३५ गृहपाठ फलक, अभ्यासगट आणि गृहभेटी
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातलं कातनेश्वर. कोरोना परिस्थितीमुळे इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकला. बहुतांश पालक फारसे न शिकलेले,गरीब. इथला साक्षरता दर आहे साधारण ६२%. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणावर बऱ्याच मर्यादा येत होत्या. त्यावर आता इथल्या शाळेनं मार्ग काढला आणि ऑफलाईन पद्धतीनं 100% विद्यार्थ्यांचं शिक्षण नियमितपणे सुरू आहे.
गावातले रस्ते, दुकाने, सार्वजनिक ठिकाणे, मुलांच्या खेळण्याच्या जागा अशा ठिकाणच्या भिंतींवर ३५ गृहपाठ फलक केले. त्यावर दररोज अभ्यास लिहिला जातो आणि तपासला जातो. यासाठी गावातले काही शिक्षणप्रेमी नागरिक शिक्षकांना मदत करतात.
दुसरा उपक्रम स्वयंअध्ययन गट. यात एखाद्या गल्लीतले, जवळचे ५-६ विद्यार्थी मिळून दररोज किमान दोन तास अभ्यास करतात. असे ८-१० गट. त्यांचा नियमित अभ्यास करून घेण्याची जबाबदारी तिथल्याच सुशिक्षित तरुणतरुणीची. शिक्षक येऊन मग अभ्यास तपासतात.
तिसरा उपक्रम गृहभेटी. मुलांचा रोजचा अभ्यास व्हावा यासाठी पालकांशी संवाद आवश्यक होता. शिक्षक घरी येऊन पालकांशी बोलू लागले. मुलांच्या अभ्यासात पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागले. याचवेळी त्यांचे स्वाध्यायही ते तपासतात.
शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर सोनाळे ,शिक्षक दामोधर आव्हाड, खोकले, संजय खडाळकर, नागनाथ पांचाळ, बाळासाहेब मोरे, राजू पांचाळ, भाग्यश्री अंबटवार मुलांसाठी खूप परिश्रम घेत आहेत. यात ग्रामपंचायत आणि गावकरीही सहभागी झाले आहेत. त्यामुळे इथल्या मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही, असा विश्वास निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी नुकतीच पाहणी करून सर्वांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मन की बात कार्यक्रमात शाळेचे कौतुक केले होते.
-बाळासाहेब काळे. ता. पूर्णा, जि. परभणी

Leave a Reply