सशक्त पिढी घडवताना

परभणीतलं येलदरी गाव. शीलाबाई चव्हाण यांनी 31 मे 2021 रोजी एका बाळाला जन्म दिला. बाळाचं वजन अगदीच कमी म्हणजे 1800 ग्रॅमच होते. या नवजात बाळाच्या आणि मातेच्या मदतीला धावल्या त्या अंगणवाडी सेविका मंगलाताई थिटे. त्यांनी शीलाबाईंच्या घरी भेट दिली. बाळाचं वजन वाढवण्यासाठी काही सूचना केल्या. जसं की बाळाला आईच्या दुधाशिवाय (स्तनपानाशिवाय) दुसरं काहीच देऊ नका, स्तनपान करण्याची योग्य पद्धत कोणती, तसंच बाळाला सध्या आंघोळ घालू नका, कपड्यात गुंडाळून उबदार कसं ठेवावं हे सगळं नीट समजावलं. शीलाताईंची घरची परिस्थिती हलाखीचीच,पण त्यांनी आणि घरातल्या सदस्यांनी या सूचना नीट ऐकल्या, मंगलाताईंनीही वारंवार घरी भेट देऊन मार्गदर्शन केलं. आज हे बाळ चार महिन्यांचं झालं असून त्याचं वजन 6 किलो आहे.

असाच दुसरा किस्सा आहे तो परभणीतल्याच दुधगाव क्र. 2 चा. सीमा कदम या गरोदर राहिल्या, मात्र त्यांचं वजन कमी होतं आणि हिमोग्लोबिन तर 7.5 इतकंच होतं. गृहभेटीदरम्यान अंगणवाडी ताई मीना खाडे यांना ही परिस्थिती समजली. आता त्यांनी सीमाताईंकडे विशेष लक्ष द्यायचं ठरवलं. त्यांच्या घरी वारंवार भेट देऊन हिमोग्लोबिन वाढवणाऱ्या आहाराचे उदा. गूळ- शेंगदाणे, बीट, पालेभाज्या आणि ताजी फळं दररोज खाण्याचं सुचवलं. कष्टाची कामं करायची नाहीत, दुपारी दोन तास तरी विश्रांती घ्यायची, वेळोवेळी तपासण्या करून घ्यायच्या, उपवास करायचे नाहीत हे अगदी बजावून सांगितलं. आयएफएच्या गोळ्याही सुरू केल्या. त्यांनी घरातल्यांनाही सीमाताईंची विशेष काळजी घ्यायला सांगितलं. आता सीमाताईंना आठवा महिना सुरू आहे, वजन 49 किलो असून हिमोग्लोबिन 10 वर आलेलं आहे. विशेष म्हणजे सीमाताईंनी गेल्या आठ महिन्यात कोणताच उपवास केलेला नाही. त्यांचं लसीकरणही पूर्ण झालेलं आहे, आणि प्रकृती अगदी उत्तम आहे. त्या आणि त्यांचं कुटुंब अंगणवाडी कार्यकर्ती मीनाताईंचे आभार मानतात.

देशातील लहानग्यांना आणि गरोदर मातांना कुपोषणापासून वाचवण्याचं, आरोग्यवान करण्याचं मोलाचं काम अंगणवाडी ताई करतात. पण यापाठीमागचे आरोग्यविज्ञान, किंवा कुठल्या बालकाच्या/ मातेच्या, कुठल्या समस्येवर कोणता उपाय लागू पडेल, हे त्यांना कोण शिकवतं? असा प्रश्न तुम्हांलाही पडला असेल ना? याचं उत्तर आहे- आयसीडीएस अर्थात एकात्मिक बाल विकास योजना आणि प्रामुख्याने त्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी. वर अंगणवाडी ताईंची उदाहरणं आपण वाचली ती सांगितली आहेत, करूणा कोकणे मॅडम यांनी. त्या परभणीतील जिंतूर तालुक्यात बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहेत.

कोकणे मॅडमच्या कार्यक्षेत्रात 316 अंगणवाड्या आणि जवळपास तेवढ्याच अंगणवाडी ताया आणि काही पर्यवेक्षिका येतात. त्यांच्या कामाबाबत कोकणे मॅडम सांगतात, “प्रामुख्याने कुपोषण रोखणे, कुपोषण झाल्यास लवकरात लवकर त्या मातेला किंवा बालकाला कुपोषणमुक्त बनविणे, आणि आरोग्यवान सशक्त पिढी घडविणे हेच आमच्या कामाचं मुख्य उद्दिष्ट असतं. गावातील प्रत्येक गरोदर महिलेची अंगणवाडीत नोंदणी होते, इतकंच नव्हे तर बाळ जन्माला आल्यानंतर पुढे सहा महिनेही त्या महिलेला मार्गदर्शन सुरूच राहतं. तसेच शून्य ते सहा वयोगटातल्या बालकांच्या उंची, वजन आरोग्य, आजार याच्याही नोंदी ठेवल्या जातात, आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी प्रयत्न केले जातात. अंगणवाडीत नोंदणी झालेल्या प्रत्येक गरोदर महिलेची महिन्यातून एकदा तरी भेट घेतली जाते. प्रसूतीपूर्व आणि प्रसूतिपश्चात काय खावं, जास्तीतजास्त प्रोटीन आणि लोहयुक्त, ताजा आहार कसा घ्यावा, कोणत्या तपासण्या कराव्यात इ. बाबतीत मार्गदर्शन केलं जातं. आणि हे मार्गदर्शन केवळ गरोदर महिलेलाच नव्हे तर तिचा नवरा,सासूबाई, सासरे, जाऊबाई इ. चंही केलं जातं, सुनेची कशी उत्तम काळजी घ्यावी याचा हसतखेळत सल्ला दिला जातो. दोन महिन्यातून एकदा त्यांना अंगणवाडीतही बोलवलं जातं. प्रसूतीला सामोरं जाताना पहिलटकरणीची भीती दूर केली जाते, स्तनपानाचं महत्त्व समजावलं जातं, त्यात काही अडचणी आल्यास सल्ला दिला जातो.”

कोकणे मॅडम पुढे सांगतात, “प्रत्येक गरोदर महिलेची केस वेगळी असते, प्रत्येकीच्या समस्या, घरचं वातावरण वेगळं असतं. आरोग्याच्या दृष्टीने, उत्तम पोषणासाठी गर्भार, स्तनदा मातांनी आणि शून्य ते सहा वयोगटातील मुलांनी काय खावं याबाबतचं प्रशिक्षण अंगणवाडी तायांना आम्ही देतो. त्यासाठी पोषण अभियानातंर्गत 21 मॉड्यूलचं प्रशिक्षण दिलं जातं यात अगदी गृहभेट कशी घ्यावी, गरोदरपणातली काळजी, प्रसूतिपश्चात काळजी, स्तनपानाचं महत्त्व आणि तंत्र याबाबत अंगणवाडी ताईंचं शास्त्रोक्त प्रशिक्षण आम्ही घेतो. शिवाय अंगणवाडी ताया, पर्यवेक्षिका यांच्यासोबत महिन्यातून आमच्या दोन फॉलोअप बैठका होतात, त्यात गावातील गरोदर महिला आणि बालकांची वजन, मोजमापं दिली जातात. काही समस्या असल्यास त्यावर चर्चा होते.”

“याशिवाय दोन वर्षांपूर्वी आयसीडीएसने सर्व अंगणवाडी तायांना मोबाईल दिलेले आहेत. त्यात आयसीडीएसचे इनबिल्ट सॉफ्टवेअर असून त्यात पोषण, आरोग्य या विषयांतंर्गत अनेक व्हिडिओ आहेत, सर्च करून ते पाहता येतात. उदा. स्तनपान या विषयावरचे कित्येक व्हिडिओ तिथं आहेत. या सुविधेचा कोविड काळात भरपूर फायदा झाला.”

कोकणे मॅडम सांगतात, “सशक्त नवी पिढी घडवणाऱ्या या उपक्रमाचा एक हिस्सा असल्याचा मला कायमच अभिमान आणि आनंद वाटतो.”

– स्नेहल बनसोडे- शेलुडकर

Leave a Reply