वेश्याव्यवसायाची साखळी तोडणारे-‘शरणस्थान’
लीना आणि येशू डेनियल. मूळचे तामिळनाडूमधले. बोकारो स्टील प्लँन्टची नोकरी सोडून २००२ मध्ये नागपूरला स्थायिक झाले. तेव्हापासून नागपूर शहरातल्या गंगा-जमुना वस्तीतील मुलांसाठी ते काम करत आहेत. हा इथला वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचा परिसर. या स्त्रियांची मुलं तरी या दलदलीत अडकू नयेत, असं डेनियल दाम्पत्याला वाटायचं. यासाठी त्यांनी वस्तीतल्या लहानमोठ्यांना शिकवायला सुरुवात केली. तिथल्या वातावरणाचा मुलांवर होणारा परिणाम जवळून अभ्यासला आणि मुलांना या वातावरणापासून दूर आपल्याजवळ ठेवण्यासाठी मातांचं समुपदेशन केलं.
डेनियल दाम्पत्य मुलांना सांभाळू लागलं. ‘शरणस्थान’ची सुरुवात झाली. मुलांची प्रगती, राहणीमान पाहून इथल्या स्त्रिया आपणहून मुलांना त्यांच्याकडे सोपवू लागल्या. आज १५० च्या वर मुलंमुली त्यांच्याकडे आहेत. डेनियल मुलांना नामंकित शाळेत घालतात. दाखल्यावर पालक म्हणून त्यांचं नाव. अनेक शाळांना त्यांच्या कामाविषयी माहिती असल्यानं शाळाही त्यांना सहकार्य करतात. कोरोना काळात मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाची सोय डेनियल यांनी केली. मुलांना टॅब, लॅपटॉप दिले. चार मुलांना कोरोनाची लागण झाली तेव्हा त्यांच्या उपचारासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मदत केली.
डेनिअल २०१५ पर्यंत मुलांना घेऊन भाड्याच्या घरात राहत होते. ७-८ घरं त्यांना बदलावी लागली. २०१६ मध्ये मुलांसाठी ग्रामीण भागात २ एकरचं तर मुलींसाठी शहरात ६ हजार चौ. फुटचं,तीन मजली वसतिगृह बांधलं. स्टडीरूम,लायब्ररी आणि इतर स्वतंत्र खोल्या. सगळ्याच नीटनेटक्या. प्रत्येक वयोगटाच्या मुलींसाठी स्वतंत्र खोली आणि एक केअरटेकर.
डेनियल दाम्पत्यानं मुलांना लहानपणापासूनच इंग्रजी संभाषणाची सवय लावली. त्यांची मुलंही या मुलांच्या सानिध्यातच मोठी झाली आहे. स्वतःच्या मुलांप्रमाणेच या मुलांना उच्च शिक्षण,व्यावसायिक शिक्षण दिलं. त्यामुळे मुलं नोकरीला लागली. मुली तर बीए, डीएड, नर्स झाल्या आहेत. नुकत्याच १० वी झालेल्या मुलींना तर आर्मी ऑफिसर, फायर ऑफिसर, डॉक्टर व्हायचं आहे. फावल्या वेळेत मुली शिवणकाम शिकतात. मुलींनी केलेल्या मास्क,गाऊन,पिलोकव्हरना बाजारपेठ मिळवून द्यायचा प्रयत्न ते करतात.
मुलं नोकरीला लागली की त्यांना स्वतंत्र राहण्याची मुभा. पण पालकत्वाची जबाबदारी डेनियल झटकत नाहीत. पालक म्हणून मुलांची लग्न त्यांनी करून दिली आहेत. आईचा व्यवसाय माहीत असूनही डेनियल यांनी केलेल्या पालनपोषणावर विश्वास ठेवून ही लग्न झाली आहेत.
हे सगळं करताना मुलं आईपासून दुरावणार नाही, याची काळजी ते घेतात. ५ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी फक्त पाळणाघर. त्यानंतर मुलांना वसतिगृहात ठेवतात. महिन्यातून दोनदा आई आणि मुलांची भेट घडते. समाजाकडून मुलांची हेटाळणी होणार नाही, यासाठी डेनियल दक्ष राहतात.
या मुलांनी चांगलं शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि या व्यवसायाची साखळी तोडावी, त्यांच्या आईच्या वाट्याला आलेलं आयुष्य त्यांच्या वाट्याला येऊ नये, अशी कळकळ डेनियल व्यक्त करतात.
-नीता सोनवणे, नागपूर

Leave a Reply