लेकींचा माहेरासाठी ‘जाणीव जागर’, प्रयत्नातून बदलतंय गाव
विवाहानंतरही लेकींचा गावाबद्दलचा जिव्हाळा कायम असतो. पण, आपल्या संसाराच्या रहाटगाड्यात त्या पुन्हा माहेरात रमू शकत नाहीत. मात्र, कळंब तालुक्यातील शेलगावमध्ये सासुरवाशीण झालेल्या लेकींनी आपल्या माहेरासाठी जाणीवेचा जागर सुरू केला आणि गावापासून दूर गेलेल्या या लेकींनी माहेरासाठी वृक्षलागवडीतून योगदान देण्यास सुरूवात केली आहे. या प्रयत्नातून गावात आतापर्यंत ९५ मोठ्या झाडांची लागवड झाली असून, ५०० हून अधिक फुलांच्या रोपांचं वाटप करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या सामाजिक कार्यातही लेकी योगदान देत आहेत.
कळंब तालुक्यातील ३ हजार लोकसंख्येच्या शेलगाव(जहागीर) या गावात लेकींच्या प्रयत्नातून सामाजिक चळवळच उभारू पाहत आहे. विशेष म्हणजे गावातील तरूणही बहिणींच्या या उपक्रमात योगदान देत आहेत. माहेराला हरित बनविण्याचा लेकींचा संकल्प असून, पुढच्या टप्प्यात गावात प्रशस्त ग्रंथालय उभारलं जाणार आहे. गावची लेक असलेल्या सुवर्णा मधुकर शिनगारे-जवळे गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून आल्या. माहेरासाठी काहीतरी विधायक कार्य उभारण्याची संकल्पना त्यांच्या मनात होती. त्यातून गावात वृक्षलागवडीची संकल्पना त्यांनी मांडली. त्यासाठी त्यांनी गावातल्या भावांना आणि सासुरवाशीण झालेल्या सर्व मुलींना ‘जाणीव जागर’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एकत्र आणलं. प्रत्येक लेकीचा वाढदिवस माहेरात झाडे लावून झाला पाहिजे, ही संकल्पना सगळ्यांना आवडली. प्रत्येक लेकीने या उपक्रमासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सुरू झाली वृक्षलागवड. कुणी स्वत:च्या तर कुणी कुटुंबातील व्यक्तीच्या वाढदिवसाला शक्य तेवढ्या पैशातून वृक्ष लागवड करू लागल्या. लेकींनी सुरू केलेल्या उपक्रमाला गावातील तरुणांनी साथ दिली. नवीन सार्वजनिक ठिकाण निश्चित करून तरुणांकडून वृक्षलागवडीसाठीची आणि संगोपनाची तयारी सुरू झाली. मुलींकडून स्वखर्चाने होत असलेली वृक्षलागवड हा उपक्रम आता गावकऱ्यांसाठी अभिमानाचा आणि भूषण वाढविणारा ठरत आहे. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये सासुरवासीण असलेल्या ५० वर्षापर्यंतच्या लेकींचाही समावेश आहे. जमेल त्या पध्दतीने त्यांच्याकडूनही मदत मिळत आहे, असं गावकरी सांगतात. वाढदिवसाला मुली गावात येऊ शकल्या नाही तरी झाडांची मदत पाठवून देतात आणि माहेरात झाडे लावून वाढदिवस साजरा होतो. सुरू झालेला जाणीव जागर ग्रुप आता गावासाठी दिशादर्शक ठरत आहे.
गावच्या ४० लेकींमध्ये कुणी डॉक्टर, कुणी नोकरदार तर कुणी उद्योजिका आहेत. अन्य भागातले चांगले उपक्रम गावासाठी कसे राबविता येतील, यावरही ग्रुपमध्ये चर्चा होते. लेकींच्या आणि गावातील तरुणांच्या पुढाकारातून आतापर्यंत अंगणवाडी, गावातील हनुमान मंदिराचा मुख्य चौक, समाज मंदिरासह गावातील मोकळ्या जागांमध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
– चंद्रसेन देशमुख, उस्मानाबाद

Leave a Reply