“मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागलं. अनेकांचे रोजगार गेले. पण, या लॉकडाऊनमध्ये आम्हाला उत्पन्नाचा नवा मार्ग सापडला. पहिल्या लाटेत मास्कचा तुटवडा पाहून मी आणि माझ्या दहा सहकारी महिलांनी पहिल्या लाटेपासूनच कापडी मास्क शिवण्याला सुरुवात केली. आमच्या गटाने ६८ हजार मास्क शिवून विक्री केली. साडेसहा लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल पावणेदोन वर्षांत झाली असून सुमारे २ लाख ६८ हजारांचा निव्वळ नफा आम्ही कमावला आहे,” पेंडगाव (ता.बीड) येथील लोफीन सिकंदर शेख सांगत होत्या.
लोफीन यांचा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून तयार झालेला ‘सिमरन महिला बचत गट’ आहे. लोफीन म्हणतात, “चांगल्या दर्जाचे कापड, चांगली शिलाई या बाबींमुळे आम्हाला अनेक ग्रामपंचायतींनी मास्कच्या ऑर्डर दिल्या. बीड शहरातील काही ठोक विक्रेत्यांनीही ऑर्डर दिल्या. दहा महिलांना लॉकडाऊनमध्ये काम मिळालं. मास्कचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता आम्ही ‘फेस शिल्ड’ सुद्धा तयार केले आहेत. यालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.”
लोफीन शेख आणि त्यांच्यासारख्या महिलांनी १ हजार बचत गटाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात मास्क विक्रीतून लॉकडाऊनमध्ये कुटुंबाला आर्थिक आधार दिला.
ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे म्हणाले, “कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरुवातीच्या काळात मास्कचा प्रचंड तुटवडा होता. ही बाब लक्षात घेऊन आम्ही बचत गटांमधील महिलांना कापडी मास्क शिवण्यास सुचवलं. ग्रामपंचायती व शासकीय कार्यालयांनाही बचत गटाच्या महिलांचे मास्क खरेदी करण्यासाठी पत्रव्यवहार केला. काही बचत गटांनी शासकीय कार्यालयांसमोर स्टॉलही लावले. याला चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या लाटेत २०४ बचत गटातील ७८९ महिलांनी १ लाख ४३ हजार मास्क शिवून विक्री केले. यातून १८ लाख ७५ हजार रूपयांची उलाढाल झाली.”
”मास्क विक्रीचा हा व्यवसाय दुस-या लाटेतही कायम राहिला. दुस-या लाटेत १७१ बचत गटातील ३८१ महिलांनी सुमारे ६५ हजार मास्क विक्री केले. यातून ८ लाख ३१ हजारांची उलाढाल झाली.” असे अभियानचे जिल्हा व्यवस्थापक शकील शेख म्हणतात.
मास्क शिवणे व विक्री करणे हा नवा व्यवसाय कोरोनाच्या काळानंतर बचत गटातील महिलांना मिळाला आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे हाताला काम मिळत नसल्याने आर्थिक अडचणी समोर असताना मास्क विक्रीमुळे या अडचणींना दूर करण्यात या महिला यशस्वी ठरल्या आहेत. मास्क विक्री हा बचत गटातील महिलांसाठी नवा व्यवसाय ठरला आहे.
– अमोल मुळे, बीड
Related