भाजीभाकरी,खडू- फळा घेऊन सकाळीच बाहेर पडतात संभाजी खरात
‘पगार घेतोय, गरिबांच्या मुलांनाही शिकवायला नको का? ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्या मुलांचं काही तरी शिक्षण सुरू आहे, पण गरिबांचे काय? ”संभाजी खरात बोलत होते.
खरात सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातल्या कुंडल गावातले. क्रांतीअग्रणी जी.डी. (बापू) लाड यांच्या गांधी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतले खरात सर ग्रामीण कथाकार म्हणूनही ओळखले जातात. सध्या फिल्ड एज्युकेशनचा ट्रेंड त्यांनी आणला आहे.
सकाळचे ९ वाजले की भाजीभाकरीचा डबा, खडू आणि छोटा फळा घेऊन ते घराबाहेर पडतात. मग कष्टकरी, वंचित राहत असलेल्या वाड्या-वस्त्यांमध्ये फिरणे. अंगण, झाड, मंदिर, बांध,मोकळं शिवार ज्या ठिकाणी मुले दिसतील,सावली मिळेल, त्या ठिकाणी खरात सर बसतात आणि शिकवणे सुरू करतात. संध्याकाळी उशिरापर्यंत ही अभ्यासयात्रा सुरू राहते. साधारण गेले दीड महिने त्यांचा हा दिनक्रम आहे. सोबत प्रशासनाकडून सांगण्यात आलेली कोविड प्रतिबंधासाठीची कामेही. मात्र बिकट परिस्थितीत गरीब मुलांच्या हातात पाटी-पेन्सिल टिकवल्याचे समाधान सगळे कष्ट सुखावह करत असल्याचे सर सांगतात.
यासाठी पालकही सहकार्य करत आहेत. योग्य अंतर, स्वच्छता अशा नियमांचे पालन केले जाते. मुख्याध्यापक सी वाय जाधव सर, उपमुख्याध्यापक पट्टणशेट्टी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, आमदार अरुण अण्णा लाड, ऍड प्रकाश भाऊ लाड आणि किरण तात्या लाड यांची प्रेरणा लाभत आहे.
खरात सरांचा आदर्श ठेवून ३५ शिक्षक त्यांच्याप्रमाणे काम करत आहेत.
-जान्हवी पाटील

Leave a Reply