स्नेहलचं स्वप्न झालं साकार

स्नेहल भास्कर घोडके ही मूळची मंगळवेढा तालुक्यातील बठाण या गावची रहिवासी. वडील नसल्याने सगळी जबाबदारी आईवर. तिची आई शिवणकाम करून घर चालवायची. स्नेहलला बालवयापासूनच खाकी वर्दीचं प्रचंड आकर्षण. त्यामुळे भारतीय सैन्यदलात भरती व्हायचं स्वप्न बाळगलेली स्नेहल प्रचंड मेहनत घेत होती. त्या स्वप्नामुळे ती भल्या पहाटे उठून व्यायामासाठी जायची. रोज पाच किलोमीटर धावायची.


२०१८ साली स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत बीएसएफ अर्थात भारतीय सुरक्षा दलात भरतीसाठी जाहिरात आली. तिने लगोलग अर्ज केला. सदर पदासाठी २०१९ साली लेखी आणि शारीरिक चाचणीची परीक्षा दिली. कोविड 19 च्या साथीमुळे परीक्षेचा निकाल लांबणीवर पडला. पण अखेर २२ जानेवारी २०२१ रोजी भरतीचा निकाल जाहीर झाला. या दोन्ही परीक्षेत तिला भरघोस यश आलं. निकालाची बातमी तिच्या मैत्रिणीने तिला कळवला. स्नेहलच्या घरी आनंदाचा दिवस उजाडला. तिला पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळालं.
निकाल कळला आणि तिच्या घरच्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. स्नेहलने आपलं बारावीपर्यंतचं शास्त्र शाखेतलं शिक्षण पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून पूर्ण केलं आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर २१ वर्षीय स्नेहलने भारतीय सैन्य दलात भरती होऊन वेगळा आदर्श तरुणींपुढे ठेवला आहे. सैन्यदलात दाखल होणारी गावातील पहिली मुलगी ठरली आहे.

– अमोल सीताफळे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर

Leave a Reply