शेती,माती, पर्यावरणाची डाॅक्टर !

”सात-आठ वर्षांपूर्वी माझा हात फ्रॅक्चर झाला.  त्यावेळी  उपचारादरम्यान मला सिलिअॅक नावाचा आजार असल्याचं  समोर आलं. या आजारात ग्लुटेन सेंसेटिव्हीटी असते. त्यामुळे गव्हाचे कुठलेही पदार्थ खायला प्रतिबंध होता. . हीच घटना मला शेती आणि पर्यावरण या दोन गोष्टींकडे ओढण्यास कारणीभूत ठरली.” डॉ. सत्यभामा चोले सांगत होत्या.

डॉ. सत्यभामा चोले यांचं  बीड शहरात हाॅस्पिटल आहे.  व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून त्या शेती आणि  पर्यावरणावर गेल्या सातआठ वर्षांपासून काम करत आहेत. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. त्यानिमित्त त्यांच्याशी गप्पा झाल्या.

यंदाच्या आरोग्य दिनाची संकल्पनाच ‘आपली पृथ्वी आपले आरोग्य ‘. या पार्श्वभूमीवर डॉ. चोले  करत असलेलं  पर्यावरण संर्वधनाचं  काम महत्त्वाचं ठरतं.  प्लॅस्टिकमुक्तीसाठी  डॉ. चोले यांनी त्यांच्याकडेच  काम करणाऱ्या एका महिलेला  शिलाई यंत्र  देऊन  कापडी पिशव्या शिवण्याचं  प्रशिक्षण दिलं .  त्यातून  तिला रोजगाराचा आणखी एक मार्गही मिळाला.
”आजाराच्या निदानानंतर सेंद्रीय  खाण्यावर मी भर दिला.  मात्र, बाजारात खात्रीशीरपणे सेंद्रीय पद्धतीनं  पिकवलेलं  धान्य, भाज्या मिळतील याची शाश्वती नव्हती.  म्हणून मग स्वत:च्या शेतीतच सेंद्रीय शेतीचे प्रयोग सुरू  केले.  तसं आईवडील शेतकरी असल्यानं शेतीची, आवडही होतीच.   मी आयएमएच्या वुमन विंगची सदस्य.  आम्ही डॉक्टर मैत्रिणींनी मिळून बीड शहरात वृक्षारोपणाची माेहिम हाती घेतली.   वृक्षारोपण, बीजारोपण करताकरता  आमचा ग्रुपही  झाला. प्लास्टिक मुक्ती आणि कचरा विलगीकरण याचीही मोहिम राबवली. मात्र, आणखी काम करण्यासाठी स्वत:च्या शेतात सेंद्रीय उत्पादन घेण्यास सुरुवात केली. गावंदरा (ता. धारुर) हे माझं गाव. इथे शेतीत ४०० वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली. सिताफळ, अंब्याचीही झाडे आहेत. सेंद्रीय शेतीत जीवामृताचा वापर केला जातो. यासाठी आम्ही गोशाळाही सुरू  केली आहे. माेठ्या प्रमाणावर देशी गाई आहेत.

”केवळ स्वत:च्या शेतीत काम करू न डॉ. चाेले थांबल्या नाहीत तर त्यांनी आपल्या इतर डॉक्टर मैत्रिणींनाही सेंद्रीय शेतीसाठी प्रोत्साहित केलं . लॉकडाऊन काळात वड, पिंपळ, करंज या झाडांचे १ हजारांहून अधिक िसड बॉल स्वत: तयार करून  त्यांनी डोंगराळ भागात  टाकले. वड, पिंपळ कमी प्रमाणात उगवले.  मात्र, करंजाची ८० टक्के झाडे चांगल्या प्रकारे उगवली आहेत.सध्या  शिरुर तालुक्यातील पौंडुळ गावात त्यांनी  काम सुरू केलं  आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे.


डॉक्टर सांगतात,  ”माणसाच्या आरोग्याइतकंच  पृथ्वीचं  आरोग्यही जपणं महत्त्वाचं आहे. किंबहुना जास्तच..  पृथ्वीचं आरोग्य चांगलं राहिलं  तरच आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं. पृथ्वी आहे तर सजीवसृष्टी  आहे ..त्या दृष्टीनं आम्ही इतर गावात काम सुरू केलं आहे.  शेवटी माती आणि वृक्ष म्हणजेच पृथ्वी.  माती आणि वृक्ष जपले तर पृथ्वीचं आरोग्य चांगलं राहील. ”

– अमोल मुळे, बीड

Leave a Reply