‘श्रमिक’च्या साथीने आली समृद्धी
1987 साल. आदिनाथ ओंबळे या तरूणाने बी.कॉमचं शिक्षण पूर्ण केलं आणि बाकी तरूणांसारखाच तोही शहरात नोकरीसाठी गेला. ओरिएंट या फॅन तयार करणाऱ्या कंपनीत नोकरीही मिळाली. पण शहराचं बाह्य आकर्षण आदिनाथ भावलं नाही. आपल्या गावाकडे परत जावं आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या गावातल्या लोकांसाठी करावा असं त्यांना वाटू लागलं. आदिनाथ यांनी नोकरी सोडली आणि ते गावकडे परतले. सातारा जिल्ह्यातलं जावळी हे त्यांचं गाव.
जावळीत आल्यानंतर त्यांनी तेथील सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केला. तेव्हा असं लक्षात आलं, की व्यापारी शेतकऱ्यांना दुधाचा खूप कमी मोबदला देत आहेत, शेतकऱ्यांना तो खर्च परवडत नसल्याने त्यांनी जनावरे विकायला सुरुवात केली होती. म्हणून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आदिनाथ यांनी तेथील दूध संकलन करून महाबळेश्र्वर शासकीय डेअरीमध्ये देण्यास सुरुवात केली. हीच पद्धती इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरली.
या कामामुळे गावकऱ्यांमध्ये आदिनाथविषयी लोकांच्या मनात विश्वास वाढू लागला. मग लोकांनी बचत करावी म्हणून आदिनाथ यांनी विविध स्कीम सुरू केल्या. त्यांच्या अशा अनेक कामांची दखल घेऊन साताऱ्यातील श्रमजीवी संस्थेने त्यांना काही मानधन देऊन सामजिक जागरूकता तसंच विविध प्रशिक्षण देण्यास सांगितलं. हळूहळू त्यांच्या कामाचा व्याप वाढत गेला आणि १९९५ साली त्यांनी ‘श्रमिक जनता विकास संस्था’, मेढा, सातारा इथं सुरू केली. स्विस एड संस्थेने केलेल्या मदतीमुळे त्यांना अनेक पशू डॉक्टरांचे सहकार्य मिळालं. त्यामुळे पंचक्रोशीतील दुग्ध जनावरांचे स्वास्थ वाढून दुग्ध उत्पादनास चालना मिळाली.
‘श्रमिक’ने झाडांची नर्सरी देखील चालू केली. नर्सरीत एक लाख रोपटी तयार करता आली. त्यावेळी सुंदर शाळा प्रोजेक्ट अंतर्गत ती सगळी रोपे शाळांनी विकत घेतली. पुढील सात वर्ष श्रमिक संस्थेने पर्यावरण या विषयावर काम केलं. तेव्हा महिलांना कोणतीच बँक कर्ज देत नसे म्हणून श्रमिकने महिलांसाठी कर्ज व्यवस्था सुरू केली. शिवाय आदिवासी व इतर गावातील मुलींना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केलं. दुर्गम भागातील स्त्रियांसाठी ‘श्रमिक’ने सॅनिटरी पॅड बनवण्याचा प्रकल्प हाती घेतला. त्यातून अनेक महिलांना नियमित रोजगार मिळू लागला. २००० साली श्रमिकने वेगवेगळ्या गावांमध्ये, शाळांमध्ये एड्सबद्दल जनजागृती करत असताना अनेक सांस्कृतिक गाण्याचा व नृत्याचा अवलंब केला.
निसर्गाशी अत्यंत जवळीक असणाऱ्या कातकरी बाधवांची सरकारी खात्यात कुठेच नोंद नव्हती. महाराष्ट्रातील तसेच जावळी भागातील सगळ्याच कातकरी बांधवांची नोंद करून त्यांना हक्क मिळवून दिले. महाबळेश्वर भागात पर्यटकांची संख्या वाढू लागली. त्यामुळे अनेक शेतकरी हॉटेलसाठी जमिनी विकू लागले. त्यावर उपाय म्हणून ‘श्रमिक’ने तापोळा व महाबळेश्वर भागात अग्रो टुरिझम सुरू केल्याने अनेक शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळू लागले. फॉरेस्ट खाताच्या मदतीने श्रमिकने झाडांची लागवड सुरू केली. जानेवारी २००९ मध्ये नाबार्ड मदतीने ‘श्रमिक’ने १५ शेतकऱ्यांसाठी अग्रो टुरिझम, ट्रेकिंग संदर्भात प्रशिक्षण घेतले. त्यामुळे शहरात होणारे स्थलांतर थांबले. शेतकऱ्यांना दिलेल्या प्रशिक्षणानंतर मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे २०११ मध्ये जव्हार, ठाणे भागातील ५० शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. स्ट्रॉबेरी तसंच फुलशेतीसाठी ग्रीन हाऊस प्रोजेक्ट सुरू करण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकरी दिल्ली व मुंबई ठिकाणी फुले पाठवू लागले. सध्या जंगलात मिळणाऱ्या मधावर प्रक्रिया करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यातून आदिवासी भागातील बांधवांना मधाचा योग्य मोबदला मिळू लागला आहे. जावळी सातारा मधील शेतकऱ्यांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे काम ‘श्रमिक’ गेले २५ वर्ष अविरत काम करत आहे.
– संतोष बोबडे, सातारा

Leave a Reply