धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील एच आर पटेल कन्या माध्यमिक विद्यालयातली श्रद्धा सोनगडे. वय १७. दोन वेळा राष्ट्रीय कबड्डी संघात खेळलेली. त्यापैकी एकदा कर्णधार म्हणून मैदान गाजविणारी. अनेक आव्हानं आली पण आपल्या लक्ष्यापासून ती विचलित झाली नाही.

श्रद्धाचे वडील वायरमन. घरात एक भाऊ, आजीआजोबा आणि आई. आईचं सात महिन्यांपूर्वीच निधन झालं. लहानपणापासून घरची परिस्थिती बेताचीच. मात्र श्रद्धाची आई जिद्दी. काही झाले तरी मुलीला कबड्डी खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी वाट्टेल ते कष्ट घ्यायची तयारी. श्रद्धाला चौथीत असताना खेळाची गोडी लागली. शाळेत भूषण चव्हाण सर भेटले आणि तिला दिशा मिळाली. तिचा खेळ लाजवाब. पण सोबत खेळायला मुलींनाच संघ नव्हता. मग काय मार्ग शोधला, एक एक मुलीला हेरून श्रद्धाने मुलींचा कबड्डी संघ बनवला. संघाचे प्रशिक्षण सुरू झाले. श्रद्धा कर्णधार. ब्लॉकर, रेडर (पकड, चढाई) अशी अष्टपैलू कामगिरी. त्या जोरावर १७ वर्षांच्या आतील संघात तिनं महाराष्ट्रात नाव कमावलं. तिच्या याच कामगिरीच्या जोरावर तिला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले. नंतर राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद. कबड्डी खेळण्यासाठी ती देशभर जाऊन आली. या प्रवासात तिची खंबीर पाठीराखी तिची आई.
श्रद्धाचा खेळ बहरत असतानाच एकदा कबड्डी खेळतानाच तिच्या गुडघ्याच्या लिगामेंटला गंभीर इजा झाली. खेळ बंद. शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. २ लाखांचा खर्च कुठून आणावा ? अशा विवंचनेत आमदार अमरिशभाई पटेल यांनी मदतीचा हात दिला आणि शस्त्रक्रिया मोफत करून दिली. या संकटातही खंबीर पाठीशी होती ती आई. यातून तू बरी होशील आणि पुन्हा कबड्डीचे मैदान गाजवशील हा विश्वास आईने दिल्याचे सांगताना श्रद्धाच्या डोळ्यात पाणी येते.
शस्त्रक्रियेतून ती बरी झाली. आता मैदानात जाण्यासाठी सज्ज होत असतानाच पुन्हा संकट उभं ठाकलं. आधी वडिलांना कोरोनाची बाधा झाली नंतर आईला. वडील कोरोनातून बरे झाले. आई मात्र वाचू शकली नाही.
आईला जाऊन ७ महिने झाले आहेत. शस्त्रक्रियेला वर्ष पूर्ण होतंय. आघातांमागे आघात सहन करून श्रद्धा पुन्हा कबड्डीच्या सरावाला लागली आहे. राज्यातल्या स्पर्धा ती गाजवत आहे. खेलो इंडियाच्या निवड चाचणीसाठी ती जाऊन आली, मात्र कमी वय असल्याने तिला संधी मिळाली नाही. मात्र ती पुन्हा मिळवण्याची धमक तिच्यात आहे. आईच स्वप्न उराशी बाळगून श्रद्धा कबड्डीचा सराव करत आहे. एक दिवस तिला कबड्डीत देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे.
-कावेरी परदेशी, धुळे
Related