कोरोना काळात मुलांना अभिनव शिक्षण देणारी हनवतखेडाची शाळा
पुंडलिक कौशल्य , तीन वर्ष त्यांनी एकट्यानं हनवतखेडा इथली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा कल्पकतेनं , उत्साहानं चालवली.अलीकडेच कौशल्य सरांना त्यांच्यासारखेच माधव टारफे हे साथीदार लाभले आहेत. दोघांनी मिळून हनवतखेड्यातल्या मुलांच्या शिक्षणाला नवी दिशा दिली आहे. हनवतखेडा, परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातलं साधारण ९०० लोकसंख्येचं गाव. इथल्या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग. पटसंख्या सत्तरच्या आसपास.
कोरोंना काळात इथल्या मुलांची इंग्रजीची भीती पळाली. मुलांना एकमेकांशी इंग्रजी भाषेतून बोलताना पालकही हरखून जात आहेत. यासाठी दोन्ही सरांनी ‘EASY READING BOOK’ उपक्रम सुरू केला. त्यामुळे मुले इंग्रजी वाचनात समरस झाली.
या काळात मुलांची शिक्षणातली गोडी टिकून राहण्याला सरांनी प्राधान्य दिले. शिकणे सोपे करण्याचा, अनुभवाधारित जीवन कौशल्ये मुले कशी आत्मसात करतील हे त्यांनी पाहिले. गावाच्या भिंती शैक्षणिक आशयाने रंगीत आणि बोलक्या केल्या. भिंतीवर इंग्रजी वाक्य, म्हणी, पाढे, गणितीय सूत्रे, वाक्प्रचार. या कामी गावकऱ्यांनी सढळ हाताने शाळेला आर्थिक मदत सुद्धा केली.
कौशल्य सरांनी मुलांचे गल्लीनुसार गट केले. मदतीला गावातले सिद्धेश्वर दोडके,दत्ता वटाने, किशन जाधव, सुंदर नरोटे, योगेश सिरामे हे तरुण. मुलांना अभ्यासाला बसवणे, सरांनी दिलेला अभ्यास सोडवून घेणे, शंकांचे निरसन करणे,मुलांवर नियंत्रण ठेवणे, तरुण स्वतःहून करतात. गावाच्या विकासात प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व तरुणांनी जाणले आहे.
गटात अभ्यास करताना विद्यार्थी-विद्यार्थी, पालक-विद्यार्थी, शिक्षक-पालक अशा स्वरूपाचे बंध तयार होऊन योग्य शैक्षणिक संप्रेषण प्रक्रिया साध्य होत आहे. नियमित पाठ्यक्रमासोबतच विद्यार्थी वयोगटानुसार गणित पेटी,भाषा पेटी यांचा योग्य वापर करून मूलभूत भाषेची आणि गणिताची कौशल्ये आत्मसात करून घेत आहेत. यासोबतच शब्दतारका,भाषिक खेळ,फलक वाचन,मुलाखती असे उपक्रम.
काहीं ज्येष्ठ नागरिक गटामध्ये येऊन गोष्टी सांगतात. भारुड भजने आदींचे गायन करून त्यांचे निरूपण करतात. त्यामुळे मुलांच्या ज्ञानात विशेष भर पडते. अशा स्वरूपाचं सुंदर शिक्षण देणाऱ्या शाळेने निसर्गाशी एकरूप होऊन शिक्षण प्रक्रिया आनंददायी केली आहे.
– बाळासाहेब काळे, ता. जिंतूर, जि. परभणी

Leave a Reply