आई-बाबांची शाळा!
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वाधिक नुकसान शालेय विद्यार्थ्यांचं झालं आहे. गेल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिलं जात आहे. पण त्याचे म्हणावे तसे परिणाम समोर आले नाहीत. विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ही बाब लक्षात घेऊन नांदेड जिल्हा परिषदेनं पालकांना या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाल्यांना शिकवण्यासाठी पालकांनाच प्रशिक्षण देणं सुरू केलं. या अंतर्गत इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना आता त्यांचे पालकच घरी शिकवणार आहेत. मुलांना नेमकं शिकवायचं कसं याचे धडे जिल्हा परिषद व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दिले जात आहेत. नांदेड जिल्ह्यात 160 आई-बाबांची निवड करून त्यांची ऑनलाइन शाळा सुरू केली.
या उपक्रमाविषयी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. रविंद्र आंबेकर म्हणाले,
नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातून प्रत्येकी पाच याप्रमाणे पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या 160 पालकांचं प्रायोगिक प्रशिक्षण नुकतंच पार पडलं. शिक्षण विभागाने त्यांच्यासोबत संवाद साधून शिक्षक आणि पालक यांचे आठ आठ तालुक्यांचे दोन ग्रुप तयार केले आहेत.
सोमवार ते शुक्रवार सकाळी एक तास ऑनलाईन प्रशिक्षण घेतलं गेलं. यात शैक्षणिक साहित्याचा वापर कसा करावा, धडा कसा शिकवयाचा, मोबईलमध्ये अॅप डाऊनलोड, शैक्षणिक तंत्राचा उपयोग कसा करायचा याची सविस्तर माहिती दिली जाते.
सोमवारी भाषा आणि गुरुवारी गणित या विषयाबद्दल मार्गदर्शन केलं गेलं. जेमतेम शिकलेले पालकही विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. चित्र वर्णन, परिसराचं ज्ञान, आरोग्य केंद्राची माहिती, निरिक्षण क्षमता विकसित करण्यास मदत होत आहे. प्रत्येक रविवारी पालकांची ऑनलाईन परीक्षा झाली. त्या भागातील शिक्षकही गृहभेटीद्वारे पालकांना समजावून सांगत आहेत
“आम्ही कधीच मुलांना शिकवलं नाही, हे आमचं काम नाही’ असा सूर सुरूवातीला पालकांमधून उमटत होता. शिक्षकांनी त्यांना सोप्या भाषेत प्रशिक्षण दिलं.
पालकांमध्ये ‘माझे पाल्य, माझी जबाबदारी’, ही संकल्पना रूजवायची आहे. पालकांनी मुलांना अर्धा तास वेळ दिला तरी, मुलांची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. यातील निकालावरुन जिल्ह्यात सर्व ठिकाणी उपक्रम राबवला जाणार आहे. मुलांना शाळेत टाकलं की आपली जबाबदारी संपली असं पालकांना वाटत असतं. पण मुलांच्या प्रगतीत त्यांचीही जबाबदारी आहे, ही जाणीव करून देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे, असंही प्राचार्य डॉ. रविंद्र आंबेकर यांनी सांगितलं.
– शरद काटकर, नांदेड

Leave a Reply