कशेणेची शाळा
अपूर्वा जंगम, गेली १८ वर्ष रायगड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षिका म्हणून शिकवत आहेत. सध्या त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कशेणे ता. माणगाव येथे कार्यरत आहेत. कशेणे गावात रेंज समस्या आहेच शिवाय सर्वच पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत. पण कोविडमुळे सध्या तर सर्वच शिक्षण ऑनलाईन राहणार होतं. यावर काय करता येईल असा अपूर्वा जंगम आणि सहशिक्षिका दीप्ती ढेपे दोघांचाही विचार सुरू झाला. केवळ ऑनलाईनवर अवलंबून राहता येणार नाही, हे तर नक्की होतं.
अपूर्वा आणि दीप्ती यांनी प्रत्येक इयत्तेनुसार दिवसांची वर्गवारी केली. चौथीच्या मुलांसाठी सोमवार आणि गुरुवार ठरवला गेला. प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळी वेळ दिली गेली. मास्क घालूनच विद्यार्थ्यांना आणि पालकांना शाळेत प्रवेश मिळतो. प्रत्येक इयत्तेसाठी एक वेगळी वही तयार केली आहे त्या वहीमध्ये दिवसांनुसार अभ्यास लिहिला आहे. हा अभ्यास पालक त्यांच्या वहीत उतरवून घेतात. शंका असल्यास त्याच वेळी किंवा नंतर फोन करून शिक्षकांना विचारल्या जातात. पहिलीच्या मुलांना अक्षरांची वळणे यावी, शिवाय अंक ओळख व्हावी यासाठी प्रत्येक मुलासाठी वेगळी वही तयार केली आहे. त्याच वहीतून पालक मुलांचा अभ्यास घेतात.
आदिवासी पाडा व शाळा यात दोन रेल्वे रुळ आणि हायवे आहे. पालक दिवसभर कामावर त्यामुळे लहान मुलं शाळेत एकटी येऊ शकत नाहीत. हे लक्षात घेऊन अपूर्वा आणि दीप्ती दर शनिवारी पाड्यावर जाऊन मुलांना शिकवतात. त्या स्वखर्चातून विद्यार्थ्याना पेन्सिल, वही, पेन देतात. मागील वर्षी कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर त्यांनी गावात जाऊन मुलांना शिकवले, त्याच वेळी पाचपेक्षा जास्त मुलांचा सहभाग टाळला. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा, नाटक तसंच वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमही त्यांनी घेतले. याशिवाय अपूर्वा यांचं यूट्यूबवर चॅनल आहे. त्यामधून त्या इंग्रजी व मराठी कविता चित्रांच्या साहाय्याने गाऊन दाखवतात. त्याचाही विद्यार्थ्यांना उपयोग होतो. २०२० मध्ये पूर्ण वर्ष त्यांनी दिनविशेष मालिका चालवली. इयत्ता सातवीपर्यंत सगळ्या विद्यार्थांना उपयोगी होईल अशी माहिती त्या ध्वनिमुद्रित करतात. व्हॉट्सॲपवरून ती शाळांपर्यंत, विद्यार्थ्यापर्यंत पोचवली जाते. विविध उपक्रम व विद्यार्थ्यांसाठीची तळमळ, त्यामुळेच त्यांच्या जुन्या शाळेतील विद्यार्थी अजूनही अपूर्वा यांच्या संपर्कात आहेत.
यूट्यूब चॅनलची लिंक : https://youtu.be/igaAHXeBMp4
– संतोष बोबडे, रायगड

Leave a Reply