
सुरुवातीला यांनी युट्यूबवर असलेले व्हिडीओ शक्य त्या पालकांना पाठवणं सुरू केले. या मुलांची शिक्षणाची भाषा उर्दू असल्याने यु ट्यूबवर उर्दू भाषेतले व्हिडिओ अत्यल्प. त्यातही ती भाषा आणि मुलांना समजावण्याची पद्धत थोडी वेगळी. त्यामुळे ग्रामीण भागातल्या आपल्या मुलांना हे कसं समजणार हा प्रश्न होताच. शिक्षणाची गोडी कशी टिकवता येईल? आणि त्यांना कसं क्रियाशील ठेवता येईल? या विचारातून आरीफ यांनी स्वतःचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. एक धड्याचा 5 ते 6 मिनिटांचा व्हिडिओ त्यांनी तयार केला. त्याच माध्यमातून त्यांनी मुलांकडून होमवर्क करून मागवला. गेल्या वर्षभरात त्यांनी असे शंभर व्हिडिओ तयार केले. यातून त्यांनी इयत्ता सहावीचा पूर्ण अभ्यासक्रम गेल्यावर्षी मुलांना शिकवला. हे व्हिडिओ साध्या सोप्या भाषेत आपले शिक्षकच शिकवत असल्याने मुलांना त्यात आवड निर्माण झाली. काही पालक तर स्वतः विद्यार्थ्यांसोबत बसून ते व्हिडिओ ऐकू लागले असं आरिफ सांगतात. गणिताचे धडेही त्यांनी सोप्या पद्धतीने या मुलांना समजून सांगितले. व्हिडिओ व्यतिरिक्त आरिफ यांनी ध्वनिफीत करूनही मुलांना पाठवल्या. या ध्वनिफीतीही मुलांसाठी उपयोगी ठरल्या आहेत.
ऑनलाईन शिक्षण सगळ्याच मुलांना शक्य नव्हतं. त्यामुळे व्हिडिओ तयार करून ते पाठवून दिल्यानंतर मुलं मोबाईल रेंज मिळेल अशा ठिकाणी जाऊन अथवा मित्रांच्या मोबाईलवर ते व्हिडीओ पाहून शिकून घेत. त्यात दिलेला होमवर्क हा सरांना पाठवत. गेल्या वर्षभरामध्ये मुलांनी साडेपाच ते सहा हजार पानांचा होमवर्क करून त्या पोस्ट आरिफ यांना पाठवल्या आहेत.
सध्याही आरिफ सर व्हिडिओ तयार करून मुलांना पाठवत आहेत. महिनाभराच्या आत प्रत्येक विषयाचे तीन धडे त्यांनी अशा पद्धतीने शिकवून पूर्ण केलेले आहेत. मुलांनी ही या वीस दिवसांमध्ये तब्बल बाराशे पानांचा होमवर्क करून तो आरिफ यांना व्हाट्सअपवर पाठवलेला आहे. आरिफ सरांचा उपक्रम त्यांच्या शाळेपुरता मर्यादीत असला तरी बाकी शिक्षकही त्यांच्याकडून व्हिडिओ तयार करण्याची पद्धत शिकून घेऊ लागले आहेत.
– कावेरी परदेशी, जळगाव

Leave a Reply